निकामी झालेला ट्रान्स्फॉर्मर तातडीने बदलला
हेस्कॉमची कार्यतत्परता, शेतकऱ्यांमधून समाधान
प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ शिवारातील ट्रान्स्फॉर्मर मागील आठवड्यात शॉर्टसर्किट होऊन निकामी झाला होता. या परिसरात भातलावणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हेस्कॉमने या ठिकाणी नवा ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आला. बैलगाडीतून शेतापर्यंत ट्रान्स्फॉर्मर नेऊन तो बसविण्यात आला.
मागील आठवड्यात अनगोळ शिवारातील बाळेकुंद्री यांच्या शेतातील ट्रान्स्फॉर्मर अचानक निकामी झाला. मोठा आवाज होऊन ट्रान्स्फॉर्मर निकामी झाल्याने त्याची तक्रार हेस्कॉमकडे करण्यात आली. सध्या शेतांमध्ये भातपीक असल्यामुळे दुरुस्ती करणे अडचणीचे ठरत होते. शेतकऱ्यांनी ट्रान्स्फॉर्मर बदलण्याची मागणी केल्याने हेस्कॉमनेही सहमती दर्शविली.
येळ्ळूर मुख्य रस्त्यापासून बाळेकुंद्री यांच्या शेतापर्यंत बैलगाडीतून ट्रान्स्फॉर्मर नेण्यात आला. सध्या भातलावणी केली जात असल्याने विद्युत मोटारीसाठी विजेची गरज भासत आहे. ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आल्याने परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.