For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लैंगिक अत्याचार खटल्यांच्या निकालांचा धडाका

11:33 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
लैंगिक अत्याचार खटल्यांच्या निकालांचा धडाका
Advertisement

20 दिवसात पंधरा जणांना कारावासाची तर एकाला फाशीची शिक्षा, पोक्सो न्यायालयाचा दणका

Advertisement

बेळगाव : अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याबाबत पोक्सो कायद्याची तरतूद करण्यात आली. या कायद्यांतर्गत अनेकांना 20 वर्षांची कठीण शिक्षा तर लैंगिक अत्याचार करून खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा दिली गेली आहे. गेल्या 20 दिवसात पंधरा जणांना 20 वर्षांचा कठीण कारावास तर एकाला फाशी येथील पोक्सो न्यायालयाने सुनावली आहे. जणू शिक्षा देण्याची मालिकाच सुरू झाली असून अशा नराधमांना धडकी भरली आहे.

पोक्सो न्यायालयाच्या न्यायाधीशा सी. एम. पुष्पलता यांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या सहा आरोपींना 20 वर्षांचा कठीण कारावास ठोठावला. महत्त्वाचे म्हणजे अत्याचार करणाऱ्या नराधमांना सहकार्य करणाऱ्या दोन महिलांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सचिन बाबासाहेब रायमाने, रुपा बाबासाहेब रायमाने, राकेश बाबासाहेब रायमाने सर्व रा. नसलापूर, ता. रायबाग, रोहिणी श्रीमंत दीक्षित रा. गळतगा, ता. चिकोडी, विनोद सुरेश माने, विजय तानाजी साळुंखे दोघेही रा. कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली अशी त्यांची नावे आहेत.

Advertisement

या शिक्षेनंतर सौंदत्ती येथील घटनेप्रकरणी महाराष्ट्रातील विक्रम बसवराज पट्टेकर (वय 22) रा. महादेव पेठ, मिरज, जि. सांगली याला 20 वर्षांचा कठीण कारावास ठोठावण्यात आला. रायबागच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमधील आरोपींना 20 वर्षांचा कारावास आणि दंड ठोठावला आहे. अरबाज ऊर्फ अरबाजसाहेब रसूल नालबंद (वय 19) रा. रायबाग, आशिष धर्मराज कांबळे (वय 22) रा. रायबाग अशी त्यांची नावे आहेत. 25 सप्टेंबर रोजी सुभाष बसाप्पा जनवाड (वय 30) रा. बेरडहट्टी, ता. रायबाग याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

रायबाग तालुक्यात अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. उद्याप्पा रामाप्पा गाणगेर (वय 32) रा. कुरुबगोडी-हारुगेरी, ता. रायबाग याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. तिगडोळी, ता. कित्तूर येथील आरोपी गंगाप्पा कल्लाप्पा कोलकार याला 20 वर्षांचा कठीण कारावास आणि दंड ठोठावला आहे. कुर्ली, ता. चिकोडी येथील श्रीसंगम कृष्णात निकाढे (वय 24) याला 20 वर्षांचा कठीण कारावास आणि दंड ठोठावण्यात आला. सौंदत्ती तालुक्यातील बसर्गी येथील आरोपी हनुमंत पुंडलिक चिप्पलकट्टी (वय 26) या आरोपीला 20 वर्षांचा कठीण कारावास आणि शिक्षा ठोठावण्यात आली आहे. येथील पोक्सो न्यायालयाने गेल्या वीस दिवसातच पंधरा जणांना 20 वर्षांचा कठीण कारावास आणि एकाला फाशीची शिक्षा दिली आहे. न्यायालयाकडून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना चांगलाच दणका दिला गेला आहे. यामुळे आता लैंगिक अत्याचार करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असा गुन्हा केल्यानंतर कशाप्रकारे शिक्षा आपणाला होऊ शकते? याची भीती निर्माण झाली आहे.

पोलिसांचे प्रयत्न ठरले मोलाचे

लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी पोलिसांनीही पंचनामा, मुद्देमाल, साक्षीदार यांना त्या ठिकाणी हजर करून त्यांच्याकडून अत्याचाराबाबत न्यायालयासमोर सर्व साक्षी नोंदवून घेण्यात आल्या. यावेळी तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांची माहिती त्या ठिकाणी देण्यात आली. पोलिसांनी योग्य प्रकारे तपास करून तसेच संबंधितांना शिक्षा होण्यासाठी पोलिसांनी केलेले प्रयत्न मोलाचे ठरले आहेत.

विशेष सरकारी वकील एल. व्ही. पाटील यांचा युक्तिवाद ठरला प्रभावी

या पोक्सो न्यायालयामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून एल. व्ही. पाटील हे कार्यरत आहेत. त्यांनी या खटल्यातील आरोपींना न्यायालयाने कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. विशेष करून पोक्सो कायद्यातील तरतुदीबाबत न्यायालयामध्ये त्यांनी कठोरपणे बाजू मांडली आहे. अपहरण करून मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यामुळेच अशा घटना भविष्यात कमी होऊ शकतात, हे न्यायालयाच्या नजरेस आणून दिले. भादंवि 366(अ), 302, 384, 376, पोक्सो 4, 6 आणि 12 बाबत न्यायालयामध्ये भक्कमपणे बाजू मांडली. त्यामुळे या सर्व आरोपींना न्यायालयाने ही कठीण शिक्षा सुनावली आहे.

Advertisement
Tags :

.