भंडारी समाजाची विद्यमान समिती पूर्णत: बेकायदेशीर
उत्तर जिल्हा निबंधक न्यायालयाचा निवाडा : विरोधी सदस्यांची पत्रकार परिषदेत माहिती
पणजी : गोमंतक भंडारी समाजाची अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील 15 सदस्यीय समिती उत्तर जिल्हा निबंधक न्यायालयाने बेकायदेशीर ठरविली आहे. तसेच त्या समितीवर लवकरात लवकर प्रशासक नियुक्त करून निवडणूक घेण्यात यावी, अशी सूचना सरकारला केली आहे, अशी माहिती याच समाजाच्या विरोधी गटातील सदस्यांनी दिली आहे. निबंधकांचा हा निवाडा म्हणजे समाजासाठी ऐतिहासिक विजय असून त्याचे आम्ही स्वागत करतो, असे ते म्हणाले.
बुधवारी पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत संजीव नाईक, अॅड. अनिष बकाल, यशवंत माडकर, अॅड. आतिष मांद्रेकर, काशिनाथ मयेकर, यांच्यासह अन्य पदाधिकारी समाजबांधव उपस्थित होते. हा मुद्दा न्यायप्रविष्ठ झाल्यापासून अनेकदा सुनावण्या झाल्या. त्यावेळी दोन्ही पक्षांनी सामंजस्याने तोडगा काढावा यासाठी निबंधकांनी अनेक संधी दिल्या. तरीही तोडगा निघाला नाही. अखेरीस आजच निबंधकांनी आमच्या बाजूने निकाल दिला. त्यात अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील समिती बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
ऑनलाईन निवडणूक तरतूद नाही
वर्ष 2018 ते 2021 हा या समितीचा कार्यकाळ होता. त्यानंतर निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु कोरोना महामारीचे निमित्त करत या समितीने ऑनलाईन निवडणूक घेत असल्याचे कागदोपत्री दर्शविले व स्वघोषित विजय प्राप्त करून 2021 नंतरही सत्तास्थानी राहिले. खरे तर भंडारी समाजाच्या घटनेत ऑनलाईन निवडणूक घेण्याचा उल्लेख नाही. त्यामुळे सदर निवडणुकही बेकायदेशीर ठरते. परिणामी त्यांना सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार राहात नाही.
सर्व निर्णय बेकायदेशीर
तसेच त्या काळात त्यांनी केलेले सर्व व्यवहार, घेतलेले निर्णय हे सर्व बेकायदेशीर ठरविण्यात आले आहेत. त्याशिवाय याच समितीने आपल्या नोंदणीकृत सदस्यांपैकी 683 जणांना त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासंबंधी पाठविलेल्या नोटिसाही फेटाळण्यात आल्या आहेत, असे नाईक यांनी सांगितले.
समाजासाठी ऐतिहासिक विजय
स्वार्थासाठी कुणीही समाजाला वेठीस धरू शकत नाही. त्यामुळे लढाई यापुढेही चालूच राहिल, असे ते म्हणाले. विद्यमान 15 जणांच्या समितीने गत तीन - साडेतीन वर्षांपासून चालविलेल्या गैरकारभारावर निबंधकांचा हा निवाडा म्हणजे समाजासाठी ऐतिहासिक विजय आहे, या निवाड्याचे आम्ही स्वागत असे नाईक यांनी सांगितले.
2021 नंतरचे व्यवहार बेकायदेशीर
2021 नंतर या समितीने केलेले कागदोपत्री आणि आर्थिक व्यवहार बेकायदेशीर असून त्याबद्दल पणजी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. निबंधकांच्या निवाड्यामुळे तिला आता गती मिळणार असून लवकरच त्यांच्या विरोधात प्रथमदर्शनी अहवाल नोंद करण्यात येईल, असे अॅड. बकाल यांनी सांगितले. दरम्यान, पत्रकार परिषदेनंतर या ऐतिहासिक निवाड्याचे फटाके वाजवून स्वागत करण्यात आले.