कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

संतिबस्तवाड-किणयेतील मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात

12:20 PM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नदीपात्रात झाडाझुडपांचा वेढा : केरकचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ : नदीच्या संवर्धनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष : स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

संतिबस्तवाड-किणये परिसरातील मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या नदीत व नदीच्या काठावर केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. कचरा टाकणाऱ्यांवर वेळीच निर्बंध घातला पाहिजे, अशी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून मागणी होत आहे. अन्यथा परिसरात असलेल्या या नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता  नागरिकांनी वर्तवली आहे. या नदीच्या अस्तित्वासाठी व नियोजनासाठी योग्य ती उपाययोजना होण्याची गरज आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, संतिबस्तवाड, वाघवडे या भागातून वाहणारी मुंगेत्री ही एकमेव नदी आहे.

ही नदी या भागासाठी जीवनदायीनी आहे. या नदीच्या पाण्यावरच या भागातील शेतकरी व जनावरे अवलंबून आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये नदीत व नदीच्या काठावर केरकचरा, प्लास्टिक  बॉटल, दुकानांमधील टाकाऊ कचरा, पूजाविधी झाल्यानंतर शिल्लक केळीची झाडे व साहित्य नदीत व नदीच्या काठात टाकण्यात येत आहेत. असाच केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्यास नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावरती निर्बंध घातला पाहिजे. तसेच स्थानिक ग्रामपंचायती व पर्यावरण प्रदूषण नियंत्रण खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

किणये येथील नदीच्या ठिकाणी, किणये पुलाजवळ, संतिबस्तवाड नवीन पुलाजवळ व जुन्या पुलाजवळ, वाघवडे येथील नदीत अशा ठिकठिकाणी कचरा टाकण्यात येऊ लागला आहे. किणये येथील डोंगरभागातून या नदीचा उगम झाला आहे. ही नदी वाघवडे येथून प्रवाहित होत मलप्रभा नदीला जाऊन मिळालेली आहे. या नदीचे पाणी शेतकरी पिकांना देतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला पिके घेण्यासाठी नदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसातही शिवारातील पाणी कमी झाल्यास भात व इतर पिकांना पाणी देण्यासाठी या नदीचा उपयोग शेतकरी करतात.

त्यामुळे पिकांना नवसंजीवनीही मिळत असते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून बरेच शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात आणि हा दुग्ध व्यवसाय करण्यासाठी बहुतांशी शेतकरी आपल्या गोठ्यात एक ते दोन जनावरे पाळत आहेत. चरण्यास सोडलेली जनावरे पाणी पिण्यासाठी याच नदीला जातात. मात्र कचऱ्याचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांनाही याचा धोका निर्माण होऊ शकतो. किणयेत धरणाची निर्मिती करण्यात आली आहे. या धरणात यंदाच्या पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा झाला होता. तसेच धरणसुद्धा झाले होते. या धरणामुळे मुंगेत्री नदीच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे. या नदीचा फायदा शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यासाठी होत आहे. मात्र नदीत वाढलेली झाडेझुडपे व टाकलेला केरकचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

नदीच्या संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवावा

प्रशासनाकडून पाणी आडवा पाणी जिरवा... अशा विविध योजना राबविल्या जातात. मात्र संतिबस्तवाड भागातील या नदीचे पाणी अडविण्यासाठी किंवा नदीच्या संवर्धनासाठी योजना का राबवली जात नाही. संतिबस्तवाडजवळ, तसेच जुन्या पुलाशेजारी प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेला आहे. ही आपल्या भागातील एकमेव  नदी आहे. त्यामुळे या नदीच्या संरक्षणासाठी प्रत्येक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रारंभी संतिबस्तवाड ग्रामपंचायत व किणये ग्रामपंचायत यांनी मिळून नदीत कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न करावेत. किंवा त्या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावेत. याचबरोबर पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या परिसराची पाहणी करून योग्य तो तोडगा काढावा.

-आण्णाप्पा बस्तवाडकर, संतिबस्तवाड 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article