For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतिबस्तवाड-किणये भागातील मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात

10:51 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
संतिबस्तवाड किणये भागातील मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात
Advertisement

नदीत-काठावर कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ : निर्बंधाची मागणी

Advertisement

वार्ताहर/किणये

संतिबस्तवाड -किणये परिसरातील मुंगेत्री नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.कारण या नदीत व नदीच्या काठावर केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. कचरा टाकणाऱ्यांवर वेळीच निर्बंध घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून होत आहे. अन्यथा परिसरात एकमेव असलेल्या नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. किणये, बहाद्दरवाडी, रणकुंडये, संतिबस्तवाड, वाघवडे या भागातून वाहणारी मुंगेत्री नदी एकमेव आहे. या नदीच्या पाण्यावरच या भागातील शेतकरी व जनावरे अवलंबून आहेत. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये नदीत व नदीच्या काठावर केरकचरा, प्लास्टिक  बॉटल, दुकानांमधील टाकाऊ कचरा, निर्माल्य नदीच्या काठावर टाकण्यात येत आहे. असाच केरकचरा टाकण्याचे प्रमाण वाढल्यास नदीचे पाणी दूषित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत व पर्यावरण प्रदूषण नियंत्रण खात्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. किणये येथील नदीच्या ठिकाणी, संतिबस्तवाड नवीन पूल व जुन्या पुलाजवळ, वाघवडे येथील नदीत व पुलाजवळ  कचरा टाकण्यात येत आहे.

Advertisement

पिकांसाठी नदीचे पाणी उपयुक्त

या नदीचे पाणी शेतकरी पिकांना देतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाला पिके घेण्यासाठी नदी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसातही शिवारातील पाणी कमी झाल्यास भात व इतर पिकांना पाणी देण्यासाठी या नदीचा उपयोग शेतकरी करतात. त्यामुळे पिकांना नव संजीवनीही मिळत असते. शेतीला जोड व्यवसाय म्हणून बरेच शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात. दुग्ध व्यवसाय करण्यासाठी जनावरे पाळली जातात. त्याना या नदीचे पाणी उपयुक्त ठरते. मात्र कचऱ्याचे प्रमाण वाढल्यामुळे जनावरांनाही याचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते.

नदीच्या संरक्षणासाठी पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवावा

संतिबस्तवाड जवळ तसेच अन्य ठिकाणीही नदीत कचरा टाकण्याचे वाढत आहे. ही गंभीर बाब आहे. याकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण ही आपल्या भागातील एकमेव नदी आहे. त्यामुळे या नदीच्या संरक्षणासाठी प्रत्येक पर्यावरणप्रेमी नागरिकांनी आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे.संतिबसवाड ग्रामपंचायत व किणये ग्रामपंचायत यांनी मिळून नदीत कचरा टाकणाऱ्यांवर निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न कारवेत. तसेच त्या ठिकाणी सूचनाफलक लावण्यात यावेत. याचबरोबर पर्यावरण खात्याच्या अधिकाऱ्यांनी या  परिसराची पाहणी करून योग्य तोडगा काढावा.

- आण्णाप्पा बस्तवाडकर, संतिबस्तवाड 

Advertisement
Tags :

.