For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘वंदे भारत’चे जल्लोषी स्वागत

06:55 AM Sep 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘वंदे भारत’चे जल्लोषी स्वागत
Advertisement

मुंबई, बेंगळूर शहरांना बेळगावमधून लवकरच स्लीपर वंदे भारत : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सोमण्णा यांचे आश्वासन

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

सातत्याच्या मागणीनंतर आणि पाठपुराव्यानंतर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ सोमवारी रात्री 10.10 वाजता  बेळगाव रेल्वे स्थानकावर दाखल झाली, त्यावेळी जल्लोषी स्वागत करण्यात आले. वंदे भारत दाखल होताच ‘भारत माता की जय’ अशा घोषणांनी रेल्वेस्थानक दणाणून निघाले. उपस्थित नागरिकांनी तिच्यावर पुष्पवर्षाव केला. विशेष म्हणजे वंदे भारत च्या आगमनाच्या वेळी बहुसंख्य नागरिक उस्फूर्तपणे रेल्वे स्थानकावर जमा झाले होते. या सर्वांचे लोकमान्य सोसायटीतर्फे पेढा देऊन तोंड गोड करण्यात आले.

Advertisement

मुंबई व बेंगळूर शहरांना बेळगावमधून लवकरच स्लीपर वंदे भारत

बेळगाव शहराचा संबंध अधिकाधिक मुंबई व बेंगळूर या महानगरांशी येतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रवाशांच्या मागणीनुसार लवकरच मुंबई व बेंगळूर या दोन्ही शहरांना बेळगावमधून स्लीपर वंदे भारत सुरू केली जाईल. त्याचबरोबर येत्या दोन महिन्यात बेळगावमधून नवीन शहरांना रेल्वेसेवा सुरू करण्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिले. सोमवारी बेळगाव रेल्वेस्थानकावर पुणे-हुबळी वंदे भारतचे स्वागत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोकण रेल्वे ही महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांमधून धावते. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेकडे हस्तांतरण करण्याची मागणी होत असून लवकरच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत हस्तांतरण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. 2024 पर्यंत कुडची-बागलकोट रस्त्याचे काम पूर्ण केले जाईल. केंद्रीयमंत्री प्रल्हाद जोशी यांच्याशी चर्चा करण्यात आली असून बेंगळूर-धारवाड वंदे भारत लवकरच बेळगावपर्यंत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 रेल्वेमंत्र्यांकडे विविध मागण्या

खासदार जगदीश शेट्टर यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानत बेळगाव-पंढरपूर, बेळगाव-मुंबई तसेच बेळगावमधून राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली. राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले, बेळगावहून मुंबईला रात्रीच्या रेल्वेची गरज भासत आहे. बेळगावमधून मुंबईसाठी सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू करण्यासोबतच पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण कोकणाला जोडण्यासाठी मिरज-मंगळूर एक्स्प्रेस सुरू करावी. बेळगाव व मिरजेच्या प्रवाशांसाठी पुश-पुल एक्स्प्रेस कायम करावी. यासह इतर विविध मागण्या त्यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर मांडल्या.

रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी

सोमवारी रात्री 10.10 वाजता वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावमध्ये दाखल झाली. वंदे भारतबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळे रेल्वेस्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती.  प्रवाशांनी रेल्वेमध्ये प्रवेश करून वंदे भारतची व्यवस्था पाहिली. दहा ते पंधरा मिनिटांच्या थांब्यानंतर ही एक्स्प्रेस हुबळीच्या दिशेने रवाना झाली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावहून हुबळीच्या दिशेने रवाना झाली. यावेळी माजी खासदार मंगला अंगडी, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, महापौर सविता कांबळे, माजी आमदार अनिल बेनके, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, नैर्त्रुत्य रेल्वेचे अॅडिशनल जनरल मॅनेजर के. एस. जैन यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बेळगावमधून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करावी, यासाठी जोरदार मागणी सुरू होती. वर्षभरापूर्वी बेंगळूर-बेळगाव मार्गावर वंदे भारतची प्राथमिक चाचणी झाली. परंतु, वेळेचे नियोजन तसेच तांत्रिक कारण समोर आल्याने बेंगळूर वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावपर्यंत पोहोचू शकली नाही. परंतु, रेल्वेबोर्डने पुणे-बेळगाव मार्गावर वंदे भारत सुरू करणार असल्याचे डिसेंबर 2023 मध्ये जाहीर केले होते. वंदे भारत केव्हा सुरू होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता होती. गुरुवार दि. 12 रोजी हुबळी-मिरज मार्गावर वंदे भारतची चाचणी यशस्वीरीत्या घेतल्यानंतर रेल्वेबोर्डाकडून हिरवा सिग्नल देण्यात आला. सोमवारी सकाळी पुणे रेल्वेस्थानकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे रेल्वेचा शुभारंभ करण्यात आला.

रेल्वेस्थानकाला फुलांची आकर्षक आरास

वंदे भारत बेळगावला आल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेसवर फुलांची उधळण करण्यात आली. त्याचबरोबर नागरिकांकडून मिठाईचे वाटप करून आनंद साजरा करण्यात आला. रेल्वेस्थानकाला फुलांची आकर्षक आरास करण्यात आली होती. तसेच केंद्रीयमंत्री व्ही. सोमण्णा यांच्या स्वागताचे फलक सर्वत्र लागले होते. वंदे भारत दाखल होताच छबी टिपण्यासाठी नागरिकांची धडपड सुरू होती. अवघ्या दहा मिनिटांत प्रवाशांनी रेल्वेमध्ये जाऊन तेथेही रेल्वेच्या अत्याधुनिक सुविधांसोबत फोटो काढणे पसंत केले.

लोकमान्य सोसायटीतर्फे मिठाईचे वाटप

लोकमान्य सोसायटीचे चेअरमन तथा ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्या प्रयत्नातून वंदे भारत बेळगावपर्यंत पोहोचू शकली. याबद्दल मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्यावतीने रेल्वेस्थानकावर मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी उष:काल मंडळाचे बाळासाहेब काकतकर, सुहास किल्लेकर, शिवाजी हंगिरगेकर, राजू हंडे, भरत पुरोहित, सुनील मुतगेकर, किशोर हळदणकर, राजू नाईक, सूरज गवळी, अजय सामंत यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. किरण ठाकुर यांच्याकडून रेल्वेमंत्र्यांचे आभार

बेळगाव व पुणे या दोन शहरांमध्ये व्यावसायिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये नेहमी देवाणघेवाण होत असते. आता बेळगावमधून वंदे भारतने पुण्यापर्यंतचा वेगवान प्रवास करता येणार आहे. यामुळे बेळगावच्या उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक  डॉ. किरण ठाकुर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्ली येथे भेट घेऊन पुणे-बेळगाव-गोवा अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. त्यावेळी त्यांनी आपण पुणे-बेळगाव वंदे भारत लवकरच सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. अवघ्या पंधरा दिवसातच रेल्वेबोर्डाकडून पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस जाहीर करण्यात आली. बेळगावकरांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल डॉ. किरण ठाकुर यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहेत.

Advertisement
Tags :

.