कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतातील पर्वतरांगांचे अस्तित्व धोक्यात

06:30 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या पर्वतीय राज्यांत वारंवार होणाऱ्या भूस्खलनाच्या दुर्घटनांनी तेथील लोकांचे जीवन संकटग्रस्त केलेले आहे. धार्मिक तीर्थक्षेत्रे त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यटनासाठी तसेच पदभ्रमण आणि गिर्यारोहण मोहिमांसाठी आकर्षण बिंदू ठरलेल्या या राज्यांत गेल्या काही दशकांपासून हॉटेल्स, रस्ते आणि महामार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प हाती घेतलेले आहेत, त्यामुळे भूस्खलनाच्या दुर्घटना वाढलेल्या आहेत. नैसर्गिक प्रकोपाच्या घटनांत विलक्षण वाढ होत असताना, प्रस्तावित विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जात आहे, ही गंभीर चिंतेची बाब आहे.

Advertisement

भारताला जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत वैविध्यपूर्ण पर्वतरांगांचे वैभव लाभलेले असून, वयोवृद्ध मानल्या जाणाऱ्या पश्चिम घाटाच्या पर्वतरांगा असो अथवा तऊण समजल्या जाणाऱ्या हिमालयाच्या, आज हवामान बदल, तापमान वाढ, त्याचप्रमाणे लोकवस्ती, साधनसुविधा आणि विकासाचे नानाविध प्रकल्प यांचा अराजकतेने होणारा विस्तार, नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर, यामुळे देशभरातील पर्वतरांगांचे अस्तित्व दिवसेंदिवस संकटग्रस्त होत चालले आहे. हिमालय, अरवली, विंध्य, पश्चिम घाट, पूर्व घाट, निलगिरी अशा पर्वतरांगातून उगम पावणाऱ्या नदी-नाल्यांपासून तेथील वृक्ष-वेलींनी समृद्ध जंगल संपदा असो, भारतीय लोकमानसाचे जीवन आणि उपजिविका समृद्ध करण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असेच आहे.

Advertisement

आज हिमाचल प्रदेश, उत्तराखंडसारख्या पर्वतीय राज्यांत वारंवार होणाऱ्या भूस्खलनाच्या दुर्घटनांनी तेथील लोकांचे जीवन संकटग्रस्त केलेले आहे. धार्मिक तीर्थक्षेत्रे त्याचप्रमाणे नैसर्गिक पर्यटनासाठी तसेच पदभ्रमण आणि गिर्यारोहण मोहिमांसाठी आकर्षण बिंदू ठरलेल्या या राज्यांत गेल्या काही दशकांपासून हॉटेल्स, रस्ते आणि महामार्ग आणि अन्य पायाभूत सुविधांचे जे प्रकल्प हाती घेतलेले आहेत, त्यामुळे भूस्खलनाच्या दुर्घटना वाढलेल्या आहेत. ढगफुटी किंवा मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे उद्भवणाऱ्या प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जाताना, तेथील लोकांची अक्षरश: त्रेधातिरपीट उडते. नैसर्गिक प्रकोपाच्या घटनांत विलक्षण वाढ होत असताना, प्रस्तावित विकासाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जात आहे, ही गंभीर चिंतेची बाब आहे.

राजस्थान, गुजरात, हरयाणा, मध्य प्रदेश या राज्यांना अरवली पर्वतांचे जे नैसर्गिक वैभव लाभलेले आहे, ते या पर्वतरांगांत गेल्या काही वर्षांपासून चालू असलेल्या खनिज उत्खननामुळे संकटांच्या खाईत लोटलेले आहे. इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून अरवली पर्वतश्रेणीत तांब्याचे आणि अन्य खनिजांचे उत्खनन करण्यात येत आहे. त्यात भर म्हणून की काय, क्वार्टझाइट, पाटीचे दगड, शिस्ट, नाइस, संगमरवर, ग्रॅनाईट, गुलाबी रंगाच्या खडकाच्या राशी, काही रत्ने, अभ्रक, जस्त, शिशाचे धातुपाषाण आणि अन्य मानवी समाजासाठी उपयुक्त ठरलेली खनिजे यांचे उत्खनन या पर्वतश्रेणीत गेल्या काही वर्षांपासून चालू आहे. अराजक आणि अनिर्बंधपणे हे खनिज उत्खनन चालू राहिले तर अरवलीचे वर्तमान आणि भवितव्य सुरक्षित राहणे कठिण होईल म्हणून या पर्वत शृंखलेच्या भू-शास्त्राrय आणि जैविक संपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्थानिक जनता आणि सरकारी यंत्रणेने सौहार्दपूर्णतेने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

दक्षिण भारताचा जीवनाधार असणाऱ्या पश्चिम घाटाचे संरक्षण करण्यासाठी डॉ. माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली पर्यावरण तज्ञ गटाने केलेल्या पर्यावरणीय संवेदनाक्षम क्षेत्राची निर्मिती काळाची गरज बनली असताना त्यानंतर नियुक्त केलेल्या डॉ. कस्तुरीरंगन उच्चस्तरीय समितीने केलेल्या शिफारसींची अंमलबजावणी प्रामाणिकपणे करण्यात केंद्र आणि राज्य सरकारे यशस्वी झालेली नाही. केरळसारख्या राज्यांतल्या पश्चिम घाटातल्या पर्वतरांगा पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिकांच्या, बागायती पिकांच्या लागवडीच्या अतिरिक्त ओझ्याखाली दुर्बल होत असताना, खडीसाठी डोंगरांत दगडफोडी करणाऱ्या खाणींना मुभा दिलेली आहे. त्यामुळे गेल्या दशकभरापासून भूस्खलन, महापूर, ढगफुटीसारख्या घटनांत वाढ झाली असून त्यात स्थानिकांचे मृत्यू आणि मालमत्तेची हानी होण्याची प्रकरणे उद्भवत आहेत. साक्षरतेचे लक्षणीय प्रमाण असणाऱ्या केरळ राज्यातही गाडगीळ समितीने केलेल्या लोकाभिमुखी शिफारसींची अंमलबजावणी करण्यात तेथील सरकार यशस्वी ठरलेले नाही.

कर्नाटक आणि महाराष्ट्रातही सह्याद्रीच्या पर्वतरांगांत खनिज उत्खनन, धरणे आणि पाटबंधारे प्रकल्प, महामार्ग, लोहमार्ग आदी मानवकेंद्रित विकासाने तेथील वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाला दिवसेंदिवस असुरक्षित केलेले आहे. इथल्या पश्चिम घाटातील जंगले आणि पर्वतरांगांचा समावेश ‘जागतिक वारसा स्थळा’त होत असला तरी त्यांचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि स्थानिक जनता यांच्यातल्या समन्वयाचा अभाव प्रकर्षाने जागोजागी दृष्टीस पडत आहे. गुजरातातील डांगपासून तामिळनाडूतील पर्वतरांगाचे आणि तेथील जंगलांचे अस्तित्व दुर्बल आणि विस्कळीत करण्याची षड्यंत्रे सफल होत आहेत, ही गंभीर चिंतेची बाब आहे.

विंध्य पर्वतशृंखला ही उत्तर आणि दक्षिण भारताच्या मध्यावरती वसलेली असून, सातपुडा, कैसुर पर्वत त्याचप्रमाणे पठारे यांनी समृद्ध असलेला हा प्रदेश कोट्यावधी जनतेचा सनातन काळापासून आजतागायत जीवनाधार ठरलेला आहे. नर्मदा ते गंगा नदी खोऱ्यात विसावलेली ही पर्वतशृंखला आदिमानवाला जशी आकर्षित करू शकली तशीच ती आजही मानवी समूहाची पोषणकर्ती ठरलेली आहे. भीमबेटाचा शैलाश्रय ते वाराणसी आणि अन्य तीर्थक्षेत्रांचे वैविध्यपूर्ण वैभव ज्या पर्वतशृंखलेत विसावलेले आहे, त्या विंध्य पर्वताच्या परिघात खनिज उत्खनन, जंगलतोड, प्रदुषणकारी प्रकल्प, विस्तारणारे नागरीकरण आणि औद्योगिकीकरणाचे प्रकल्प सुरू आहेत. त्याच्या दुष्परिणामांचे असह्यकारक चटके इथल्या निसर्ग आणि पर्यावरणाबरोबर मानवी समाजाला भोगण्याची वेळ आलेली आहे. पन्नातील सिंग्रामपूर परिसरातील 752 मीटर उंचीचा सद्भावना पर्वतशिखर विंध्याचलाचा मुकूटमणी असून केन, बेटवा, पार्वती आदी नद्यांबरोबर शेकडो नाले, ओहोळ यांचा उगम पर्वतशृंखलेत होत असल्याने, मध्यभारताच्या जनतेला जल, जंगल आणि जैविक संपदेच्या माध्यमातून पूर्वापार देणगी लाभलेली आहे. आज बांधवगड व्याघ्र राखीव क्षेत्र असो अथवा पट्टेरी वाघ, बिबटे, निलगाय, गवेरेडे आदी प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास असणारे प्रदेश ही विंध्याचलाची अनमोल संपत्ती आहे.

आज भारतभर ज्या पर्वत शृंखला आहेत, त्यांनी तिथल्या आदिम आणि अन्य जंगलात स्थायिक लोकसमूहाचे जीवन आणि उपजिविका समृद्ध करण्यात वेळोवेळी महत्त्वाचे योगदान केलेले आहे. एखाद्या प्रदेशात होणारी पर्जन्यवृष्टी असो अथवा शीतलहरीचा प्रकोप नियंत्रित करण्यात या पर्वतशृंखला सक्रिय राहिलेल्या आहेत आणि त्यासाठी कुठे पवित्र जलकुंड, देवराया, देवतास्वरुपी पर्वत यांच्या माध्यमातून इथल्या जैविक संपत्तीच्या नानाविध घटकांचे रक्षण करण्याचे व्रत कष्टकरी लोकसमूहाने पाळलेले आहे. परंतु आज नदी-नाल्यात, जंगलात, दगडात देवत्व अनुभवणारी विचारधारा दुर्बल होत असून, मिळेल तेथे सिमेंट-काँक्रीटची बांधकामे, रस्त्याचे डांबरीकरण-काँक्रीटीकरण यांचा आततायीपणे विस्तार होत आहे आणि त्यामुळे पर्वतशृंखला पोखरून, भू-सुरुंगांनी खोदून भुयारी मार्ग, रस्ते, साधनसुविधा तसेच पर्यावरणीय पर्यटनाचे नाव धारण करून विकासाच्या प्रकल्पांचा रेटा पुढे ढकलला जात आहे, ही चिंतेची बाब आहे. पर्यावरणीय संवेदनशीलता आत्मियतेने जपली तरच पर्वतशृंखला जीवनदायी ठरेल आणि भूस्खलनाची प्रकरणे नियंत्रित होतील, याचे भान आम्ही राखले पाहिजे.

पर्जन्यवृष्टी करणे, शीतलहरी, उष्माघात नियंत्रित करून हवामान बदल आणि तापमान वाढीच्या वर्तमान आणि भविष्यकालीन प्रकोपात स्थानिक हिरव्यागार वृक्ष-वेलींच्या आच्छादनाने युक्त पर्वतशृंखला आमच्या जीवन आणि उपजिविकेचा आधार ठरणार आहे. त्यांच्या रक्षणातच आमचे रक्षण आणि अभिवृद्धी सामावलेली आहे, हाच मुलभूत विचार गोवर्धन पर्वताच्या संरक्षणाद्वारे श्रीकृष्णाने मांडला होता. तो विचार प्रत्यक्ष कृतीत आणणे यातच आमचे कल्याण लपलेले आहे, हे ध्यानात ठेवून पर्वत रक्षणासाठी कार्यतत्पर होणे महत्त्वाचे आहे.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article