जिल्हा पंचायतींची धुमाळी सुरु
शनिवार 13 डिसेंबर रोजी मतदान,अधिसूचना जारी
पणजी : येत्या शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी गोव्यातील दोन्ही जिल्हा पंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. याबाबतची अधिसूचना पंचायत खात्यातर्फे काढण्यात आली आहे. एकंदरीत निवडणुकीचा कार्यक्रम कालांतराने जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे आता पुढील दीड-दोन महिनाभर जि. पं. निवडणुकीची रणधुमाळी माजणार आहे. ही निवडणूक जाहीर झाल्यामुळे मंगळवारी दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केलेले वृत्त खरे ठरले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हा पंचायत निवडणुकीची हवा चालू आहे. त्या केव्हा होणार याची चर्चा होत होती. राजकीय पक्षांनी अंदाज घेऊन सदर निवडणुकाची तयारी यापूर्वीच सुरू केली असून आचारसंहिता लागू होण्यासाठी वेगळी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. ज्या दिवशी निवडणूक कार्यक्रमाची अधिसूचना काढली जाईल, तेव्हापासून आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याचे सांगण्यात आले.
उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा राज्यातील दोन्ही जिल्ह्यांत प्रत्येकी 25 असे मिळून एकूण 50 जागांवर (मतदारसंघ) या निवडणुका होणार आहेत. त्याची पुनर्रचना करण्यात आली असून ती तक्रारी किंवा आक्षेप यासाठी खुली ठेवण्यात आली आहे. त्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची राखीवता म्हणजे एससी-एसटी, ओबीसी, महिला, सर्वसाधारण जाहीर होणार आहे. ही जिल्हापंचायत निवडणूक म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल मानण्यात येत असून त्या दृष्टीने गोव्यातील सर्व राजकीय पक्ष तयारीस लागले आहेत.
गोवा निवडणूक आयुक्तपदी मिनिनो डिसोझा
गोवा राज्य निवडणूक आयुक्त म्हणून माजी आयएएस अधिकारी मिनिनो डिसोझा यांना नियुक्त करण्यात आले आहे. पंचायत खात्याने त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून आयुक्तपद रिकामी होते. जि. पं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथे नियुक्ती होणे गरजेचे होते. त्यानुसार सरकारने दखल घेऊन ही नियुक्ती केली आहे. डिसोझा हे गोमंतकीय असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी गोव्यात आयएएस अधिकारी या नात्याने विविध पदांवर चांगली सेवा दिली आहे.