‘आषाढी एकादशीचा’ उत्साह शिगेला
प्रतिपंढरपूर सांखळीच्या विठ्ठल मंदिरात जय्यत तयारी : विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम
प्रतिनिधी/ पणजी
आषाढी एकादशी, ज्याला देवशयनी एकादशी किंवा पंढरपूरची एकादशी म्हणूनही ओळखले जाते. हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा दिवस आहे. भक्त मोठ्या उत्साहाने उपवास करतात. राज्यात आषाढी एकादशीचा उत्साह असून, राज्यातील बहुतांश मंदिरात आज महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यात आषाढीचा उत्सव रविवारी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणार असल्याने राज्यातील सर्व मंदिरे उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहेत. गोव्याचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांखळी श्री विठ्ठल मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली असून, मंदिरात भक्तांच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सांखळी विठ्ठलापूर मंदिरात दरवर्षी आषाढीला गर्दी होते. यंदाही गर्दी होणार असल्याने त्याची तयारी मंदिर व्यवस्थापनाने केलेली आहे.
पणजी, पानवेल-रायबंदर, ताळगाव, माशेल, कुंभारजुवे, आखाडा, म्हापसा, मडगाव, सांगे, शिरोडा, फोंडा आदी ठिकाणच्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त महामस्तकाभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त राज्यातील सर्व मंदिरात धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.
राज्यातील तमाम विठ्ठलभक्त आषाढी एकादशीनिमित्त उपवास करीत आहेत. उपवास असणाऱ्या भाविकांसाठी काही मंदिरात फळे व उपवासाचे पदार्थ देण्याची सोय करण्यात आली आहे.
दरम्यान, गोवा राज्यातून पंढरपूरला गेलेल्या भाविकांच्या दिंड्या 4 जून रोजी पंढरपूरात दाखल झाल्या आहेत. त्यातील बहुतांश वारकरी बांधवांनी पंढरपुरातील चंद्रभागेच्या नदी पात्रात पवित्र स्नान केले. हजारो भाविकांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या कळसाचे तर काही भाविकांनी श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे मुखदर्शन घेऊन धन्य धन्य झाल्याच्या भावना आपल्या मनात साठवल्या.