हैदराबादमधील कार्यक्रम सुव्यवस्थित
मुख्यमंत्री रेड्डीसोबत खेळला फुटबॉल सामना : राहुल गांधींना जर्सी भेट
वृत्तसंस्था/ हैदराबाद
कोलकातामधील गोंधळानंतर दिग्गज फुटबॉलपटू मेस्सी शनिवारी सायंकाळी हैदराबादमध्ये दाखल झाला. येथील संपूर्ण कार्यक्रम सुव्यवस्थितपणे पार पडला. मेस्सीने राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये कार्यक्रमाचा आनंद घेत चाहत्यांनाही खूष केले. चाहत्यांनी मेस्सीसोबत मनमुराद आनंद अनुभवला. कोलकातामध्ये घडलेला गोंधळ पाहता हैदराबादमधील स्पर्धेसाठी कमी प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. तथापि, येथे सर्वकाही व्यवस्थित दिसत होते. हैदराबाद भेटीत मेस्सीने मुख्यमंत्री रे•ाRसोबत फुटबॉल सामना खेळण्यात काही वेळ घालवला. तसेच येथील कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राहुल गांधींना त्याने भेटीदाखल जर्सी प्रदान केली.
मुख्यमंत्री रेवंत रेड्डी 9एस आणि अपर्णा ऑल-स्टार्स यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या सामन्यामुळे कार्यक्रमस्थळी उत्साही वातावरण निर्माण झाले. किक-ऑफ झाल्यानंतर काही मिनिटांतच स्टेडियममध्ये मेस्सी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आगमन झाले. काँग्रेस नेते राहुल गांधी आधीच स्टेडियममध्ये उपस्थित होते, तर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी देखील यांचाही प्रामुख्याने सहभाग होता. मुख्यमंत्र्यांनी स्वत: गोल करून आपल्या संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली.
प्रस्तुतीकरण समारंभाने कार्यक्रमाची सांगता करताना मेस्सीने चाहत्यांना स्पॅनिश भाषेत संबोधित केले. गेल्या काही वर्षांपासून भारतीय चाहत्यांनी दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. भारतात वेळ घालवणे आणि समर्थकांना भेटणे हा एक सन्मान असल्याचे तो म्हणाला. यावेळी त्याने अर्जेंटिनाच्या विश्वचषक विजयादरम्यान मिळालेल्या पाठिंब्याची आठवण करून दिली.