महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जागावाटपाचा पेच वाढविणार बसपची एंट्री

06:50 AM Jan 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ननवी दिल्ली

Advertisement

सत्तारुढ भाजपला कोंडीत पकडण्याऐवजी विरोधी पक्षांची आघाडीतील पक्ष स्वत:च्याच सहकाऱ्यांना अडचणीत आणू पाहत आहेत. मध्यप्रदेश निवडणुकीपासून काँग्रेस आणि समाजवादी पक्षांच्यात आलेली कटूता संपून जागावाटपाच्या दिशेने चर्चा जात असल्याचे चित्र असताना बसपला आघाडीत आणण्याच्या प्रयत्नांची कबुली काँग्रेसकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी मायावती यांचे मौन पाहता बसप देखील ‘इंडिया’त सामील होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मानले जात आहे.

Advertisement

सप, बसप, काँग्रेस आणि रालोद ही आघाडी निश्चितपणे भाजपविरोधात हुकमी ठरू शकते, परंतु या ‘केमिस्ट्री’च्या वाटेत जागांचे ‘गणित’ जुळविणे मोठे आव्हान आहे. एकीकडे बसपचे विरोधक अखिलेश यादव यांची मनधरणी करणे आणि दुसरीकडे जागावाटपात काँग्रेसला उत्तरप्रदेशातील स्वत:ची दावेदारी जवळपास निकालात काढावी लागणार आहे. उत्तरप्रदेशात जवळपास 20 टक्के मते मिळविणाऱ्या बसपला वगळून विरोधी पक्षांची आघाडी यशस्वी होणे अवघड मानले जाते. बसपला सपकडून विरोध सुरू असताना काँग्रेस नेत्यांनी पडद्याआडून बसपसोबत चर्चा चालविली होती.

बसपची गॅरंटी कोण घेणार?

अलिकडेच काँग्रेस नेतृत्वासोबत झालेल्या उत्तरप्रदेशच्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत बसपला आघाडीत सामील करण्याची मागणी झाली होती. तर इंडियाच्या बैठकीत अखिलेश यादव यांनी उघडपणे याला विरोध दर्शविला होता. तरीही काँग्रेसने बसपसोबतची चर्चा थांबविली नाही. आघाडीचे काही साथीदार बसपसोबत चर्चा करत असल्याची पुष्टी काँग्रेसचे उत्तरप्रदेश प्रभारी अविनाश पांडे यांनी दिली आहे. यावर अखिलेश यादव यांनी बसपची गॅरंटी कोण घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

सपवर बरसल्या मायावती

मायावती यांनी अखिलेश यादव यांच्या विरोधानंतर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सप संस्थापक मुलायम सिंह यादव यांनीच भाजप खासदारांना विजयासाठी आशीर्वाद दिले होते असे मायावती यांनी म्हटले. परंतु त्यांनी यावेळी काँग्रेसबद्दल एकही टिप्पणी केलेली नाही, हे पाहता बसप आणि काँग्रेसमधील चर्चा सकारात्मक दिशेने असल्याचे मानले जात आहे.

बसप आघाडीत सामील झाल्यास...

सप, काँग्रेस आणि रालोदच्या आघाडीत बसप सामील झाल्यास उत्तरप्रदेशात भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते, परंतु या नव्या आघाडीची स्थापनाच अवघड मानली जाते. जागावाटपावरून अनेक दिवस चाललेल्या वाटाघाटीनंतर सपने 58-60 जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी चालविली होती. तर काँग्रेसने 25 जागांवर दावा केला असला तरीही सपकडून केवळ 15 जागांवर काँग्रेसची बोळवण केली जाणार असल्याचे मानले जात होते. उर्वरित जागा रालोद आणि भीम आर्मीला देण्याचा निर्णय घेतला जाणार होता.

बसपला विरोध

अखिलेश यादव हे बसप आघाडीत सामील होऊ नये या मताचे आहेत. कारण बसप हा विश्वासार्ह नाही असे सपच्या एका नेत्याने म्हटले आहे. तरीही बसप इंडिया आघाडीत सामील झाल्यास सप 40 जागा स्वत:च्या पदरात पाडवून घेण्याची योजना आखत आहे. उर्वरित 40 जागा काँग्रेस, बसप आणि रालोदने परस्परांमध्ये वाटून घ्याव्यात अशी सपची योजना आहे. हा प्रस्ताव मान्य न झाल्यास प्रत्येकी जागा सप आणि बसपने लढवाव्यात, तर 12 जागा काँग्रेसला आणि तीन जागा रालोद तर एक जागा भीम आर्मीसाठी सोडण्याची तयारी आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#akaluj #tarunbharatnews#social media
Next Article