दुर्गामाता दौडमध्ये सळसळत्या तरुणाईचा उत्साह
लष्करी अधिकाऱ्यांचाही सहभाग : गांधीनगर, शिवाजीनगर येथे जल्लोषात स्वागत
बेळगाव : ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’ असे म्हणत मंगळवारी हजारोंच्या संख्येने धारकरी दौडमध्ये सहभागी झाले. केवळ शिवभक्तच नाही तर देशाची सेवा बजावणारे भारतीय लष्कर, तसेच पोलीस विभागानेही दुसऱ्या दिवशीच्या दौडमध्ये सहभाग नोंदवला. शिवशंभूंचा गजर करत आई अंबाबाई तुळजाभवानीच्या नावाचा जयघोष करत मोठ्या संख्येने तरुणाई दौडमध्ये सामील झाल्याने गांधीनगर, किल्ला परिसर दुमदुमला. मंगळवारी चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरापासून दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. एसीपी कट्टीमनी व नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. त्यानंतर ध्वज चढविण्यात आला. प्रेरणामंत्र म्हणून दुर्गामाता दौडीला चालना देण्यात आली. खडक गल्ली, चव्हाट गल्ली, शिवाजीनगर, गांधीनगर या भागामध्ये दौडचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवाजीनगर येथे लहान मुलांनी आकर्षक देखावे सादर केले होते. यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित बाहुल्यांचा देखावा लक्षवेधी ठरला. त्याचबरोबर दुर्गादेवीची रूपे, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील देखावे सादर करण्यात आले हेते. याबरोबरच गांधीनगर येथेही मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यात आले. स्वागतासाठी सर्वत्र भगव्या पताका, स्वागत कमानी, फुलांची आरास करण्यात आली होती. किल्ला येथे महार रेजिमेंटच्यावतीने दुर्गामाता दौडीचे स्वागत करण्यात आले. लष्करी अधिकाऱ्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी कर्नल एम. पी. सिंग, लेफ्टनंट कर्नल गौरव शेगाव, मेजर सम्राट भुत्ते, सुभेदार मेजर जसविंदर सिंग यासह कायदा व सुव्यवस्था विभागातील डीसीपी नारायण बरमणी यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते. ध्वज उतरवून आज दुसऱ्या दिवशीच्या दौडची सांगता झाली.
गुरुवार दि. 25 रोजी दौडीचा मार्ग
धर्मवीर संभाजी चौक येथून दौडला प्रारंभ होणार आहे. किर्लोस्कर रोड, रामलिंगखिंड गल्ली, अशोक चौक, बसवाण गल्ली, लक्ष्मी मंदिर, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, कडोलकर गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्ली, बुरुड गल्ली, मेणसी गल्ली, आझाद गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, पांगुळ गल्ली, गणपत गल्ली, कांदा मार्केट, मेणसी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कसाई गल्ली, कसाई गल्ली बोळ, कामत गल्ली, पी. बी. रोड, मार्केट पोलीस स्टेशन, शेट्टी गल्ली, भडकल गल्ली, कोर्ट कॉर्नर, सरदार्स ग्राऊंड रोड, सन्मान हॉटेल, कॉलेज रोड, यंदे खूट, किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली, बापट गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात सांगता होणार आहे.