महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कार्तिकीचे प्रबोधन

06:29 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या वैष्णवांचे आराध्य म्हणजे पंढरीचा पांडुरंग. पंढरीचा महिमा अगाध आहे. सर्व जाती जमातींना समरसतेचा संदेश देणारा आहे. पंढरीत आज पांडुरंगाची कार्तिकी एकादशी निमित्ताने महापूजा होत आहे आणि ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. कार्तिकीसाठी पंढरीत विठू नामाचा गजर सुरू आहे. वारकरी लहान मोठ्या सहा वाऱ्या करतात. त्यामध्ये आषाढी व कार्तिकी या एकादशींना मोठ्या एकादशी असे संबोधले जाते. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी किंवा बोधिनी एकादशी असेही म्हटले जाते. आषाढीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून विठ्ठल अर्थात विष्णू झोपी जातात आणि पुढील चार महिने वारकरी, वैष्णव आणि धार्मिक मंडळी चातुर्मास पाळतात. कार्तिकीला चातुर्मास समाप्त होतो. भगवान विष्णू, योग निद्रेतून जागे होतात आणि पुन्हा चराचराच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात अशी श्रद्धा आहे. त्यामुळे या एकादशीला देव उठी एकादशी असेही म्हटले जाते. याच एकादशीनंतर तुलसीविवाह होतो व कार्तिक पौर्णिमेपर्यंत तो चालतो. कार्तिक महिन्यात दीप उजळले जातात. नदीचे घाट आणि देऊळात दीप लावले जातात, एका अर्थाने ही प्रकाशाची पूजा असते. त्यामुळे या एकादशीचे प्रबोधिनी हे नाव किती सार्थ आहे हे लक्षात येते. अज्ञानाचा अंध:कार दूर करून प्रबोधनाची प्रकाशाची पूजा म्हणून या एकादशीला आणि पुढे पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या दीप उत्सवाना महत्त्व आहे. खरीप हंगाम संपवून रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण झालेली असते आणि कष्टाने थकला भागला शेतकरी, वारकरी, पंढरीच्या पांडुरंगाच्या पायावर डोके ठेऊन चंद्रभागेत स्नान करून कृतार्थ होतो. पिढ्यान्पिढ्या हे सुरू आहे. म्हणूनच ‘जेव्हा नव्हते चराचरा तेव्हा होते पंढरपूर’ असे म्हटले जाते. पंढरपूरचे महत्त्व आणि वारीला, दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या दिसामाझी वाढते आहे. कोरोना काळात कोंडली गेलेली माणसे धार्मिक व अन्य पर्यटनासाठी बाहेर पडलेली दिसत आहेत. अर्थव्यवस्थाही सुधारताना दिसत आहे. दसरा, दिवाळी दरम्यान झालेली व्यापारी उलाढाल नवे विक्रम साधणारी आहे. भारताची अर्थव्यवस्था चार ट्रिलियन होण्यास फार काळ लागणार नाही असे अंदाज आहेत. दिवाळी काळात एस. टी. व रेल्वे यांनी उत्पन्नाचे नवे विक्रम केले. यातून अनेक गोष्टी निदर्शनास येतात. महाराष्ट्रात एस. टी. महामंडळाने महिलांना 50 टक्के तिकीट सवलत दिली आहे तर कर्नाटकात तेथील परिवहन मंडळाने मोफत प्रवास सुविधा दिली आहे. ओघानेच महिला मोठ्या संख्येने प्रवास करताना दिसत आहेत. पंढरपूर असो, तुळजापूर, अष्टविनायक किंवा शिर्डी, शेगाव सर्व क्षेत्री गर्दी होताना दिसते आहे. पंढरपूरला कार्तिकीला महिलांसह भक्तगण गर्दी करणार हे वेगळे सांगायला नको. गर्दीचे उच्चांक आणि राजकारणाची गणिते यामुळे अशी तीर्थक्षेत्रे आंदोलनभूमी बनतात असे गेल्या काही वर्षात आढळून आले आहे. महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे कुणा एका पक्षाचे सरकार सत्तारूढ नाही. आघाड्या, युत्या त्याच्या वाटण्या यामुळे राज्याचा खेळखंडोबा झाला आहे. खरे तर देवस्थाने, शाळा, शिक्षण संस्था ही क्षेत्रे राजकारणातून दूर हवीत पण, देवाला झालेली गर्दी आपलीसी करण्यात नेत्यांना, पक्षाला रस असतो त्यामुळे एकादशी असो, वारी असो, दहीहंडी असो अथवा गणेशोत्सव वा शिवजयंती राजकीय मंडळी संधीवर स्वार होण्यासाठी टपून असतात आणि त्यांचे चेलेही या कामात त्यांना साथ देतात. राज्यात युतीची सत्ता होती तेव्हा आषाढीची पूजा मुख्यमंत्री व कार्तिकीची पूजा उपमुख्यमंत्री करत. पंढरपूर समिती एका पक्षाकडे तर शिर्डी दुसऱ्या पक्षाकडे अशी वाटणी होती. आता नवा पेच आला आहे. राज्यात तीन पक्षांचे सरकार आणि एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे पूजा कोण करणार असा ताण होता. राज्यात आणि देशात हिवाळी अधिवेशनाचा बिगूल वाजला आहे. आणि महाराष्ट्रात आरक्षणावरून ताणतणाव निर्माण झाला आहे. मराठा समाजाला सत्वर आरक्षण व ओबीसी दाखले द्या, यासाठी जरांगे पाटील व मराठा समाज संघटनांनी सारा महाराष्ट्र ढवळून काढला आहे. तर ओबीसी संघटना मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, आरक्षणाला विरोध नाही पण, सरसकट ओबीसी दाखले नकोत अशी भूमिका घेऊन एकवटला आहे. राज्यातील धनगर समाजही आरक्षणाच्या मुद्यावर रस्त्यावर उतरला आहे. यात कोणत्या जातीना काय मिळणार हे कोणालाच निश्चित सांगता येत नाही. मराठा, धनगर, माळी, वंजारी या जातीची महाराष्ट्रात मोठी लोकसंख्या आहे. या जाती मतपेटी करून सरकारला वाकवताना दिसत आहेत. जोडीला एकमेकांना इशारे देताना दिसत आहेत. यातून जी तेढ वाढली आहे ती राज्याला कुठे नेऊन ठेवते हे पहावे लागेल. पण, जे सुरू आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभादायक नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही असे इशारे व महापूजा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते करावी अशी मागणी करण्यात आली होती. पण, आता मराठा आंदोलक व राज्य सरकार यांच्यात चर्चा होऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजा करावी असे ठरले आहे. अलीकडे देवस्थानच्या ठिकाणी आंदोलने, इशारे हे योग्य वाटत नाही. आपल्या मागण्या, त्यासाठीचा संघर्ष यासाठी लोकशाहीत अनेक आयुधे आहेत. सर्वच पक्षांनी, संघटनांनी आणि नेत्यांनी त्यांचे भान राखावे. प्रबोधिनी एकादशीचे तेच खरे बोधन आहे. आता नागपुरात विधीमंडळाचे आणि दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होईल. सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा आणि पाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यासाठीची व्युहरचना सुरू झाली आहे. मध्यप्रदेश, राजस्थानसह पाच राज्यात काय निकाल येतात यावर दिशा स्पष्ट होईल. पण, महाराष्ट्रात जातीय तेढ आणि आरक्षणासाठीची रस्त्यावरची लढाई तीव्र झाली आहे. विधीमंडळातही ती अधिक तीव्र होईल असा कयास आहे. कार्तिकी एकादशीला जाताना, विठ्ठलाच्या पायावर माथा टेकताना आणि प्रबोधिनी एकादशीचा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवा प्रज्वलित करताना सर्वांनीच समतेचा, समरसतेचा, बंधुभावाचा आणि एकतेचा विचार दृढ केला पाहिजे. विठू नामाचा गजर करताना भागवत धर्माचा आचारविचार जपला पाहिजे त्यातच सार्वहित आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article