सचिनचा पाठलाग करणारा ‘इंग्लिशमन’ !
सचिन तेंडुलकरनं कसोटी सामन्यांत उभारलेला 15 हजार धावांचा विक्रम हा बऱ्याच वर्षांपासून अविचल राहिलाय अन् हा डेंगर सर करणं कुणाला जमेल हा उत्सुकतेचा प्रश्न राहिलाय...याबाबतीत सध्या सचिनच्या मागावर आहे तो इंग्लंडचा आधारस्तंभ बनलेला ज्यो रूट...महान भारतीय फलंदाजाला मागं टाकण्यासाठी त्याला 2 हजार धावांची आवश्यकता असून त्यादृष्ठीनं पुढील महिन्यात होणारी ऑस्ट्रेलियाविरुद्धची ‘अॅशेस’ मालिका मोठी भूमिका बजावेल...रूटची सचिनबरोबरच त्याच्या समकक्ष इतर तीन दिग्गज फलंदाजांशी केलेली ही तुलना...
भारताच्या दौऱ्यातील शेवटची पाचवी कसोटी...इंग्लंडच्या डावातील 101 वं षटक...अंशुल कंबोजनं चेंडू टाकला तो ताशी 119 किलोमीटर्स वेगानं...इंग्लंडच्या त्या दिग्गज फलंदाजानं अतिशय शांतपणे ‘डीप पॉईंट’ क्षेत्रात त्याला दिशा दाखविली आणि शतक पूर्ण केलं...त्यानंतर तो बनला कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज...ज्यो रूट...पहिल्या स्थानावर अर्थातच भारताचा महान सचिन रमेश तेंडुलकर !
11 वर्षांपूर्वीची गोष्ट...सध्या हयात नसलेले न्यूझीलंडचे विख्यात फलंदाज मार्टिन क्रो यांनी म्हटलं होतं की, येऊ घातलेल्या दशकात कसोटीत पहिलं स्थान मिळविण्यासाठी शर्यत लागेल ती भारताचा विराट कोहली, इंग्लंडचा ज्यो रूट, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आणि न्यूझीलंडचा केन विल्यमसन यांच्यात...क्रो यांची भविष्यवाणी अक्षरश: 100 टक्के खरी ठरलीय. त्या सर्वांनी क्रिकेट विश्वाला दर्शन घडविलं ते अप्रतिम फलंदाजीचं. पण रूटची बातच न्यारी...वयाचा विचार केल्यास सर्वांत लहान असलेल्या ज्योनं कोव्हिडनंतर झपकन मुसंडी मारली. महामारीनंतरच्या 66 कसोटी लढतींत त्यानं नोंद केलीय ती 22 शतकांच्या साहाय्यानं 5 हजार 944 धावांची, सरासरी 55.55...
ज्यो रूटला कोव्हिडमुळं छान संधी मिळाली ती फलंदाजीतील दोषांवर उत्तरं शोधण्याची आणि त्यानंही ती गमावली नाही. त्याचा गोंधळ उडायचा तो फिरकी गोलंदाजांना अन् आखूड टप्प्याच्या चेंडूंना सामोरं जाताना. रूटचा नेहमी विचार चाललेला असतो तो हात, डोकं व पाय यांच्यातील समन्वयाचा...महत्त्वाची बाब म्हणजे त्याला कळून चुकलं की, धावा बनतात त्या निर्दोष फलंदाजीमुळंच. ‘मी चेंडू खेळताना चुकीच्या पद्धतीचा वापर केला, तरी हरकत नाही. परंतु त्याला यष्ट्यांपासून व क्षेत्ररक्षकांपासून दूर ठेवणं अत्यंत आवश्यक’, ज्यो म्हणतो. त्यानं चुकांवर मात करण्यासाठी तातडीनं संपर्क साधला तो इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसेनशी. ते समालोचक असल्यानं त्यांनीही वेळ न गमावता त्याच्यासाठी व्यवस्था केली ती आवश्यक ‘फुटेज’ची...
आकड्यांचा विचार केल्यास कोव्हिड महामारीनंतरच्या कालावधीत (2020 ते 2025) केन विल्यमसननं 25 कसोटी सामन्यांत 2 हजार 800 धावा नोंदविल्या त्या 66.66 सरासरीनं व 12 शतकांच्या साहाय्यानं...स्टीव्ह स्मिथ एकाग्रतेच्या बाबतीत गोंधळलेला दिसत असला आणि त्याची सरासरीही कमी झालेली असली, तरी त्यानं 45 कसोटींत 3 हजार 250 धावा जमविल्या त्या 10 शतकांच्या जोरावर. सरासरी 45.13...फक्त विराट कोहली तेवढा 2020 नंतर अफाट गुणवत्तेला न्याय देण्यास कमी पडला. 1 जानेवारी, 2015 ते 1 जानेवारी, 2020 या कालावधीत भारताच्या या माजी कर्णधारानं 52 कसोटींत 18 शतकांसह 4848 धावा खात्यात जमा करताना नोंद केली होती ती 62.15 सरासरीची. शिवाय त्यात समावेश होता तो तब्बल सात द्विशतकांचा...
कोहलीची त्यानंतरची घसरण केवढी मोठी हे पुढील आकडेवारीवरून कळून चुकेल...त्यानं जेव्हा निवृत्तीचा निर्णय जाहीर केला तेव्हा म्हणजे 2020 पासूनच्या 37 कसोटी लढतींत फटकावल्या त्या 32.09 सरासरीनं फक्त 1 हजार 990 धावा आणि त्यात अंतर्भाव अवघ्या तीन शतकांचा (कारकिर्दीत एकूण शतकं 30)...प्रत्येक फलंदाजाच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा काळ म्हणजे 27 ते 32 वर्षं. ज्यो रूटनं या कालावधीत अक्षरश: खोऱ्यानं धावा जमविल्या असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. शिवाय ‘टी-20’ क्रिकेटवर फारसं लक्ष केंद्रीत न करण्याचा निर्णय सुद्धा फायदेशीर ठरला. त्यामुळं त्याला वेळ मिळाला तो तंदुरुस्ती व्यवस्थित सांभाळण्यासाठी व भरपूर विश्रांती घेण्यासाठी...
रूटच्या कारकिर्दीतील 158 कसोटींचा विचार केल्यास त्याला चुकले ते अवघे दोन सामने. एकदा वगळल्यामुळं, तर दुसऱ्यांदा अपत्यप्राप्तीमुळं. जेव्हा तो इंग्लंडचा कर्णधार होता तेव्हा वाटायचं की, सगळ्या जगाचा भार त्याच्या खांद्यांवर येऊन पडलाय. त्याची सरासरीही ‘बाझबॉल’च्या जमान्यात पोहोचली 46.44 वर. त्यानंतर मात्र धूर्त ज्योनं वेळ न गमावता कर्णधारपदाला रामराम म्हणणंच पसंत केलं व त्याला पूर्वीचा फॉर्म गवसला देखील. कर्णधारपदाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्यो रूटनं 41 कसोटी सामन्यांत 58 सरासरीनं हाणल्याहेत त्या 3 हजार 654 धावा नि त्यात समावेश 14 शतकांचा...
विराट कोहलीप्रमाणं घणाघाती ‘कव्हर ड्राईव्ह’ वा ‘ग्लॅमर’ रूटकडे नाहीये. तो विल्यमसनइतका शांत, संयमी सुद्धा नाही. पण ज्यो व्यवस्थित किल्ला उभारतो ते उजव्या यष्टीवरील चेंडूला फ्लिकच्या साहाय्यानं मिडविकेट क्षेत्रातून हाणून वा पॉईंटची दिशा दाखवून किंवा क्षेत्ररक्षकांमधील अंतर शोधून आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना ‘स्ट्राईक’ फिरवत राहण्यावर भर देऊन...त्याच्या भात्यात बऱ्यापैकी रिव्हर्स स्वीपही दडलाय. या सर्वांच्या मदतीनं ज्यो रूटची इंग्लंडनं जिंकलेल्या कसोटींचा विचार करता चौथ्या डावातील सरासरी पोहोचलीय ती 113 वर अन् त्यात समावेश दोन शतकांचा...रूट सध्या सचिन तेंडुलकरपेक्षा मागं आहे तो 2 हजार 378 धावांनी नि सारं भवितव्य ठरविणार ती येऊ घातलेली अॅशेस मालिका...सचिननं 200 कसोटींत नोंद केली ती 15921 धावांची. त्यात नाबाद 248 ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या, तर सरासरी 53.78. त्यामध्ये समावेश 51 शतकं नि 68 अर्धशतकांचा !
- राजू प्रभू