इंडिगो विमानाचे इंजिन हवेतच बिघडले
163 प्रवाशांसह सर्वजण सुरक्षित : कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग
वृत्तसंस्था/ कोलकाता
163 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांसह बेंगळूरला रवाना झालेल्या इंडिगोच्या विमानाचे नुकतेच येथे इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. बेंगळूरला जाणाऱ्या या विमानाच्या इंजिनमध्ये हवेत असतानाच बिघाड झाल्याने हा प्रकार घडल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या प्रकारानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.
विमानाचे टेकऑफ झाल्यानंतर उजवे इंजिन योग्यरित्या काम करत नसल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने तात्काळ कोलकाता एअर ट्राफिक कंट्रोलशी संपर्क साधत विमानाचे आपत्कालीन लँडिंग केले. सुरक्षेचे कारण लक्षात घेऊन विमानतळावर तैनात करण्यात आलेल्या आपत्कालीन सेवांनाही धावपट्टीवर सज्ज ठेवण्यात आले. इमर्जन्सी लँडिंगनंतर प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले आणि विमानतळ अभियंत्यांनी विमानाच्या दुऊस्तीचे कामही सुरू केले. सुदैवाने ही बाब वेळेत लक्षात आल्यामुळे मोठा अपघात टळला. विमानाचे किंवा प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही.