For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हरियाणात आता 5 ऑक्टोबरला मतदान

06:28 AM Sep 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरियाणात आता 5 ऑक्टोबरला मतदान
Advertisement

विधानसभा निवडणूक : जम्मू-काश्मीरसह हरियाणात 8 ऑक्टोबरला मतमोजणी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

निवडणूक आयोगाने हरियाणा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. आता राज्यात 1 ऑक्टोबरऐवजी 5 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर हरियाणा आणि जम्मू-काश्मीर या दोन्ही राज्यातील मतमोजणीच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये आता 4 ऑक्टोबर ऐवजी 8 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

Advertisement

निवडणूक आयोगाने शनिवारी मतदान कार्यक्रम पत्रिकेतील बदलासंबंधी निवेदन जारी केले. हरियाणातील आगामी सण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. बिष्णोई समाजाच्या मतदानाचा हक्क आणि परंपरा या दोन्हींचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील लोक गुरु जंबेश्वरांच्या स्मरणार्थ शतकानुशतके असोज अमावस्या सण साजरा करत असल्यामुळे तारखेत बदल करण्यात आला आहे.

हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबर 2024 रोजी संपणार आहे. विधानसभेच्या शेवटच्या निवडणुका ऑक्टोबर 2019 मध्ये झाल्या होत्या. निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि जननायक जनता पक्षाच्या युतीने राज्य सरकार स्थापन केल्यानंतर मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री झाले. मात्र, नंतर समीकरणे बदलल्यानंतर पक्षाने नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री केले.

भाजप-आयएनएलडीचीही मागणी

भाजप आणि इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) यांनीही निवडणूक आयोगाकडे तारीख बदलण्याची मागणी केली. आठवड्याचे शेवटचे दिवस, सार्वजनिक सुट्ट्या आणि धार्मिक सणांमुळे मतदानाची तारीख (1 ऑक्टोबर) पुढे करण्याची लेखी विनंती दोन्ही पक्षांनी आयोगाला केली होती. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे लोक शहराबाहेर जाऊ शकतात, त्यामुळे मतदानाची टक्केवारी कमी होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली होती.

हरियाणामध्ये एकाच टप्प्यात मतदान

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने याआधी हरियाणामध्ये 1 ऑक्टोबरला मतदान घेण्याची घोषणा केली होती. 4 ऑक्टोबरला निकाल लागणार होता. यासोबतच जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुकीच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या. इथेही निकाल 4 ऑक्टोबरलाच लागणार होता. मात्र आता आयोगाने तारखा बदलल्यानंतर मतमोजणी 8 ऑक्टोबरला होणार आहे.

Advertisement
Tags :

.