कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शेवट गोड झाला नाही

06:12 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कालचा अंतिम सामना सुरू होण्याअगोदर अहमदाबाद पूर्ण शहर निळे झाले होते. क्षणभर आकाश अहमदाबादच्या भूतलावर अवतरलं की काय असं वाटत होतं. सामना सुरू होण्याअगोदर 140 करोड भारतीय क्रिकेटप्रेमींनी देवाला साकडं घातलं होतं. हे परमेश्वरा, काही अघटित न घडो, एवढीच तुझ्याकडे प्रार्थना. परंतु स्वर्गातल्या क्रिकेटच्या देवाने तथास्तु म्हणणं टाळलं. माझ्या मते काल परमेश्वराने भारतावर अन्याय केला. किंबहुना नियतीने काल न्याय केला नाही.

Advertisement

खरं तर हा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने जिंकला हे अजूनही मला स्वप्नवत वाटतंय. सामना सुरू होण्याअगोदर हे हॅझलवूड, पॅट कमिन्सचे चेंडू अचानक खाली तर राहणार नाहीत ना, महत्त्वाचा फलंदाज प्लेडऑन तर नाही ना होणार, या सर्व शंकेची पाल मनात चुकचुकत होती. 1983 चा वर्ल्डकप म्हणा किंवा 2011 चा वर्ल्डकप, आपण शंभर टक्के जिंकूच अशी खात्री नव्हती. तरी आपण दिमाखाने आपण तो विश्वचषक गगनात उंचावला. 1983 चा वर्ल्डकपमध्ये कपिलने रिचर्ड्सचा मागे जात घेतलेला झेल अर्थात तो झेल नव्हता तर साक्षात कपिलच्या रुपात परमेश्वर होता. 2011 मध्ये गौतम गंभीर आणि धोनीच्या रूपात देव प्रकटला होता. या सामन्यात मात्र कोणाच्याही रूपात देव प्रकटला नाही. खऱ्या अर्थाने करोडो भारतीय निराश झाले.

Advertisement

या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर कांगारुंनी पहिले आप म्हणण्यात धन्यता मानली. पुन्हा एकदा पहिल्या दहा षटकात रोहितचा आक्रमक अॅप्रोच बघायला मिळाला. गंमत बघा, पहिल्या दहा षटकात सोन्यासारखी वाटणारी खेळपट्टी पुढच्या 30 षटकात चांदीची झाली. कालच्या सामन्यात संथ खेळपट्टीवर कोहली-राहुलची समंजस खेळी बघायला मिळाली खरी. परंतु धावसंख्येला निर्णायक आकार देऊ शकली नाही. कमिन्स, स्टार्क, हॅझलवूड यांनी खेळपट्टीचा छान फायदा उठवला. अर्थात त्यांच्या क्षेत्ररक्षकांची सुद्धा साथ फार तोलामोलाची होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार या महत्वपूर्ण सामन्यात थोडासा उजवा वाटला. त्याने घेतलेले प्रत्येक निर्णय संघाच्या पथ्यावर पडले. पहिले तीन झटपट गडी बाद करून सुद्धा भारतीय गोलंदाजांना या सामन्यावर पकड ठेवता आली नाही हे भारताचे दुर्दैव.

मी काल म्हटलं होतं की डेव्हिड वॉर्नर, ट्रॅवीस हेड डोकेदुखी ठरू शकतात. आणि नेमकं काल तेच घडलं. कठीण परिस्थितीतून संघाला बाहेर कसं आणायचं हे ऑस्ट्रेलिया संघाला चांगलंच अवगत झालंय. त्याचीच प्रचिती कालच्या सामन्यात आली. कालच्या सामन्यात भारताचं नेमकं चुकलं तरी कुठे, रोहितचा आतताईपणा, विराटचं प्लेडऑन होणं की पहिले तीन झटपट गडी बाद होऊन सुद्धा गोलंदाजांना आलेल अपयश?

पहिले दहा सामने दिमाखात जिंकून सुद्धा महत्त्वाचा सामना हातातून गमावला, यासारखी क्लेशदायक गोष्ट ती कुठली. या पूर्ण स्पर्धेत भारताने चमकदार कामगिरी केली होती. परंतु महत्त्वाच्या सामन्यात खऱ्या अर्थाने कच खाल्ली. आपण आयसीसीच्या बऱ्याच स्पर्धेत भारताचा खेळ पाहिला. काही सामने जिंकले काही हरले. परंतु या विश्वचषक स्पर्धेत भारताएवढा बलवान संघ मी तरी बघितला नव्हता. तुम्ही वाचक म्हणून माझ्या मताशी शंभर टक्के सहमत असाल. अर्थात ऑस्ट्रेलियन संघ अंतिम सामन्यात पोहोचण्याअगोदर तो काही दादा संघ नव्हता. आयुष्यात नशिब फार महत्त्वाचा फॅक्टर असतो. आज नशिबाचं पारडं कांगारूंच्या बाजूने थोडसं जास्त झुकलेलं दिसलं. कांगारूच्या मधल्या फळीतील फलंदाजाचं कौतुक करावंच लागेल. विशेषत: ट्रेवीस हेड आणि लाबूशेन यांनी कांगारूची नैया पैलतिरी पोचवली. धकाधकीच्या जीवनात करोडो भारतीयांना वैयक्तिक जीवनात  सुखदुखांना सामोरे जावे लागते. परंतु ज्यावेळी क्रिकेटमध्ये विशेषत: वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ विश्वचषक उंचावतो, त्यावेळी काही दिवस आपली दु:खं नाहीशी होतात. परंतु काल आपल्या पदरी निराशाच आली. 2003 मध्ये धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ हरला होता. आणि 2023 मध्ये प्रथम फलंदाजी करताना आपण ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरलो.

असो. आज आपला दिवसच नव्हता. 2023 हे वर्ष खेळासाठी फलदायी ठरलं होतं. आशियाई क्रीडा स्पर्धेत शंभरच्यावर पदकं पटकावली. पुरुषांनी आणि महिलांनी क्रिकेट स्पर्धेत सुवर्णपदकं पटकावली. 2023 या वर्षाचा शेवट विश्वचषक जिंकून गोड करण्याची सुवर्णसंधी भारताला आली होती. ही सुवर्णसंधी भारताने खऱ्या अर्थाने गमावली असंच म्हणावं लागेल. या पूर्ण विश्वचषक स्पर्धेत कधीच न बुडणारी भारताची टायटॅनिक अचानक कशी बुडू शकते, यावर माझाच काय तर तमाम भारतीयांचा विश्वास बसणार नाही. शेवटी सत्य हे स्वीकारावंच लागतं. असो. ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन. सरते शेवटी मी एवढेच म्हणेन की भारतीय संघाचा शेवट गोड झाला नाही एवढं मात्र खरं!

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article