For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर बसस्थानकाची अतिक्रमित जागा ताब्यात घेणार

10:45 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर बसस्थानकाची अतिक्रमित जागा ताब्यात घेणार
Advertisement

सर्वेक्षण केल्याने अतिक्रमण करणाऱ्यांचे धाबे दणाणले : प्राथमिक सर्वेक्षणात बसस्थानकाची जागा असल्याचे सिद्ध

Advertisement

खानापूर : खानापूर बसस्थानक आणि बस डेपोच्या जागेचे मंगळवारी सर्वेक्षण करण्यात आले. बसस्थानक आणि डेपोसाठी खानापूर नगरपंचायतीने 4 एकर 7 गुंठे जागा केएसआरटीसीला हस्तांतर केली होती. मात्र संपूर्ण जागा केएसआरटीसीने ताब्यात न घेता फक्त अडीच एकर जागेत बसस्थानक आणि डेपो उभारण्यात आला होता. याबाबत खानापूर येथील काही जागरुक नागरिकांनी केएसआरटीसीच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यानुसार सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी बसस्थानक जागेचा संपूर्ण सर्वेक्षण केला आहे. यावेळी पारिश्वाड रोड आणि बसस्थानकाच्या मागील रस्त्याच्या पलीकडे जागा असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यामुळे अतिक्रमण केलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.

खानापूर येथे बसस्थानक आणि डेपो उभारणीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. यावेळी गायरान कमिटीच्या नावे असलेली सर्व्हे क्र. 43 आणि 44 ही एकूण 4 एकर 7 गुंठे जागा नगरपंचायतीच्यामार्फत केएसआरटीसीला हस्तांतर करण्यात आली होती. याकामी तत्कालीन आमदार अशोक पाटील यांनी पुढाकार घेऊन बसस्थानक उभारणीसाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नातून खानापूर शहरासाठी बसस्थानक आणि डेपो मंजूर झाला होता. 4 एकर 7 गुंठ्यात बसस्थानक आणि डेपो उभारण्यात आला होता. मात्र तत्कालीन राजकीय हस्तक्षेपामुळे बसस्थानक आणि डेपोचे योग्य नियोजन करण्यात आले नव्हते. त्यामुळे या आराखड्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. तसेच राजकीय हस्तक्षेपामुळे रस्त्यांचेही प्रश्न निर्माण झाले होते.

Advertisement

सर्व्हेसाठी तहसीलदारांना केला होता अर्ज

खानापूर शहराच्या प्रवेशासाठी बसस्थानकामागून रस्ता काढण्यात आला होता. त्यामुळे बसस्थानकाचे नियोजनच चुकले होते. अलीकडे खानापूर शहरातील शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत यशवंत बिरजे, विनायक मुतगेकर यांच्या अन्य जागरुक नागरिकांनी आवाज उठविला आहे. बसस्थानकाच्या जागेबाबत अतिक्रमण झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते. याची दखल घेऊन केएसआरटीसीच्या जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाकडे कागदपत्रांच्या पुराव्यासह बसस्थानकाच्या जागेचा सर्व्हे करण्यात यावा, यासाठी तहसीलदार कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार मंगळवार दि. 27 रोजी बसस्थानकाच्या 4 एकर 7 गुंठे जागेचे संपूर्ण सर्वेंक्षण करण्यात आले. यात डीसीसी बँकेच्या बाजूने ते बसस्थानकाच्या मागील रस्त्यापर्यंत बसस्थानकाची जागा असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणात आढळून आले आहे. यात जांबोटी क्रॉस येथून पारिश्वाड क्रॉसला जाणाऱ्या रस्त्याच्या पलीकडे तसेच बसस्थानकाच्या मागून खानापूर शहराच्या प्रवेशासाठी तयार केलेल्या रस्त्याच्या पलीकडे बसस्थानकाची जागा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नकाशा हाती आल्यानंतर रितसर कारवाई करू

याबाबत केएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, सर्वेक्षणाचा अहवाल आणि नकाशा हाती आल्यानंतर आम्ही रितसर कारवाई करून आमच्या जागेची हद्द निश्चित करणार आहोत. बसस्थानकासाठी मंजूर झालेली जागा पूर्णपणे केएसआरटीसीच्या मालकीची असल्याने यात कोणाचेही अतिक्रमण असल्यास ते दूर करून जागा ताब्यात घेण्यात येणार असल्याचे केएसआरटीसीचे अभियंते रेड्डी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. यावेळी खानापूर बसस्थानक आगाराचे उपव्यवस्थापक विठ्ठल कांबळे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.