हुबळी-पुणे वंदे भारतची चाचणी यशस्वी
हुबळी-मिरज चाचणी : एक्स्प्रेस पाहण्यासाठी नागरिकांची ठिकठिकाणी गर्दी
बेळगाव : हुबळी-पुणे वंदे भारतची चाचणी गुऊवारी यशस्वीरित्या घेण्यात आली. हुबळी ते मिरज यादरम्यानही चाचणी घेण्यात आली. नव्या रंगातील वंदे भारत एक्स्प्रेस पाहण्यासाठी बेळगावच्या नागरिकांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. काही ठिकाणी फुलांची उधळण करत एक्स्प्रेसचे स्वागत करण्यात आले.
बेळगावमध्ये दहा मिनिटांचा थांबा
सकाळी साडेदहा वाजता हुबळी येथून निघालेले एक्स्प्रेस दुपारी सव्वाबारा वाजता बेळगावमध्ये पोहोचली. टिळकवाडी येथील दुसरे रेल्वे गेट, पहिले रेल्वे गेट, रेल्वे स्थानक, तानाजी रेल्वेगेट, गांधीनगर या परिसरात वंदे भारत पाहण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. बेळगावमध्ये दहा मिनिटांचा थांबा घेतल्यानंतर एक्स्प्रेस पुन्हा मिरजच्या दिशेने रवाना झाली. नैऋत्य रेल्वेने दिलेल्या चाचणी वेळापत्रकाप्रमाणेच एक्स्प्रेस योग्य वेळेत दाखल झाली. सायंकाळी देखील दिलेल्या वेळेनुसार वंदे भारत बेळगावला दाखल झाली. यापूर्वी नोव्हेंबर 2023 मध्ये बेंगळूर-बेळगाव वंदे भारतची चाचणी घेण्यात आली होती. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या एक्स्प्रेसचा समावेश होता. यावेळी मात्र केशरी रंगातील नवी एक्स्प्रेस बेळगावकरांना पाहता आली. चाचणी यशस्वी झाल्याने आता बेळगावमधील नागरिकांना पुण्यापर्यंतचा वेगवान प्रवास करता येणार आहे.
तानाजी गल्ली येथे फुलांची उधळण
वंदे भारत रेल्वेबाबत बेळगावच्या नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. गुऊवारी चाचणी घेण्यात आल्याने काही हौशी प्रवाशांनी तानाजी गल्ली रेल्वे गेट परिसरात फुले उधळत आनंद व्यक्त केला.
सोमवारी उद्घाटन
हुबळी-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचे रविवार दि. 15 रोजी उद्घाटन होणार होते. परंतु पंतप्रधानांची वेळ न मिळाल्याने आता सोमवार दिनांक 16 रोजी उद्घाटन होणार आहे. अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसले तरी येत्या दोन दिवसात ते जाहीर होण्याची शक्यता आहे.