खुद्द वीज खातेच गुंतले बेकायदेशीर भू-रूपांतरात
मुख्य वीज अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस
पणजी : सरकारच्या वीज खात्यानेच पेडणे तालुक्यातील मांद्रे येथे बेकायदेशीर डोंगरकापणी आणि भू-रूपांतर केल्याप्रकरणी पेडणे उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शिवप्रसाद नाईक यांनी मुख्य वीज अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस पाठवली असल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी सुनावणी 5 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वा. होणार आहे. मांद्रे येथे सर्व्हे क्रमांक 276/1 च्या 2495 चौ.मी. जागेत कोणत्याही खात्यांकडून परवाना न घेता सरकारी बांधकाम आणि सुरक्षा भिंत उभारण्यात आल्याची तक्रार मांद्रे येथील शुभम सावंत यांनी पेडणे मामलेदारांना केली. मामलेदारांनी जागेची पाहणी करून पाठवलेल्या अहवालावर पेडणे उपजिल्हाधिक्रायांनी थेट सरकारी वीज खात्यालाच कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या नोटिशीत, सदर अधिकाऱ्याने अथवा त्याच्या प्रतिनिधीने सदर बेकायदेशीर कृत्य तात्काळ थांबवण्याचे आणि ही जमीन होती, त्या पूर्वस्थितीत आणण्यास बजावले आहे.