For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक संपली, रेशनकार्डचे काम कधी?

10:45 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक संपली  रेशनकार्डचे काम कधी
Advertisement

लाभार्थी प्रतीक्षेत, शासनाकडून हालचाली थांबल्या : अनेकजण रेशनकार्डपासून वंचित : योजनांमुळे रेशनकार्डच्या मागणीत दुपटीने वाढ

Advertisement

बेळगाव : निवडणूक आणि आचारसंहितेमुळे ठप्प झालेले रेशनकार्डचे काम आता सुरू होणार का? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. मागील कित्येक दिवसांपासून रेशनकार्डचे काम थांबले आहे. त्यामुळे अनेकांना रेशनकार्डपासून वंचित राहावे लागले आहे. विशेषत: शासकीय योजनांपासून चार हात दूर राहावे लागत आहे. त्यामुळे रेशनकार्डच्या कामाला कधी चालना मिळणार याकडेच लाभार्थ्यांचे लक्ष लागले आहे. दारिद्र्या रेषेखालील लाभार्थ्यांना मोफत धान्याचा पुरवठा केला जातो. काँग्रेस सरकारने गॅरंटी योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, गृहज्योती, शक्ती, युवा निधी योजनांचा समावेश आहे. यापैकी अन्नभाग्य आणि गृहलक्ष्मी योजनेसाठी रेशनकार्ड अनिवार्य आहे. मात्र, रेशनकार्डचे कामच बंद असल्याने या योजनेपासून अनेकांना वंचित राहावे लागले आहे. गृहलक्ष्मी योजनेंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेला मासिक 2 हजार रुपये तर अन्नभाग्य योजनेंतर्गत तांदळाऐवजी प्रतिव्यक्ती 170 रुपये दिले जात आहेत. त्यामुळे रेशनकार्डच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. रेशनकार्डसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. मात्र हे अर्जही प्रलंबित आहेत. शिवाय नवीन अर्ज प्रक्रियाही थांबविण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच रेशनकार्डाच्या कामाकडे लक्ष लागून आहे.

बीपीएल कार्डसाठी शेकडो लाभार्थी प्रतीक्षेत

Advertisement

अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री मुनियप्पा यांनी मार्चदरम्यान नवीन रेशनकार्डच्या कामाला चालना देण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्याने हे आश्वासन पूर्ण झाले नाही. मागील दोन वर्षांत रेशनकार्डचे काम विस्कळीत झाले आहे. अनेकांना रेशनकार्डविना राहावे लागले आहे. त्यामुळे शैक्षणिक, शासकीय आणि इतर कामांत नागरिकांना अडचणी येऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातून बीपीएल आणि एपीएल कार्डच्या मागणीसाठी शेकडोंनी अर्ज केले आहेत. मात्र कामात सुरळीतपणा नसल्याने हे अर्जदेखील प्रलंबित राहिले आहेत. शिवाय नवीन बीपीएल कार्डसाठी शेकडो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. मात्र, कामच ठप्प असल्याने अनेकांसमोर प्रतीक्षेशिवाय दुसरा मार्ग उरला नाही.

गॅरंटी योजनांसाठी रेशनकार्ड गरजेचे

काँग्रेसने गॅरंटी योजना सुरू केल्याने सरकारवर आर्थिक भार वाढला आहे. त्यामुळे नवीन रेशनकार्डचे काम ठप्प केले आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. गॅरंटी योजनांसाठी रेशनकार्ड गरजेचे आहे. मात्र रेशनकार्डच मिळत नसल्याने अनेकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. गोरगरिबांना गॅरंटीपासून दूर राहावे लागले आहे. त्यामुळे सरकारने गॅरंटी योजना कोणासाठी जारी केली आहे? असा प्रश्नही लाभार्थी करू लागले आहेत.

दुरुस्तीचे कामही ठप्प

रेशनकार्ड दुरुस्तीच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. त्यामुळे अनेकांची रेशनकार्डमधील दुरुस्ती थांबली आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रवेश आणि इतर शासकीय कामात अडचणी येऊ लागल्या आहेत. रेशनकार्डमध्ये नावात बदल, नवीन नावाची नोंद करणे, पत्ता बदल आदी कामेही थांबली आहेत.

Advertisement
Tags :

.