For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक विभाग नवमतदार नोंदीच्या कामात व्यस्त

11:10 AM Aug 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक विभाग नवमतदार नोंदीच्या कामात व्यस्त
Advertisement

जि. पं.-ता. पं. निवडणुकीबाबत अद्याप कोणत्याच हालचाली नाहीत : मात्र, कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा शक्य

Advertisement

बेळगाव : जि. पं. व ता. पं. निवडणुका घेण्यासंदर्भात सरकारने अद्याप कोणत्याच हालचाली सुरू केलेल्या नाहीत. मात्र, निवडणूक विभागाकडून नियमित कामाप्रमाणे नव्या मतदारांची नोंद घेणे व निधन झालेल्या मतदारांची नावे यादीतून कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. बीएलओच्या मदतीने ही कामे सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जि. पं. व ता. पं. सभागृह विसर्जित होऊन जवळपास अडीच वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून निवडणूक प्रक्रियेला विलंब झाला आहे. अडीच वर्षांचा कालावधी उलटत आला तरी या निवडणुका घेण्यासाठी सरकारकडून कोणतीच हालचाल दिसून येत नसल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येते.

सध्या राज्यात म्हैसूर विकास प्राधिकरणाच्या (मुडा) प्रकरणामुळे सत्ताधारी काँग्रेस व विरोधी भाजप पक्षांमध्ये राजकीय कलगीतुरा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांविरोधात आंदोलन केले जात आहे. विरोधकांकडून राज्यपालांची बाजू घेऊन आंदोलन केले जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोपात राजकीय नेते व्यस्त असल्याने या निवडणुकांकडे सध्याच्या घडीला कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून अद्याप कोणत्याच हालचाली दिसून येत नसल्याचे निवडणूक विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Advertisement

जिल्हा पंचायत व तालुका पंचायत निवडणुकांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या नेत्यांचे या निवडणुकांच्या घोषणेकडे लक्ष लागून राहिले आहे. निवडणूक विभागाकडून मतदार संघांची पुनर्रचना करून मतदारसंघ निश्चित केले आहेत. मात्र, मतदार संघनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा निकालात काढताच कोणत्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.