निवडणूक आयोगाने फेटाळले सर्व आरोप
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात विरोधी पक्षांच्या आक्षेपांचे केले निरसन
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी केलेले सर्व आरोपांना केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट प्रत्युत्तर दिले आहे. ही निवडणूक पूर्णत: पारदर्शी वातावरणात आणि नियमांचे काटेकोर पालन करुनच झाली आहे. कोणत्याही प्रकारचा घोटाळा या निवडणुकीत झाला नसून या निवडणुकीच्या संदर्भात घेण्यात आलेले आक्षेप बिनबुडाचे आहेत, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. मंगळवारी हे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मतदानाच्या शेवटच्या तासात इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान वाढले कसे, असा प्रश्न काँग्रेसने केला होता. तसेच अनेक मतदारांची नावे अनधिकृतरित्या मतदारसूचींमधून काढून टाकण्यात आली. तसेच अनेक नवी नावे बेकायदेशीरपणे समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात साधारणत: 10 हजार नावे नव्याने समाविष्ट करण्यात आली आहेत, असा आरोप काँग्रेसने आणि इतर विरोधी पक्षांनी केला होता. हे आरोप आयोगाने स्पष्टपणे फेटाळले आहेत.
नावांमध्ये कोणताही घोळ नाही
काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रत्येक आक्षेप मुद्द्याला आयोगाने स्पष्ट उत्तर दिले आहे. कोणत्याही मतदारसंघातील मतदार सूचींमध्ये कोणतेही नाव बेकायदेशीररित्या समाविष्ट करण्यात आलेले नाही. तसेच ते बेकायदेशीररित्या काढण्यातही आलेले नाही. प्रत्येक निवडणुकीत मतदार सूचींमधून काही नावे काढली जातात आणि काही नवी समाविष्ट केली जातात. हे करण्यासाठी विशिष्ट आणि निश्चित असे नियम आहेत. त्या नियमांचे संपूर्ण पालन करण्यात आले आहे. याचे पुरावे निवडणूक आयोगाकडे आहेत, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
शेवटच्या तासातील मतदान
मतदानाची वेळ संध्याकाळी सहा पर्यंत होती. संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाच्या तात्पुरत्या आकडेवारीनुसार 58.40 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर रात्री 11.45 मिनिटांनी आयोगाने संपूर्ण मतदानाची अंतिम आकडेवारी घोषित केली. ती जवळपास 66 टक्क्यांची होती. संध्याकाळी सहा ही मतदानाची वेळ असली तरी सहा वाजता जे मतदार रांगेत उभे असतात त्यांना मतदान करु दिले जाते. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांमध्ये संध्याकाळी सात वाजेपर्यंत मतदान चालते. नंतर प्रत्येक मतदान केंद्रावर किती मते घालण्यात आली याचा अंतिम हिशेब केला जातो आणि नंतर आयोगाकडून अंतिम टक्केवारी घोषित केली जाते. त्यामुळे आकडेवारीत कोणताही घोळ नसून शेवटच्या तासांमध्ये सहा ते सात टक्के मतदान वाढणे ही सर्वसामान्य बाब आहे. ती प्रत्येक निवडणुकीत दिसून येते. साहजिकच, महाराष्ट्राच्या निवडणुकीत वेगळे असे काहीही घडलेले नाही, असे उत्तर निवडणूक आयोगाने काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या आक्षेपांना दिले आहे.
अत्यल्प अंतर असू शकते
गणना झालेल्या मतांची संख्या आणि प्रत्यक्ष मतांची संख्या यात अत्यंत अल्प अंतर असू शकते. मात्र, त्याचा प्रत्यक्ष निर्णयावर कोणताही परिणाम होत नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर जेव्हा मतदान पूर्ण संपल्यावर मतांची मानवी गणना केली जाते, म्हणजेच मतदान केलेल्या मतदारांच्या नोंदवहीतील स्वाक्षऱ्या मोजल्या जातात, त्यात किंचित मानवी चूक होऊ शकते. त्यामुळे मतदान यंत्रातली मते आणि ही मोजली गेलेली मते यात अत्यंत अल्प असे अंतर पडू शकते. मात्र हा फरक कधीही निर्णायक असू शकत नाही, अशा अर्थाचे स्पष्टीकरणही आयोगाने दिले.
सर्व पुरावे उपलब्ध
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भातील सर्व आकडेवारी, टक्केवारी आणि इतर माहिती, तसेच फॉर्म क्रमांक 20 मुख्य निवडणूक आयोगाच्या महाराष्ट्रासंबंधीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघासंबंधी ही माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे. तसेच ही सर्व माहिती डाऊनलोड करता येण्यासारखी आहे. त्यामुळे कोणालाही कसलीही शंका असल्यास ही वेबसाईट पाहिली जाऊ शकते, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
काय म्हणतो निवडणूक आयोग...
ड महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पूर्णत: नियमांनुसार आणि पारदर्शी
ड मतदार सूचींमध्ये कोणताही घोटाळा, गडबड अगर चूक झालेली नाही
ड शेवटच्या तासांमध्ये मतदानात झालेली वाढ ही अत्यंत नसैर्गिक, योग्य
ड घेण्यात येत असलेले आक्षेप बिनबुडाचे, आयोगाकडे सर्व पुरावे उपलब्ध