सलगचे आठवे सत्र घसरणीसह बंद
सेन्सेक्स 97 तर निफ्टी 23 अंकांनी प्रभावीत
मुंबई :
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी घसरणीचा कल कायम राहिल्याचे दिसून आले. दरम्यान अस्थिर सत्रानंतर सलग आठव्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक घसरणीसह बंद झाले. निफ्टी एफ अँड ओ एक्सपायरी आणि आरबीआय पतधोरण समिती (आरबीआय एमपीसी) बैठकीपूर्वी गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगल्यामुळे बाजारात दबाव सत्र राहिले आहे. बीएसई सेन्सेक्स सुमारे 177 अंकांनी वाढून 80,541.77 वर उघडला. दिवसअखेर मात्र सेन्सेक्स 97.32 अंकांनी किंवा 0.12 टक्क्यांनी घसरून निर्देशांक 80,267.62 वर बंद झाला. दुसऱ्या बाजूला, राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टी 23.80 अंकांनी घसरून 24,611.10 वर बंद झाला आहे.
बीएसई सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये, भारती एअरटेल, आयटीसी, ट्रेंट आणि बजाज फिनसर्व्ह हे सर्वाधिक तोट्यात होते. याउलट, अदानी पोर्ट्स, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स आणि बीईएल हे सर्वाधिक वाढ झालेल्या कंपन्यांमध्ये राहिल्या आहेत. व्यापक बाजारपेठांमध्ये, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 0.01 टक्क्यांनी घसरून बंद झाला, तर निफ्टी स्मॉलकॅप 0.08 टक्क्यांनी वाढला.
जागतिक आणि देशांतर्गत ट्रेंड
परदेशी गुंतवणूकदार यूकेच्या जीडीपी वाढीच्या डेटाची आणि ऑस्ट्रेलियन सेंट्रल बँकेच्या व्याजदर निर्णयाची वाट पाहत आहेत. भारतात, गुंतवणूकदार बाह्य कर्ज आणि सरकारी बजेट डेटाचे बारकाईने निरीक्षण करत आहेत. निफ्टी डेरिव्हेटिव्हजची साप्ताहिक समाप्ती देखील बाजाराच्या दिशेने परिणाम करू शकते.
आशियाई बाजारपेठ
सकाळच्या सत्रात आशिया-पॅसिफिक प्रदेशातील बाजारपेठेत मिश्र कल होता. गुंतवणूकदार रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर निर्णयाची वाट पाहत आहेत.
कमोडिटी मार्केटची स्थिती
मंगळवारी सकाळी तेलाच्या किमती कमी होत होत्या. ब्रेंट क्रूड 0.69 टक्क्यांनी घसरून 67.50 डॉलर प्रति बॅरलवर आला, तर यूएस डब्ल्यूटीआय क्रूड 0.61 टक्क्यांनी घसरून 63.06 डॉलर प्रति बॅरलवर आला.