ग्लोबल वार्मिंगच्या झळा...
जागतिक तापमानावाढ हा आता मोठा कळीचा मुद्दा ठरत आहे. औद्योगिक विकासामुळे पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष, तापमानवाढ रोखण्यासाठीचे अपुरे प्रयत्न यामुळे हा प्रश्न आता गंभीर होत आहे. 2024 हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात तापदायक वर्ष ठरले असतानाच आता 2025 वर्षही त्यापेक्षाही तापदायक ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच मागचे सलग 18 महिने हे जागतिक स्तरावर उष्णतादायक म्हणून गणले गेले आहेत. या सर्वाचा परिणाम मानव जातीवर होत आहे. वेळीच यावर तातडीने उपाययोजना न केल्यास मानवी आयुष्यापुढच्या समस्या आणखी जटील होऊ शकतात.
हवामान हा घटक सर्वांशीच निगडीत आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांवर सर्वात प्रभाव टाकणारा घटक म्हणजे हवामान. 2024 या वर्षाने तापमानाची सरासरी ओलांडली असून, हे वर्ष आतापर्यंतचे सर्वात तापदायक वर्ष ठरले आहे. भूपृष्ठ, समुद्रसपाटीचे तापमान या वर्षात सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले आहे. परिणामी दुष्काळ, अतिवृष्टी, उन्हाच्या झळा, बर्फ वितळणे, वणवा लागणे, चक्रीवादळांची संख्या वाढणे यासारख्या नैसर्गिक आपत्ती या वर्षात सर्वाधिक घडल्या आहेत. मुख्य म्हणजे 2024 मधील तापमानाने 2016 लाही मागे टाकले आहे. त्याचबरोबर सरत्या वर्षी भूपृष्ठावरील हवेचे सरासरीचे तापमान 0.65 अंश सेल्सिअसने अधिक नोंदविण्यात आले आहे. पहिल्यांदाच 1.5 अंश सेल्सिअसच्या आसपास हवामानाची नोंद झाली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोसह हरितवायू उत्सर्जन वाढल्याने औद्योगिकीकरणानंतरच्या काळात 2024 या वर्षाने नवीन रेकॉर्ड स्थापित केला आहे.
बर्फाच्छादित प्रदेशावर तापमानवाढीचे संकट
तापमानवाढीमुळे जगभरातील हिमनद्या तसेच हिमच्छादीत प्रदेश वेगाने वितळत असल्याचे अभ्यासाअंती दिसून येत आहे. गेल्या 24 वर्षात म्हणजेच शताब्दीच्या सुऊवातीपासून ते आतापर्यंत जगभरातील हिमनद्यांमधील बर्फ 5 टक्क्यांनी वितळला आहे. हे सत्र असेच सुरू राहिल्यास शतकाच्या शेवटी पाव टक्के बर्फ पूर्णपणे वितळला जाणार असल्याची भीती अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. ‘वर्ल्ड ग्लेशीयर्स मॉनिटरींग सर्व्हिस’च्या सहकार्याने हा अभ्यास करण्यात आला आहे.
हिमनद्या वितळण्याचे प्रमाण वाढले
हरित वायूंच्या उत्सर्जनामुळे गेल्या काही वर्षात हवामान बदल मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे समुद्र, जमीन तसेच वातावरणात उष्णता वाढली असून, याचा परिणाम हिमनद्यांवरही दिसून येत आहे. हिमनद्या या स्वच्छ पाण्याचा स्त्राsत म्हणून ओळखल्या जातात. मात्र, 2000 सालानंतर त्यांचे वितळण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या 24 वर्षात 6,500 बिलियन टन इतका बर्फ अर्थात एकूण बर्फाच्या 5 टक्के बर्फ वितळला आहे. यामध्ये ग्रीनलँड तसेच अंटार्टिकाच्या भागातील साधारणपणे 270 बिलियन टन बर्फ वितळला आहे. 270 बिलियन टन बर्फ म्हणजे जगभरातील लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक माणसाला 3 लिटर पाणी दरदिवशी पकडले, तरी 30 वर्षे पुरेल इतका बर्फ वितळून समुद्रात मिसळला गेला आहे.
दुष्काळाचा धोका
मध्य युरोपाला हवामान बदलाचा सर्वाधिक फटका बसला असून, गेल्या वीस वर्षात 39 टक्के इतका बर्फ वितळला गेला आहे. याशिवाय हिमनद्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येलाही दुष्काळाला सामोरे जावे लागेल, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. ग्रीनलँडमधील हिमनद्यांनाही मोठ्या भेगा पडल्या असल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. हे अतिशय धोकादायक असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. भारतात हिमालयाच्या भागातील बर्फ देखील वितळत असल्याचे दिसून आले असून, या भागात पाण्याचे दुर्भीक्ष्य जाणवत आहे.
शहरे बुडण्याचाही धोका?
जमीन तसेच समुद्राचे तापमान वाढल्याने याच्याशी निगडित सर्व बाबी आता धोकादायक स्थितीत पोहोचल्या आहेत. यापूर्वी जागतिक तापमानवाढीमुळे ग्रीनलँडमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत असल्याचे आढळले होते. मात्र आता येथील हिमनद्यांनादेखील मोठ्या संख्येने तडा जात आहे. बर्फ वितळून ते समुद्रात मिसळत असल्याने किनारपट्टीवरील शहरे लवकरच बुडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
ला निनो निष्क्रीय
जानेवारी महिन्यात प्रशांत महासागरात ला निनो अर्थात थंड पाण्याचे प्रवाह सक्रिय झाले. मात्र, हा ला निनो अल्पकालीन, प्रभावहीन ठरला आहे. यामुळे समुद्राचे वाढलेले तापमान कमी होण्यास कोणतीही मदत झाली नाही. आगामी काळात एल निनोचे प्रमाण वाढणार असून, त्या तुलनेत ला निनो कमी उद्भवणार असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. तापमानवाढीने समुद्रातील उष्ण प्रवाह वाढले असून येथील जीवसृष्टी धोक्मयात आली आहे.
2024 ने भारताचा रेकॉर्डही मोडला
यापूर्वी भारतात 2016 हे वर्ष तापदायक वर्ष म्हणून गणले गेले होते. मात्र, गेले दीड ते दोन वर्ष एल निनोचा प्रभाव जागतिक तापमानाबरोबरच भारतावरही झाला. यामुळे 2023 चा हिवाळा, 2024 चा उन्हाळा तसेच सध्याची थंडीही तुलनेत अधिक तापमानाची राहिली. सुदैवाने एल निनोचा प्रभाव काहिसा कमी राहिल्याने 2024 चा पावसाळा दमदार होऊन, सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला.
2025 मध्येही ‘उष्ण’तेचा कहर...
चालू वर्षात देशात अपेक्षेपेक्षा जास्त उष्णता राहणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, यावर्षी देशातील वायव्य राज्यांमध्ये म्हणजेच हरियाणा, पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, उत्तराखंड, दिल्लीमध्ये उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे. साधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत 5-6 दिवस सतत उष्णतेच्या लाटा सुरू राहतात, परंतु यावेळी 10 ते 12 दिवसही अशा लाटा येऊ शकतात. तथापि, हवामान खात्याने यावर्षी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव किती दिवस राहील याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. जर उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या दुप्पट झाली तर 2025 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष असेल, असे हवामानशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. एकंदर चालू वर्षात उष्णतेचा कहर कायम राहिल्यास तापमानाचा पारा सामान्यपेक्षा 5 अंश किंवा त्याहूनही जास्त वाढू शकतो.
उष्णता वाढण्याची प्रमुख कारणे
उष्णतेच्या लाटेच्या दिवसांमध्ये वाढ होण्याचे कारण एल निनोची परिस्थिती आहे. पॅसिफिक महासागरातील उष्ण पाण्यामुळे एल निनो परिस्थिती निर्माण होते. यामुळे भारतात पाऊस कमी होतो आणि उष्णतेचा प्रभाव वाढतो. याशिवाय, हवामान बदल हेदेखील याचे एक मोठे कारण आहे. यामुळे उष्णतेच्या लाटा जास्त काळ टिकतात. साहजिकच उष्णतेच्या लाटांची तीव्रता आणि कालावधी वाढतो.
सध्या देशातील 8 राज्यांमध्ये तापमान 40 अंशांपेक्षा जास्त
देशातील 8 राज्यांचे तापमान सध्या 40 अंशांपेक्षा जास्त आहे. मार्चपासून अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. पुढील काही दिवसात उत्तर भारतात उष्णता आणखी वाढू शकते. दिल्ली आणि आसपासच्या भागातील तापमान 1-2 अंशांनी वाढू शकते. तथापि, जर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पाऊस किंवा बर्फवृष्टी झाली तर तापमानात 3 ते 4 अंशांनी घट होऊ शकते.
सरत्या वर्षात हवामानाने 2,400 जणांचा मृत्यू
2024 या वर्षात अनेक टोकाच्या हवामानाच्या घटना नोंदविण्यात आल्या. यात तीव्र उष्णतेच्या लाटा, वादळे, मुसळधार पाऊस या घटनांमध्ये 2,400 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यात सर्वाधिक 1,373 मृत्यू हे वीज तसेच गारपीटीच्या माऱ्यामुळे झाले आहेत. त्याखालोखाल 1,282 इतके मृत्यू हे अतिवृष्टी आणि पुरामुळे, 459 मृत्यू उष्णतेच्या लाटेत, 70 मृत्यू वादळाच्या तडाख्यात तर 17 मृत्यू इतर कारणांमुळे झाले आहेत.
मानवजातीवर गंभीर परिणाम
तापमानावाढीचा परिणाम शेती, पाणी, वातावरण या घटकांवर होतच आहे. त्यामुळे शेतपिकांचा दर्जा, पाण्याचे दुर्भीक्ष्य, प्रदूषणामुळे खालावलेले जीवनमान आदींमुळे मानवी जीवन खडतर होत आहे. दुसरीकडे प्रजनन क्षमता, मेंदू, तसेच अनेक अवयवांवर विपरित परिणाम होत आहे.
पॅरिस करार दुर्लक्षितच
2015 साली पॅरिसमध्ये हवामान परिषद पार पडली. यात जागतिक तापमान 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत रोखण्यासाठी करार करण्यात आला. अमेरिकसह 100 हून अधिक देश यात सहभागी झाले. मात्र, त्यानंतर करण्यात आलेले प्रयत्न हे तोकडे पडत असल्याचे चित्र आहे. अमेरिका आता या करारातून बाहेर पडला आहे. जागतिक हवामान परिषद आणि जागतिक आरोग्य संघटना यासारख्या संस्था पर्यावरणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आधीपासून कार्यरत आहेत. अनेक राज्ये आणि देशांनी पर्यावरण हा मुद्दा आता गंभीरपणे घेण्यास सुऊवात केली आहे. भारतात सौर ऊर्जेवर भर दिला जात आहे. काही शाळांनी पाठ्यापुस्तकात पर्यावरण विषय घेऊन शालेय स्तरावरूनच जनजागृती सुरू केली आहे. ग्रेटा थेनबर्गसारख्या कार्यकर्त्यांनी याबद्दल आधीच आवाज उठविला आहे. आज प्रत्येक मानवाशी हा निगडीत मुद्दा असल्याने कुणाची वाट न पाहता स्वत: पासून पर्यावरण जतन आणि संवर्धन करायला हवे. प्लास्टिकचा वापर टाळणे, इलेक्ट्रिक वाहने वापरणे, पाण्याचा अपव्यय टाळणे, झाडे लावणे, वृक्षतोड न करणे, पर्यावरणपूरक वस्तू वापरणे या साध्या गोष्टीतून सुऊवात केली, तरी पुढे त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे. अन्यथा पुढच्या पिढीला ऑक्सिजन मास्क लावून फिरण्याची वेळ येऊ शकते, असे म्हटल्यास ते अतिशयोक्त होऊ नये.
एकूणच मागच्या 18 महिन्यातील उष्णतामान लक्षात घेतला, तर भारतासह जगापुढचा ग्लोबल वार्मिंगचा धोका किती गंभीर आहे, हे लक्षात येते. अनेकविध नैसर्गिक आपत्तींना जागतिक तापमानवाढ हाच घटक कारणीभूत असल्याचे हवामानविषयक तज्ञ सांगतात. हे पाहता या दुष्टचक्रातून सुटका करून घेण्यासाठी सामूहिक प्रयत्नांशिवाय पर्याय नाही.
संकलन : अर्चना माने-भारती, पुणे