तालुक्यातील दुर्गामाता दौड ठरली लक्षवेधी
एकात्मतेचे दर्शन-विविध सामाजिक संदेश देणाऱ्या देखाव्यांनी भक्तिमय वातावरण : विविध ठिकाणी व्याख्यान कार्यक्रम : दौडीची आज सांगता
वार्ताहर/किणये
तालुक्याच्या विविध गावांमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान शाखांच्या व शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेली दुर्गामाता दौड लक्षवेधी ठरली. नवरात्रोत्सवात घटस्थापनेपासून या दुर्गामाता दौडला प्रारंभ झाला. या दुर्गामाता दौडच्या माध्यमातून तालुक्यात नवचैतन्य निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले. गावातील नागरिकांमध्ये एकात्मतेचे दर्शन घडले. विविध सामाजिक संदेश देणारे देखावे सादर करण्यात आले. बुधवारी बहुतांशी गावांमध्ये या दुर्गामाता दौडची सांगता करण्यात आली. कारण गुरुवारी शहरातील महादौड व व्याख्यानाच्या कार्यक्रमाला ग्रामीण भागातील कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. खंडेनवमीदिवशी तालुक्याच्या अनेक गावांमध्ये बुधवारी मोठ्या उत्साहात व जल्लोषात दुर्गामाता दौड काढण्यात आली. दौडमध्ये महिला व बालचमुंचा लक्षणीय सहभाग दिसून आला. टाळ मृदंगाचा गजर झाला. तसेच गावागावांमध्ये भगवे ध्वज व भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. दुर्गामाता दौडच्या माध्यमातून गावागावांतील सर्व देवतांची पूजाअर्चा करण्यात आली. एकंदरीत या दुर्गामाता दौडच्या माध्यमातून भावभक्तीचा जागर झाला.
सोनोलीत जल्लोषात दुर्गामाता दौड
बुधवारी सोनोली गावात मोठ्या जल्लोषात दुर्गामाता दौड काढण्यात आली. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगुंदी विभागाच्या वतीने या दौडचे आयोजन केले होते. सोनोली गावच्या प्रवेशद्वारापासून दुर्गामाता दौडला सुरुवात करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन ग्रामस्थ, पंचकमिटीच्या हस्ते करण्यात आले. शस्त्रपूजन प्रथमेश कनगुटकर यांनी केले. ध्वजपूजन डॉ. नम्रता कनगुटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ध्येयमंत्र होऊन दौडला सुरुवात करण्यात आली. बाबुराव कॉलनी, गणपत गल्ली, पाटील गल्ली, हनुमान गल्ली, चव्हाट गल्ली आदी गल्ल्यांमध्ये ही दौड निघाली होती. ठिकठिकाणी जल्लोषात दुर्गामाता दौडचे स्वागत करण्यात आले.
ऑपरेशन सिंदूर देखावा लक्षवेधी
ऑपरेशन सिंदूर हा देखावा गावातील तरुण व तरुणींनी सादर केला होता. हा देखावा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे सादर करण्यात आले. गावातील तरुणांनी संभाजी महाराज साखळ दंड हा देखावा सादर केला. हा देखावा पाहताना अनेकांच्या डोळ्यातून अश्रू तरळत होते.तसेच रामसेतू हा देखावा सादर केला होता. यामध्ये प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमान आदींच्या वेशभूषा तरुण व तरुणींनी परिधान केल्या होत्या. तसेच राम सेतू हा देखावा सादर करताना पाण्यावर तरंगणारे दगड दाखविण्यात आले.
मंडोळीत दौडमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग
बुधवारी मंडोळी गावात काढण्यात आलेल्या दुर्गामाता दौडमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. दत्त मंदिर येथून या दौडची सुरुवात करण्यात आली. भरत कुरणे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यांनी व्याख्यान सादर केले. मंडोळीतील मुख्य रस्ता, साईनाथ गल्ली, पाटील मळा, बसवाण गल्ली आदी ठिकाणी ही दौड काढली. टाळ मृदंगाच्या गजरात महिलांनी व वारकऱ्यांनी या दौडमध्ये विविध अभंग सादर केले. तरुण व तरुणींनी संत बाळूमामा, बाळकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ आदींच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. तसेच नवदुर्गा यांची वेशभूषा मुलींनी परिधान केली होती. या दौडमध्ये फुगडी खेळ सादर केला. भाकरी करीत असलेल्या महिला, मुलांना पाटीवर अक्षरांची ओळख पटवून देऊन त्यांना शिकविणाऱ्या महिला, जात्यावर कांडप करणाऱ्या महिला, भाकरी करणाऱ्या महिला, पाळणागीत म्हणणाऱ्या महिला असे देखावे सादर केले होते. गणेश मंदिर येथे या दौडची सांगता करण्यात आली.
हंगरगेतील शिवतीर्थ येथून दौड
हंगरगे गावातील शिवतीर्थ येथून बुधवारी दुर्गामाता दौडची जल्लोषात सुरुवात करण्यात आली. दौडमध्ये गावातील तरुण व तरुणींनी पांढरे कुर्ते परिधान केले होते. गावात ठिकठिकाणी भगवे ध्वज व भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. महिला आरती ओवाळून दौडचे स्वागत करत होत्या.
बोकनूर येथे दौड उत्साहात 
बोकनूर येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त दुर्गामाता दौड उत्साहात सुरू आहे. या दौडीमध्ये शेकडो शिवभक्त व धारकरी यांनी सहभाग घेतला होता. यल्लाप्पा पाटील यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीपूजन, ग्रामस्थ कमिटी सरपंच नागेंद्र नावगेकर ध्वज पूजन, शस्त्र पूजन नारायण पाटील, कल्लाप्पा केसरकर, ग्रा.पं.सदस्य शिवाजी पाटील, परशराम केसरकर यांनी केले. प्रास्ताविक अरुण सुतार यांनी केले. दौडीमध्ये कावळेवाडी, बिजगर्णी, राकसकोप, यळेबैल, सोनोली, बेळगुंदी धारकऱ्यांचा सहभाग होता. सांगता समारंभप्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बोकनूर यांच्यावतीने जवान सुशांत नावगेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुणी विद्यार्थी विद्या दळवी हिचा शाल, श्रीफळ व छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. गावातील सर्व नागरिक, महिला, शिवभक्त, तरुण मंडळे या दौडीमध्ये उत्साहाने सहभागी होते. चांगदेव पाटील यांनी आभार मानले. प्रेरणामंत्राने सुरुवात तर ध्येयमंत्राने या दौडची सांगता झाली.