For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिजाऊंच्या अट्टहासामुळेच स्वराज्याचे स्वप्न साकार

06:45 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
जिजाऊंच्या अट्टहासामुळेच स्वराज्याचे स्वप्न साकार
Advertisement

सुनीता पाटणकर : यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

राजमाता जिजाऊ यांना लहानपणापासूनच धार्मिक, लढाईचे शिक्षण मिळाले होते. लहानपणी मिळालेल्या बाळकडूमुळेच त्यांनी पती निधनानंतरही सती न जाता स्वराज्याचा अट्टहास मनामध्ये धरून छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन करून  शहाजीराजांचे स्वप्न साकारले, असे प्रतिपादन सुनीता पाटणकर यांनी केले.

Advertisement

कोंरे गल्ली, शहापूर येथील सरस्वती वाचनालयातर्फे माई ठाकुर सभागृहात कै. यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालेत त्या ‘राजमाता जिजाबाई’ या विषयावर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाच्या अध्यक्षा प्रा. स्वरूपा इनामदार, कार्याध्यक्ष सुहास सांगलीकर, कार्यवाह प्रा. आर. एम. करडीगुद्दी आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात जिजाऊंचा मोठा वाटा आहे. जिजाऊंपासून ते राजमातापर्यंतच्या प्रवासातील अनेक प्रसंगांचे श्रोत्यांसमोर हुबेहूब कथन केले. स्वराज्य निर्माण करताना जिजाऊंनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केले. जिजाऊंना लहानपणापासूनच धार्मिक, लढाईचे शिक्षण मिळाले होते. वयाच्या नवव्या वर्षी शहाजी महाराजांसोबत विवाह झाल्यानंतर त्या भोसले घराण्याच्या सून झाल्या. यानंतर त्यांना नेहमीच शहाजीराजांपासून दूर राहावे लागले होते. या काळात छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्यात त्यांनी कोणतीच कसर सोडली नाही. महाराजांनी अनेक गड, किल्ले लढाया करून ताब्यात घेतले. मात्र, त्या गडांवर सेनापतींची नेमणूक करण्याची जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती. यातून त्यांचा माणूस ओळखण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. तितक्याच त्या न्यायदानात कठोर होत्या. प्रजाजनांना न्याय देण्यात त्यांनी कधीच कसर सोडली नाही. तितक्याच त्या मुत्सद्दीही होत्या. जावळीच्या जंगलात अफजलखानाशी भेट घेण्याचा सल्ला महाराजांना त्यांनीच दिला होता. स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याचा सल्लाही जिजाऊंनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही परिस्थितीत न डगमगता, परिस्थितीला शरण न जाता त्यांनी लढाऊ बाणा दाखवून दिला आहे. शिवाजी महाराजांना अनेक वेळा विशेष सल्ले देऊन मार्गदर्शन केले आहे. जिजाऊंची धर्माची कल्पना अत्यंत शुद्ध होती. धर्माच्या नावाखाली मांडण्यात येणारा व्यभिचार जिजाऊंना कधीही मान्य नव्हता. शरण आलेल्यांना आश्रय द्यावा, त्यांच्यावर अत्याचार करण्यात येऊ नये, असे अनेक विचार, सल्ले जिजाऊंनी महाराजांना दिले आहेत. त्यामुळेच जिजाऊ या थोर माता बनल्या आहेत, असेही पाटणकर यांनी सांगितले.

प्रारंभी ज्येष्ठ कलाकार वामन वागुकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते कै. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रुचिरा नातू यांनी स्वागतगीत व ईशस्तवन म्हटले. सूत्रसंचालन प्रियांका केळकर यांनी केले. आर. एम. करडीगुद्दी यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.