‘वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशनशिप’च्या अंतिम फेरीसाठीची चुरस वाढली
न्यूझीलंडविरुद्धची मालिका गमावूनही भारताला संधी, ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, न्यूझीलंड, आफ्रिका व श्रीलंकाही शर्यतीत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची क्रमवारी अधिकाधिक चुरसपूर्ण बनत चालली असून भारत आणि ऑस्ट्रेलिया या अव्वल दोन संघांमध्ये आता केवळ 15 टक्के अंतर राहिलेले आहे. विजेतेपदाच्या लढतीत हे दोन संघ पुन्हा आमनेसामने येण्याची शक्यता कायम आहे. श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड देखील अव्वल दोन स्थानांमध्ये आणि त्याद्वारे पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या एकमेव कसोटीत स्थान मिळविण्याच्या शर्यतीत आहेत.
भारत सध्या 62.82 टक्के गुणांसह आघाडीवर आहे. न्यूझीलंडविऊद्धची घरच्या मैदानावरील त्यांची एक कसोटी आणि ऑस्ट्रेलियातील पाच कसोटी सामन्यांची मालिका अद्याप बाकी आहे. न्यूझीलंडविऊद्ध नुकत्याच स्वीकाराव्या लागलेल्या पराभवानंतरही भारत अजूनही कमाल 74.56 टक्के गुणांपर्यंत पोहोचू शकतो. सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दृष्टीने त्यांना ऑस्ट्रेलियाविऊद्धची आगामी मालिका महत्त्वाची ठरणार आहे.
विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया संभाव्य गुणांच्या 62.50 टक्के गुणांसह भारताच्या मागे आहे. आपले विजेतेपद राखण्याच्या दृष्टीने त्यांनी उर्वरित सातपैकी किमान चार कसोटी जिंकणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाला पुढील वर्षी श्रीलंकेत दोन कसोटी सामने खेळण्याचा फायदा आहे. याचा अर्थ त्यांनी भारतासोबतची मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडविली, तरीही ते अंतिम फेरीसाठीच्या शर्यतीत कायम राहतील. तथापि, त्यांचे लक्ष घरच्या मैदानावर बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी परत जिंकण्यावर असेल. अलीकडच्या वर्षांत त्यांना मायदेशी भारताविऊद्ध संघर्ष करावा लागलेला आहे.
श्रीलंका, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड देखील या शर्यतीत असून त्यांच्यात आघाडीच्या दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याची क्षमता आहे. श्रीलंकेने इंग्लंडवर मिळवलेल्या विजयाने त्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत, पण दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मालिका त्यांना आव्हानात्मक ठरणार आहेत. आहे. न्यूझीलंडच्या भारतातील ऐतिहासिक मालिका विजयाने त्यांना पुन्हा शर्यतीत आणले आहे. परंतु त्यांनी त्यांच्या उर्वरित चारही कसोटी जिंकण्याची गरज आहे.
उपखंडातील दक्षिण आफ्रिकेच्या यशामुळे त्यांच्या संधी वाढल्या असून त्यांना घरच्या मैदानावर चार सामने खेळण्याची अनुकूलताही आहे. इंग्लंड, पाकिस्तान, बांगलादेश आणि वेस्ट इंडिज हे संघ सध्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. परंतु ते त्यांच्या उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करून स्पर्धेतील मोहीम सकारात्मक पद्धतीने संपवू पाहतील.