Solapur : सोलापूर महापालिकेची प्रारूप मतदारयादी 'या' तारखेला होणार जाहीर
सोलापूर महापालिका निवडणूक तयारीला गती
सोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदारयादी जाहीर करण्याच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रारूप मतदारयादी १४ नोव्हेंबरऐवजी आता २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या प्रारूप यादीवर २७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येणार आहे. ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने सोलापूर महापालिकेसह राज्यातील २९ महापालिकांच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीसंदर्भात पुन्हा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार आयोगाने अधिसूचित केलेल्या तारखेस विधानसभेच्या मतदार यादी वरून महानगपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूककरीता तयार केलेली प्रारूप मतदार यादी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवसापासून हरकती व सूचना स्वीकारल्या जाणार आहेत. हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबरपर्यंत आहे.
प्रारूपमतदार यादीवरून दाखल हरकतीबर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रामाणित करून ५ डिसेंबर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदान केंद्राच्या ठिकाणी यादी प्रसिद्ध करण्याची तारीख ८ डिसेंबर आहे तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची तारीख १२ डिसेंबर ही आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी मतदारयादीतबाबत जाहीर केलेल्या सुधारित कार्यक्रमानुसार महापालिका स्तरावर कार्यवाही करण्यात येत आहे.