बाजूला राहिले दार, भिंतीला पाडले खिंडार
उद्यमबाग येथे ड्रिल ब्रेकरच्या साहाय्याने बँकेवर दरोड्याचा प्रयत्न : बँक ऑफ बडोदाची शाखा लक्ष्य
या बँक इमारतीच्या मागे मंगला इंजिनिअरिंग, वर्पे इंजिनिअरिंग, परफेक्ट इलेक्ट्रिकल्स आदी कारखाने आहेत. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी काही कारखानदार आपल्या कारखान्यात आले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी ड्रिल ब्रेकरला वीजजोडणी घेण्यासाठी मंगला इंजिनिअरिंग व वर्पे इंजिनिअरिंग फोडण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी सुमारे 50 फूट अंतरावरील परफेक्ट इलेक्ट्रिकल्सचा दरवाजा फोडून तेथून वीज घेतल्याचे उघडकीस आले आहे. बँक इमारतीच्या पाठीमागील बाजूची भिंत ड्रिल ब्रेकरने फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. याच ठिकाणी स्ट्राँगरुम असल्यामुळे गुन्हेगारांना भिंत लवकर फोडता आली नाही. ड्रिल मारून भगदाड पाडूनही भिंत तोडता आली नाही म्हणून गुन्हेगारांनी तेथून काढता पाय घेतला आहे. जर भिंत फोडून बँकेच्या इमारतीत प्रवेश करण्यात गुन्हेगार यशस्वी ठरले असते तर मोठी लूट झाली असती. ड्रिल ब्रेकरने इमारत फोडण्याचा प्रयत्न करताना मोठा आवाज येतो. तरीही हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. रात्रीच्या गस्तीवरील पोलिसांच्याही निदर्शनास हा प्रकार आला नाही. उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या घटनेवरून पोलीस खरोखरच गस्त घालतात की गस्तीचे नाटक केले जाते? असा संशय कारखानदारात निर्माण झाला आहे.
कारखानदारांनाच उपदेशाचे डोस
चोरीच्या घटनेनंतर पोलीस अधिकारी कारखानदारांना रखवालदार नेमण्याचा सल्ला देतात. परिसरात कॅमेरे बसविण्यास सांगतात. सध्या आर्थिक मंदीमुळे कामगारांना पगार देण्याची ताकद लघुउद्योजकांत राहिली नाही. अशा परिस्थितीत रखवालदार कोठून आणणार? असा प्रश्न कारखानदारांनी उपस्थित केला आहे. अनेक चोरी प्रकरणात सीसीटीव्हीचे फुटेज नेऊन दिल्यानंतरही पोलीस एका प्रकरणाचाही छडा लावलेला नाही. फुटेज द्या, आम्ही त्यांचा शोध घेतो, असे सांगत कारखानदारांना पोलीस स्थानकातून फुटवण्यात येते. उद्यमबाग पोलिसांना या प्रकरणांचे गांभीर्य राहिले नाही. म्हणून चोऱ्या वाढल्याचा आरोप कारखानदारांनी केला आहे.
फुटेज देऊनही वाया
उद्यमबाग परिसरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यात महिलांचाही समावेश आहे. 5 जानेवारी 2024 रोजी एस. डी. इंजिनिअरिंगमध्ये चोरीचा प्रकार घडला. चोरट्यांनी दीड लाखांचे इन्स्ट्रूमेंट पळविल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात चार महिलांचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून आढळून आले. संबंधित कारखानदारांनी उद्यमबाग पोलिसांकडे ते फुटेज देऊनही अद्याप या प्रकरणाचा छडा लागला नाही. त्यामुळे पोलीस दलावर कारखानदार पार नाराज झाले असून निष्क्रिय पोलीस यंत्रणेमुळेच चोऱ्या वाढल्याचा उघड आरोप केला जात आहे.
कारखानदारांवरच अरेरावी
गेल्या तीन महिन्यांत उद्यमबाग औद्योगिक वसाहतीत 40 हून अधिक कारखान्यात चोऱ्या झाल्या आहेत. यापैकी एकाही प्रकरणाचा छडा लागला नाही. एखादी घटना घडल्यानंतर पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करून घेण्यासही टाळाटाळ केली जाते. कारखानदारांनाच दरडावण्यात येते, असा आरोप कारखानदारांनी केला आहे.