डोंगरवाडी परिसर हिरवाईने नटला
ऐतवडे / प्रकाश सादळे :
बुद्रुक वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी गावातील डोंगर परिसरात सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून पंचायत वन हा महत्त्वकांक्षी प्रकल्प प्रेरणादायी ठरत आहे. एक वर्षांपूर्वी एक हेक्टर क्षेत्रामध्ये वृक्ष लागवड केल्यामुळे आज हा परिसर हिरवाईने नटला असून पर्यटकांना भुरळ घालत आहे.
डोंगरवाडी येथे डोंगर पायथ्याला निसर्गरम्य ठिकाणी प्रसिद्ध जागृत हनुमान मंदिर आहे. या ठिकाणी प्रत्येक शनिवारी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून हनुमान भक्त येत आहेत. येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने 'पंचायत वन' उपक्रम राबवून अनेक वृक्षांची लागवड केली आहे. या निसर्गरम्य वातावरणात येऊन प्रत्यक्ष भेट देणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल, वन अधिकारी विक्रम गुरव मार्गदर्शना खाली वनरक्षक अशोक गोरे यांनी डोंगरवाडी गावाच्या परिसरात प्रदूषण मुक्त व आरोग्य पूर्ण जीवन जगण्यासाठी पंचायत वनच्या माध्यमातून अमृत महोत्सव निमित्त महाराष्ट्र शासनाने अभिनव उपक्रम राबवला आहे.
यामध्ये वड, उंबर, पिंपळ, कडुलिंब व देशी आंबा या औषधी गुणधर्म असणाऱ्या, दाट सावली देणाऱ्या वृक्षांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणवायू निर्मिती होण्यास मदत होणार आहे. यामुळे नागरिकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य लाभून रोग प्रतिकारक क्षमता वाढणार आहे. तसेच सर्वसामान्यांना सुख, शांती व समाधान, समृद्धी लाभेल अशा पद्धतीने पंचायत वन तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने राबवावे असे आव्हान करण्यात येत आहे.
- एक विद्यार्थी, एक झाड
वाळवा तालुक्याच्या पश्चिम भागातील ऐतवडे बुद्रुक परिसरातील विहीर बागायत क्षेत्रातील तसेच वारणा पट्ट्यातील शाळा, कॉलेज मधील मुख्याध्यापक आणि तसेच विद्यार्थ्यांनी 'एक विद्यार्थी एक झाड' या संकल्पने प्रमाणे झाडे लावून विद्यार्थ्यांना पालकत्व द्यावे. यामुळे या परिसरात तसेच मैदानात, प्रांगणात वृक्षांची चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि पर्यावरण संतुलन राहण्यास मदत होईल.
-अशोक गोरे वनरक्षक, व कुमार गायकवाड़ वनप्रेमी