श्वानाने वाचविला जीव !
श्वान किंवा कुत्रा हा आपल्या धन्यासाठी काहीही करण्यास, वेळप्रसंगी आपला जीव देण्यासही मागेपुढे पहात नाही, हे प्रत्येकाला माहित आहे. तशा अनेक कथाही सांगितल्या जातात. म्हणूनच श्वानाला माणसाचा सर्वात विश्वासू सहकारी मानण्याची पद्धत आहे. श्वानाला आपल्या धन्याकडून केवळ प्रेम किंवा माया हवी असते. ती मिळाली की तो समाधानी असतो. मायेच्या परतफेडीसाठी सज्ज असतो.
अमेरिकेच्या ओरेगॉन भागात अशीच एक घटना घडली आहे. या भागातील एक व्यक्ती ब्रँडन गॅरेट हे आपल्या चार पाळीव श्वानांसह पहाडी भागातून कारने प्रवास करीत होते. कार चालवित असताना अचानक त्यांचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. गॅरेट यांचे दैव बलवत्तर होते. त्यामुळे ते या भीषण अपघातातून वाचले. त्यांच्या चार कुत्र्यांनाही फारशी दुखापत झाली नाही. तथापि, दरीतून बाहेर कसे पडायचे हा त्यांच्यासमोर प्रश्न होता. दरीतून वर येऊन मार्गापर्यंत येऊन कोणाची साहाय्यता मागणे अशक्य होते. त्यांचे अन्य कुटुंबिय हे अपघात स्थळापासून 6 किलोमीटर दूरवर एका छावणीत होते. यावेळी गॅरेट यांच्या चार श्वानांपैकी एक ब्ल्यू नामक श्वान ती दरी चढून वर आला आणि ते सहा किलोमीटर धावत जाऊन छावणीत वास्तव्य करणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचला. त्याने सातत्याने भुंकून कुटुंबियांना धोक्याची जाणीव करुन दिली.
काहीतरी गडबड आहे, हे कुटुंबियांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित गॅरेट यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. कुत्र्याच्या साहाय्याने काही तासांमध्ये त्यांना अपघाताचे स्थान सापडले. त्यामुळे गॅरेट आणि इतर तीन श्वान यांना दरीतून बाहेर येता आले आणि त्यांचा जीव वाचला. या घटनेला सोशल मिडियावर व्यापक प्रसिद्धी मिळत असून या श्वानाच्या प्रसंगावधानाचे विशेष कौतुक होत आहे. कुत्रा हा माणसाचा किती विश्वासू मित्र आहे, हे या घटनेवरुन सिद्ध होत आहे.