जिल्ह्यात पुन्हा पावसाचे धुमशान; चांदेराई-हरचेरी भागात पुराचे पाणी घुसले
राजापूरला पुन्हा एकदा पुराचा वेढा; संगमेश्वर बाजारपेठेत पुराचे पाणी; खेड बाजारपेठ दुसऱ्यांदा पुराच्या विळख्यात; जिल्ह्यात आजपासून ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी प्रतिनिधी
जिह्याला रविवारी सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाने चांगलेच झोपडून काढल़े रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी-चांदेराईमधील बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने दुकानांमधील मालाचे नुकसान झाले. तसेच चिंद्रवली येथे पावसाच्या पाण्याने रस्ताच वाहून गेला. अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आल्याने पुन्हा एकदा राजापुरात पुराच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली. संगमेश्वरातही नदीकाठच्या रामपेठ, माखजन, फुणगूस, कसबा बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले. खेड बाजारपेठेतील वाल्कीगल्लीत जगबुडी पुराचे पाणी शिरले होते. नारिंगीचे पाणी सुर्वे इंजिनिअरींगच्या मार्गावर घुसल्याने खेड-दापोली मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद झाला होता. दरम्यान हवामान खात्याकडून जिह्याला 22 व 23 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आह़े त्यानुसार जिल्हा प्रशासनाला खबरदारी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़.
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून पोलीस प्रशासन, आपत्ती प्रतिसाद दल तसेच स्थानिक स्वराज्य संस्था यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत़ तसेच पुरात अडकलेल्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे कामही जिल्हा प्रशासनाकडून हाती घेण्यात आल़े जिह्यातील सर्वच नद्या या इशारा पातळीच्या वर वाहत असून जगबुडी नदीने धोका पातळी ओलांडल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल़े
रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी-चांदेराई येथील काजळी नदीला पूर आल्याने बाजारपेठेत पाणी शिरल़े तसेच चांदेराई मुख्य पुलालाही पुराचे पाणी टेकल्याचे दिसत होत़े त्यामुळे या पुलावरून होणारी वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होत़ी दरम्यान सायंकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आल़े तर चिंद्रवली येथे रस्ता वाहून गेल्याने किराणा माल व भाजीपाला यासाठी स्थानिकांना चांदेराई बाजारपेठेपर्यंत पायपीट करत यावे लागत आह़े दरम्यान याठिकाणी पुराचे पाणी शिरल्याने चिंद्रवली येथील रहिवाशांना अडचणींना सामोरे जावे लागत आह़े.
बाबरशेख दर्ग्यातही शिरले पुराचे पाणी
हातीस येथील पीर बाबरशेख दर्गामध्ये रविवारी पुराचे पाणी शिरले होत़े रविवारी कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे हातीस येथील काजळी नदीला पूर आला होत़ा या पुराचे पाणी नदीकाठी असलेल्या दर्ग्यामध्येही शिरल़े दर्गाच्या 7 ते 8 फुटापर्यंत पाणी गेल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. दरम्यान या ठिकाणी जाण्यास प्रशासनाकडून बंदी करण्यात आली असून खबरदारी घेतली जात आह़े.
राजापुरात पुराच्या पाण्याची पुन्हा जवाहर चौकात धडक
शनिवारी रात्री व रविवारी सकाळपासूनच राजापुरात संततधार पडणाऱ्या पावसामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत झाले असून अर्जुना व कोदवली नद्यांना पूर आला आहे. पुन्हा एकदा राजापूर शहरात पुराच्या पाण्याने जवाहर चौकात धडक दिली. यामुळे नगर परिषदेने रविवारी सकाळपासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे व्यापारी व नागरिकांना सतर्क राहण्याच्या इशारा दिला असून शहर बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची शक्यता असल्याने व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. तर शीळ, गोठणे दोनिवडे व दोनिवडे, रेल्वेस्टेशन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
बुधवारपासून संततधार पडणाऱ्या पावसाचा जोर शनिवारी सकाळी काहीसा कमी झाला होता. त्यामुळे पूर ओसरून जनजीवन पूर्ववत सुरू झाले होते. मात्र पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील भातलावणी सुमारे 90 टक्के पूर्ण झाली. यामध्ये अर्जुना नदीकाठावरील शेतीचाही समावेश आहे. मात्र बुधवारपासून पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठावरील शेती पहिले 3 दिवस व रविवारी दुपारी पाण्याखाली गेली. यामध्ये प्रामुख्याने शीळ, गोठणे दोनिवडे, दोनिवडे, गोवळ, शिवणे, प्रिंदावण परिसर आदी गावांमधील मोठ्या प्रमाणात शेतीचा समावेश आहे. गेल्या 3 रविवारी राजापूर शहराला पुराचा वेढा पडला आहे.
8 कि. मी. वळसा घालून गाठले राजापूर स्टेशन
पुराचे पाणी कधीही शहर बाजारपेठेत भरण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकिनारी असलेले व्यापारी व नागरिक सतर्क झाले आहेत. तर पावसाचा जोर लक्षात घेऊन प्रशासनाकडूनही सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुराच्या पाण्यामुळे शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका रोड पाण्याखाली गेला आहे. तर राजापूर-शिळ-चिखलगाव-गोठणे रस्ताही पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. शहरातील अर्जुना नदीपात्रात असलेले पुंडलिक मंदिरही पाण्याखाली गेले असून वरचीपेठ परिसरातील रस्ताही पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील वीजपुरवठाही काही ठिकाणी खंडित झाला आहे. काही ठिकाणी वीजवाहिन्यांवर झाडे पडल्याने पोल व वीजवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. जैतापूर, अणसुरे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. राजापूर रेल्वेस्टेशन रस्ता काही ठिकाणी पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. रेल्वेस्टेशनला जाणाऱ्या प्रवसांना कोंड्यो, हसोळमार्गे रेल्वेस्टेशन गाठावे लागले. यामुळे त्यांना सुमारे 8 कि.मी. वळसा घालून स्टेशन गाठले.
खेड-दापोली मार्गावरही नारिंगीचे पाणी
खेडमध्ये शनिवारी सायंकाळपासून धुवाधार कोसळणाऱ्या पावसाचे थैमान रविवारीही कायमच राहिले. सकाळपासूनच पावसाने धुमाकूळ घातल्याने सायंकाळी 5 च्या सुमारास बाजारपेठेतील वाल्कीगल्लीत जगबुडी पुराचे पाणी घुसताच व्यापाऱ्यांच्या उरात धडकीच भरली. नारिंगीचे पाणी सुर्वे इंजिनिअरींगच्या मार्गावर घुसल्याने खेड-दापोली मार्ग वाहतुकीसाठी पुन्हा बंद झाला. शिवतररोड-कुंभारवाडा मार्गे वाहतूक वळवण्यात आली.
गेल्या आठवडाभरापासून पावसाचा कहर सुरूच आहे. सलग 14 तास पुराच्या पाण्यात अडकलेल्या पूरग्रस्त बाजारपेठेतील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा रविवारी बाजारपेठेत पाणी घुसताच हाहाकार उडाला. सकाळपासून मटण-मच्छीमार्केट पुराच्या पाण्यातच अडकले होते. पावसाचे थैमान सुरूच राहिल्याने जनजीवनही कोलमडले होते. बाजारपेठेत पाणी घुसण्याच्या शक्यतेने नगर प्रशासनाने व्यापाऱ्यांसह नागरिकांना सावधानतेचा इशारा देत सतर्क केले. व्यापाऱ्यांनीही दुकानातच तळ ठोकत साहित्य सुरक्षितस्थळी हलवले. दिवसभर पावसाचा धुमाकूळ सुरूच राहिल्याने सायंकाळी 5 च्या सुमारास बाजारपेठेतील वाल्कीगल्ली पुराच्या विळख्यात अडकली. पावसाचा जोर कायम राहिल्याने मुख्य बाजारपेठेत असलेल्या गांधीचौकातही पुराचे पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर बाजारपेठेकडे जाणारे सर्व मार्ग पोलीस यंत्रणेने अडवले. आपत्कालीन यंत्रणाही सतर्क झाल्या.
नारिंगीचे पाणी सुर्वे इंजिनिअरींगनजीक पुन्हा घुसल्याने सकाळी 9 पासून मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला. सायंकाळी उशिरापर्यंत पूरस्थिती कायमच राहिल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महसूल व नगर प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणाही सतर्क झाल्या. मदतकर्ते, विसर्जन कट्टाचे सदस्य व आपत्कालीन व्यवस्थापन मदतकार्यासाठी सज्ज झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा कहर सुरूच होता.