For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयालाच गळतीचे ग्रहण

11:23 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयालाच गळतीचे ग्रहण
Advertisement

कार्यालयातील कर्मचारी-अधिकाऱ्यांचे छत्रीच्या आधारे कामकाज : जिल्ह्याच्या मुख्य शैक्षणिक कार्यालयालाच पावसाने घेरल्याची स्थिती 

Advertisement

बेळगाव : क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात छताला गळती लागल्याने अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना छत्रीचा आधार घेऊन कामकाज करावे लागत आहे. जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयात ही स्थिती असेल तर उर्वरित ठिकाणच्या कार्यालयांविषयी न बोललेलेच बरे. छताच्या गळतीमुळे महत्त्वाची कागदपत्रे भिजू नयेत, यासाठी प्लास्टिकचे आवरण घालण्यात आले आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाची मुख्य इमारत जुनी आहे. कौलारू छत असल्यामुळे वरचेवर या ठिकाणी गळती लागत आहे. यापूर्वी अनेक वेळा गळती काढण्यात आली असली तरी पुन्हा यावर्षी गळती लागून संपूर्ण कार्यालयात पावसाचे पाणी शिरत आहे. मागील दोन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे मुख्य इमारतीसह इतर खोल्यांमध्येही पावसाचे पाणी झिरपत आहे.

शुक्रवारी व शनिवारी छतावरून पावसाचे पाणी झिरपत असल्यामुळे कार्यालयातील कर्मचारी छत्री घेऊन कामकाज करत होते. संपूर्ण जिल्ह्याचे महत्त्वाचे कार्यालय असतानाही कायमस्वरुपी जिल्हा शिक्षणाधिकारी नसल्यामुळे कार्यालयाकडे दुर्लक्ष होत आहे. शाळांची महत्त्वाची कागदपत्रे पावसात भिजत असल्याने पुढील काळात ही कागदपत्रे मिळणे अवघड होणार आहे. कार्यालयात सर्वत्र प्लास्टिकने झाकलेली कागदपत्रे तसेच प्लास्टिक बादल्या ठेवण्यात आल्या आहेत. दररोज शेकडो शिक्षकांची या कार्यालयामध्ये ये-जा सुरू असते. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचे संपूर्ण कामकाज या कार्यालयातूनच होते. परंतु, कार्यालयातील कर्मचारीच छत्री घेऊन कार्यालयात कामकाज करत असल्यामुळे शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी कार्यालयातील गळती काढण्याची मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.