For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावण्याची सूचना

11:30 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
महामार्गावरील वाहतुकीला शिस्त लावण्याची सूचना
Advertisement

पोलीस आयुक्तांनी घेतली हायवे पेट्रोलिंग युनिटची बैठक

Advertisement

बेळगाव : महामार्गावर अनावश्यकपणे वाहने उभी करू नये, विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत महामार्गावर अपघात किंवा इतर अप्रिय घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचना पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी केली आहे. हायवे पेट्रोलिंगच्या वाहनात कार्यरत पोलीस व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी मार्गदर्शन केले. हायवे पेट्रोलिंगसाठीच राज्य पोलीस महासंचालकांनी काही सूचना दिल्या आहेत. त्या सूचना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आल्या. यावेळी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा उपस्थित होत्या. हायवे पेट्रोलिंगची 9 व 15 होयसळ वाहने आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात आहेत. या वाहनांतील अधिकारी-पोलीस उपस्थित होते.

महामार्गावर अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करावी, वाहनचालकांना वेळेवेळी सूचना कराव्यात. काहीजण अनावश्यकपणे उशिरापर्यंत आपली वाहने महामार्गाशेजारीच उभी करतात. त्यामुळे अपघात झाल्याचीही उदाहरणे आहेत. जर एखादे वाहन नादुरुस्त असेल, त्यांच्याशी संवाद साधून यासंबंधी माहिती घ्यावी व त्यांना योग्य सूचना देण्यात यावी, असेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. वाहने उभी करण्यासाठी ट्रक लेनची व्यवस्था असते. दिसेल तेथे वाहने उभी करणार नाहीत, याची काळजी घ्यावी. याबरोबरच महामार्गावरही विरुद्ध दिशेने वाहने हाकणाऱ्यांची संख्या कमी नाही. तशा चालकांवर कारवाई करावी. त्यांना सूचना देताना बॉडी कॅमेरा सुरू ठेवावा, असा सल्लाही पोलीस आयुक्तांनी दिला.

Advertisement

शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये पाहणी

गुरुवारी सायंकाळी पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, वाहतूक विभागाचे एसीपी पवन एन. आदी अधिकाऱ्यांनी शहरातील वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन पाहणी केली. सखल भागात काही ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो. यासंबंधीही अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना केल्या.

Advertisement
Tags :

.