वंदे मातरम्’ची तोडमोड हे लांगूलचालन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा राज्यसभेत आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ज्या दिवशी ‘वंदे मातरम्’ ची तोडमोड करण्यात आली. त्याच क्षणापासून या देशात अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाच्या राजकारणाचा प्रारंभ झाला आहे. या स्फूर्तीदायी गीताचे संक्षिप्तीकरण करण्यात आले नसते, तर स्वातंत्र्य मिळताना भारताचे विभाजनही झाले नसते, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानाला 150 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने राज्यसभेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष चर्चेचा प्रारंभ करताना ते भाषण करीत होते. या चर्चेत राज्यसभेतील अनेक प्रतिनिधींनी भाग घेतला.
‘वंदे मातरम्’वर संसदेत चर्चा घडवून आणण्याची काय आवश्यकता होती, असा प्रश्न विरोधी पक्षांच्या अनेक सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यालाही शाह यांनी समर्पक उत्तर दिले. या चर्चेचा संबंध पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीशी मुळीच नाही. हे या गीताचे 150 वे वर्ष आहे. त्या निमित्ताने त्यावर चर्चा आयोजित करण्यात आली आहे. हे गीत भारताच्या परिचयाचे आणि सन्मानाचे द्योतक आहे. या गीताची तोडमोड करण्यात आल्याने भारताचे विभाजन करण्याची मागणी करणाऱ्यांना बळ मिळाले. यातूनच पुढे देशाची फाळणी झाली. राजकीय सोयीसाठी कधीही राष्ट्रीय मानचिन्हांचे महत्व घटविण्यात येऊ नये. तसे केल्याने भारताला फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
काँग्रेसची ‘वंदे मातरम्’ पासून दूरी
इतिहास काळापासून काँग्रेसने या गीतापासून अंतर राखले आहे. अनेक दशकांपूर्वी काँग्रेसनेच या गीताचा स्वीकार स्वातंत्र्यसंग्रामाचे घोषवाक्य म्हणून केला. पण विशिष्ट समाजघटकाच्या भावना दुखावतात म्हणून जवाहरलाल नेहरु यांनी या गीताचे ‘विभाजन’ केले. ज्यावेळी या गीताचा सुवर्ण महोत्सव साजरा होत होता, त्या काळातच त्याचे तुकडे करण्यात आले. आम्ही या गीताचा उपयोग राजकारणासाठी करत नाही. या चर्चेचा निवडणुकांशी कोणताही संबंध नाही. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीमुळे ही चर्चा आयोजित करण्यात आली आहे, असा आरोप करणारे लोक या गीताची अवमानना करीत असून त्याचे महत्व कमी करत आहेत. हे गीताची रचना बंगालमध्ये करण्यात आली असली, तरी ते केवळ बंगालपुरते मर्यादित कधीच नव्हते. हे गीत तेव्हापासूनच साऱ्या भारताचे प्रेरणास्रोत आहे. त्यामुळे त्याचा निवडणुकीशी संबंध लावला जाणे, हे राजकारण योग्य नाही, असा प्रत्यारोप अमित शाह यांनी आपल्या भाषणात केला.
खर्गे यांचा प्रतिवाद
अमित शाह यांच्या आरोपांचा काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रतिवाद करण्याचा प्रयत्न केला. या गीताचे संक्षिप्तीकरण करण्याचा निर्णय एकट्या नेहरुंचा नव्हता. तो अनेक नेत्यांनी घेतलेला निर्णय होता. महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर, सुभाषचंद्र बोस आणि नेहरु अशा नेत्यांचा हा निर्णय होता. आम्ही नेहमीच ‘वंदे मातरम्’ म्हणतो. पण जे लोक ते कधीच म्हणत नाहीत, ते आज आमच्यावर टीका करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा यांनी नेहमीच ब्रिटीशांची तळी उचलून धरली होती, असाही आरोप खर्गे यांनी भाषणात केला.
सत्ताधारी, विरोधकांमध्ये शब्दाशब्दी
‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगानावरुन राज्यसभेत सत्ताधारी सदस्य आणि विरोधक यांच्यात चांगलीच वादावादी झाली. सत्ताधारी सदस्यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर अल्पसंख्याकांच्या, विशेषत: मुस्लीमांच्या अनुनयाचा आरोप केला. राष्ट्रीय मानचिन्ह असलेल्या गीतातील पहिली केवळ दोन कडवी स्वीकारणे आणि ऊर्वरित कडवी नाकारणे, ही कृती केवळ मुस्लीमांच्या अनुनयासाठीच होती, असा आरोप बव्हंशी सत्ताधाऱ्यांनी केला. तर काँग्रेसकडून आणि इतर विरोधी पक्षांकडून या आरोपाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला गेला. संसदेत ही चर्चा पूर्ण झाली आहे.