For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आसगाव नाट्याचा ‘डायरेक्टर’ सिंगच!

10:43 AM Jun 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
आसगाव नाट्याचा ‘डायरेक्टर’ सिंगच
Advertisement

हणजूण पोलिसांच्या अहवालात झाले उघड : घर पाडण्यासाठी डिजीपीचा पोलिसांवर दाबाव,निलंबित पोलिसांकडून अहवाला पूर्ण गौप्यस्फोट

Advertisement

पणजी : आसगाव येथील आगरवाडेकर कुटुंबियांचे घर पाडण्यास गोव्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) जसपाल सिंग यांनी आपल्यावर दबाव आणला होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट निलंबित पोलिसांनी केला आहे. त्यामुळे डीजीपींच्या भूमिकेबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जसपाल सिंग यांना त्वरित निलंबित करून सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन मागे घेऊन डीजीपींवर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्राकडे करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्यामुळे आता सारे लक्ष मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे लागले आहे. निलंबित पोलिसांनी मुख्य सचिव पुनीत गोयल आणि उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांना गुऊवारी आपला अहवाल सादर केला. त्यात पोलीस महासंचालक जसपाल सिंग यांनी त्यांच्यावर घर पाडण्यासाठी संशयितांना मदत करण्यासाठी दबाव टाकल्याचे म्हटले आहे. हा अहवाल उघडकीस आल्यानंतर आगरवाडेकर घर पाडण्याच्या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे.

पूजा शर्मावर कारवाई करु नका

Advertisement

मुंबईच्या रहिवासी आणि गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची पत्नी असलेल्या पूजा शर्मा यांनी आगरवाडेकर यांचे घर असलेली जागा घेतली आहे. जागा रिकामी करताना पूजा शर्मा यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, अशा सूचना डीजीपीने केल्याचे अहवालात म्हटले आहे.

जसपाल सिंगची हणजूण पोलिसांना धमकी?

डीजीपी सिंग यांनी हणजूण पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिली की, घर जमिनदोस्त करून जागा सपाट करण्याचे काम पूर्ण झाले पाहिजे. अन्यथा पोलिसांना परिणामांना सामोरे जावे लागेल, त्यामुळे दबावापोटी घर पाडण्याचे काम चालू ठेवण्याची परवानगी दिली, असेही हणजुण पोलिसांनी अहवालात नमूद केले आहे.

कोणत्याही परिस्थितीत जागा खाली व्हायलाच पाहिजे

हणजुण पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे की आगरवाडेकर यांचे घर पाडण्याचे काम सुरू असताना हणजुण पोलिसांनी ते थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र डीजीपी सिंग यांनी त्याबाबत संताप व्यक्त केला. तसेच हणजुण पोलिसांना सक्त ताकीद दिली की कोणत्याही स्थितीत ती जागा खाली व्हायला हवी. घर जमिनदोस्त व्हायला हवे. घर पाडताना कोणी अडथळा आणत असेल तर त्यांना उचलून पोलीस स्थानकात आणा.

यापुर्वीही दिले होते निर्देश

या अहवालातून असेही उघड झाले आहे की डीजीपी सिंग यांनी यापूर्वी एसडीपीओ (उपविभागीय पोलिस अधिकारी) यांच्यासह हणजुण पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक संदेश चोडणकर यांच्याशीही पूजा शर्माच्या आसगाव येथील मालमत्ता खरेदीबाबत चर्चा केली होती. ती जागा रिकामी करण्यासाठी पूजा शर्मा हिला मदत करण्याचे निर्देश दिले होते, असेही अहवालात म्हटले आहे.

पूजा शर्माच्या माणसांना मदत करा

दि. 22 जून रोजी डीजीपीने हणजुण पोलिसांना बोलावले आणि त्यांना सांगितले की, पूजा शर्मा यांची माणसे आसगावला येतील तेव्हा त्यांना मदत करा.

पोखरेंकडून काम थांबविण्याचा प्रयत्न

हणजुण पोलिसांना पणजी पोलीस नियंत्रण कक्षाकडून एका व्यक्तीला मदतीची गरज असल्याचा फोन आला. काही लोक आसगाव येथील गंगा टाईल्स कारखान्याजवळ त्याचे घर पाडत आहेत. त्यानुसार हणजुणचे पोलीस उपनिरीक्षक संकेत पोखरे आणि नितीन नाईक घटनास्थळी दाखल झाले. बुलडोजरने घर पाडत असल्याचे आढळले. प्रदीप आगरवाडेकर आणि त्यांचे कुटुंबीय घरात होते. पोखरे यांनी आगरवाडेकरांचे म्हणणे ऐकून घर पाडण्याचे काम थांबविण्यास सांगितले. घराची कागदपत्रे आणण्यास सांगितले. तसेच चालकाला बुलडोजरसह पोलीस स्थानकात येण्याचे निर्देश दिले होते, असे अहवालात म्हटले आहे.

आगरवाडेकरना ताब्यात घेण्यासाठी दबाव

पोलीस आपले कर्तव्य बजावत असताना डीजीपींचा त्यांना फोन आला, घर पाडण्याचे काम का थांबवले? असा सवाल केला. घर पाडण्याची प्रक्रिया थांबविली असल्याचे सांगितल्यावर डीजीपी संतप्त झाले. पाडण्याचे काम सुऊच ठेवण्यास सांगितले होते. विरोध करणाऱ्या प्रदीप आगरवाडेकर कुटुंबियांना ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात आणण्यासाठी डीजीपींनी दबाव आणला. प्रदीप आगरवाडेकर यांची पत्नी प्रिन्सा आपल्या मुलीसह पोलीस ठाण्यात आली. प्रदीप आणि मुलगा घटनास्थळी थांबले होते, असे अहवालात म्हटले आहे.

आगरवाडेकर पोलीस स्थानकात असताना घर पाडण्याचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना मिळाल्याचे अर्षद ख्वाजा यांनी सांगितले. त्यांना काही शंका असल्यास ते आपल्याशी संपर्क साधू शकतात. ख्वाजाने आपला मोबाईल नंबर पोलिसांना दिला होता. बुलडोजरचे मालक रॉड्रिग्स यानेही आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे हणजूण पोलिसांना सांगितले.

पूजा गुन्हा दाखल करण्याची गरज नाही

डीजीपी सिंग यांनी हणजुण पोलिसांना पुन्हा बोलावून घेतले आणि कोणत्याही परिस्थितीत घर पाडण्याची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. कोणीही काम थांबवू नये. तसेच अर्शद ख्वाजा यांना घर पाडण्याची परवानगी द्यावी, असे सांगितल्याचे हणजुण पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. पूजा शर्मा ही मालमत्तेची मालक आहे आणि प्रिन्साच्या तक्रारीनुसार कोणताही दखलपात्र गुन्हा नोंदवला जाऊ शकत नाही. त्यामुळे प्रिन्साच्या तक्रारीवरून कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही, असे सिंग यांनी बजावले होते, असेही अहवालात नमूद केले आहे.

तीन महिला बाऊन्सरना अटक : आतापर्यंत एकूण सहाजणांना अटक

आसगाव येथील घर पाडल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) काल शुक्रवारी आणखी तीन महिला बाऊन्सरना अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आतापर्यंत सीआयडीने सहा जणांना अटक केली असून हणजुण पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. काल शुक्रवारी सीआयडीने अटक पेल्या सहाजणांपैकी 5 जण घटनास्थळी उपस्थित होते, तर एकाने आपली कार संशयितांना वापरण्यास दिली होती, अशी माहिती पोलीस अधीक्षक राहूल गुप्ता यांनी दिली आहे.

अटक करण्यात आलेल्या सहा जणांत 3 महिला बाऊन्सरचा समावेश आहे. शाहीन सौदागर (38), बिस्मिल्ला गोरगुंडगी (44) व शालन कल्लाप्पा मोरेकर (42) अशी अटक केलेल्या महिला बाऊन्सर्सची नावे आहेत. आगरवाडेकर यांच्याकडून तक्रार मागे घेणारे प्रतिज्ञापत्र एसआयटीला मिळाले आहे. त्याचप्रमाणे पोलीस महासंचालकांबाबत मिळालेल्या माहिती पत्रावर कोणाचीही सही नाही, अशी माहिती गुन्हे शाखेचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी प्रसार माध्यमांना दिली. कोणाचेही नाव नसलेले आणि स्वाक्षरी नसलेल्या अप्रमाणित कागदपत्रांवरून कोणताही निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी या प्रकरणात मुक्त, निष्पक्ष आणि जलद न्याय सुनिश्चित करण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे सांगितले.

जेसीबी चालकाला मिळाला जामीन

आसगाव  येथील आगरवडेकर कुटुंबियांचे घर पाडण्यासाठी वापरण्यात आलेल्या जेसीबीचा चालक प्रदीप राणा याला 20 हजार ऊपयांच्या वैयक्तिक हमी आणि अन्य अटीवर म्हापसा येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी ज्युड सिक्वेरा यांनी जामिनावर सोडण्याचा आदेश दिला आहे. रिअल इस्टेट एजन्ट अर्शद ख्वाजा यानेही जामिनासाठी अर्ज केला आहे. जेसीबी चालक प्रदीप राणा याने जामिनासाठी केलेल्या अर्जात आपण निर्दोष असून आपल्याला नाहक हणजुण पोलिसांनी अटक केली असल्याचा दावा केला होता. घर पाडण्याप्रकरणी पोलीस तपास पूर्ण झाला असून पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद त्याच्या वकिलाने केला. आरोपीने पोलीस तपासात सहकार्य करण्याचे मान्य केल्याचे नमूद करून प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्याने 20 हजार ऊपयांच्या वैयक्तिक आणि तत्सम रक्कमेचा हमीदार देऊन, आणि पुराव्यात वा साक्षीदारांना न धमकावणे या अटींवर जामिनावर सोडण्याचा आदेश दिला.

Advertisement
Tags :

.