महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रदुषणाची ‘कोंडी’

06:06 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्ली, कोलकाता, मुंबईसह देशातील अनेक शहरांना सध्या प्रदुषणाने वेढले आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक दिवसेंदिवस खालावतच असून, ऐन दिवाळसणात दिल्लीकरांसह महानगरवासियांची चांगलीच ‘कोंडी’ होण्याची चिन्हे आहेत. नेमेची येतो पावसाळा, या उक्तीप्रमाणे आता हिवाळा आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारे प्रदूषण वा फॉग हे आता दरवर्षीचे संकट होऊन बसले आहे. त्यामुळे यातून कायमस्वऊपी मुक्तता मिळविण्याकरिता दीर्घकालीन उपाय करणे आवश्यक ठरते.

Advertisement

वायू प्रदूषण ही केवळ आता भारतापुरती सीमित समस्या राहिलेली नाही. आज जगातील अनेक देशांना प्रदुषणाने घट्ट विळखा घातल्याचे दिसत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास, वाहनांची वाढती संख्या, नागरीकरणाचा प्रचंड वेग यामुळे शहरे अक्षरश: काळवंडत चालली आहेत. एकेकाळी चांगल्या हवामानाची नगरे म्हणून गणली जाणाऱ्या शहरांभोवतीची हवाही आता खराब झाल्याचे दिसत आहे. परिणामी शहरे ही आजारांचे घर बनत चालली आहेत. भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतील स्थिती सध्या नियंत्रणाबाहेर गेल्यासारखीच स्थिती आहे. येथील हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने 400 ते 450 ची पातळी ओलांडल्याने हे महानगर गॅसवर असल्यासारखी स्थिती आहे. परिणामी शहरातील शाळा बंद ठेवण्याची वेळ सरकारवर आली आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हवेची गुणवत्ता थोडीफार सुधारली असली तरी दिल्लीकरांसाठी तो तात्पुरता दिलासा असेच म्हणावे लागेल. मात्र, या प्रदूषण कोंडीतून कायमस्वरुपी तोडगा काढायचा असेल तर केंद्र आणि राज्य सरकारांना व्यापक विचारमंथन करून पावले टाकावी लागतील. सरकारच्या प्रयत्नांना सर्वसामान्य जनता, उद्योगधंदे आणि शेतकरी बांधवांनीही साथ देण्याची गरज आहे.

Advertisement

शेतीत खुंट जाळण्याच्या घटनांमध्ये 35 टक्के वाढ

दिल्लीच्या शेजारी असलेल्या पंजाब व हरियाणा आदी राज्यांमध्ये दरवर्षी याच सुमारास शेतपिकाचे खुंट जाळले जातात. परिणामी दिल्ली व परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण होते. यंदा या धुराने संपूर्ण दिल्लीला स्वत:मध्ये लपेटून घेतले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात शेती जाळण्याच्या घटनांमध्ये 35 टक्के वाढ झाली असून, या घटना 12 हजारांपर्यंत पोहोचल्या आहेत. दिल्लीच्या अनेक भागांमध्ये हवेच्या गुणवत्ता निर्देशांकाने 400 ची पातळी ओलांडली असल्याचे दिसते.

न्यायालयाचे ताशेरे

दिल्लीतील प्रदुषणावरून न्यायालयाने यंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. शेतात खुंट जाळण्याचे प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. ही जनतेच्या आरोग्याची हत्या आहे. हे प्रकार सक्तीने थांबवा. अन्यथा मोबदला द्या. मात्र, बेपर्वाई खपवून घेणार नाही, असे न्यायालयाने सुनावले आहे. तसेच राज्य सरकारांनाही कडक ताकीद देताना ‘आम्हाला परिणाम दिसले पाहिजेत’, असे निर्देश दिले आहेत.

सम विषम वाहन क्रमांक योजना

दिल्लीतील हवेच्या प्रदुषणाने सध्या चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून, त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजनांचाही अवलंब करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून सम-विषम क्रमांक वाहन योजना लागू करण्याचा विचार केला जाऊ शकतो. या योजनेअंतर्गत सम आणि विषम नोंदणी क्रमांकाच्या वाहनांना एक दिवसाआड वाहतुकीची मुभा दिली जाते. या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला असला तरी 20 नोव्हेंबरनंतर त्यावर विचार केला जाणार असल्याचे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी स्पष्ट केले आहे.

सम-विषमचा फायदा काय?

चार वर्षांपूर्वीही अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात हा केवळ देखावा आहे. पूर्वीही हे सूत्र अमलात आणले गेले. त्याचा खरोखरच काय फायदा झाला, असा सवाल न्या. संजय किशन गौल यांनी केला आहे.

दिल्लीत फटाक्यांवर बंदी

दुसरीकडे दिल्लीतील प्रदुषणावर मात करण्यासाठी फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दिवाळीपूर्वीच शहराच्या प्रदुषणाने कळस गाठला आहे. त्यामुळे दिवाळीत यात आणखी भर पडून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, हे विचारात घेऊन सरकारकडून यासंदर्भात निर्बंध लादण्यात आले आहेत.

फटाक्यांवरून नागरिकांमध्ये दोन गट

दिल्लीतील फटाक्यांवर बंदी घालण्यात आली असली, तरी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील 32 टक्के कुटुंबे दिवाळीत फटाके वाजविण्याचा विचार करीत आहेत. तर 43 टक्के कुटुंबांना वाढत्या चिंताजनक प्रदुषणामुळे फटाके वाजवू नयेत, असे वाटते. एका समाजमाध्यमाद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. दिल्लीत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी असली, तरी शेजारील हरियाणा व उत्तर प्रदेशात फटक्यांच्या विक्रीवर कोणतीही बंदी नाही. दिल्लीवासीय तेथूनच फटाक्यांची खरेदी करत असल्यामुळे एकूणच फटक्यांवरील निर्बंधाची किती कडक अंमलबजावणी होणार व या निर्णयाचा किती लाभ होणार, हे लवकरच कळणार आहे.

मुंबईच्या हवेलाही ग्रहण

दिल्लीबरोबरच आता मुंबईच्या हवेलाही प्रदुषणाचे ग्रहण लागल्याचे पहायला मिळते. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणाऱ्या या शहरावरही काजळी चढल्याचे दिसत आहे. मुंबईत हिवाळ्यात साधारणपणे धुके साधारण नऊ ते साडेनऊपर्यंत असते. आता त्याची वेळ 11 पर्यंत वर सरकली आहे. 12 लाख खासगी वाहने, मेट्रोची कामे, बांधकामे अशी विविध कारणे मुंबापुरीच्या प्रदुषणात भर घालत असल्याचे दिसून येते. हवामानात सातत्याने बदल होत आहेत. याशिवाय उंचच उंच इमारतींमुळेही हवेच्या पॅटर्नमध्ये बदल होत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. मुंबईला समुद्राचे वरदान आहे. या समुद्राकडून वाहणाऱ्या हवेमुळे मुंबईची हवा साफ होत असते. मात्र, प्रदुषणाचा वेग वाढल्याने समुद्री हवा तिला अटकाव करण्यास असमर्थ ठरत असल्याचे तज्ञ मंडळींचे म्हणणे आहे.

ला निना, मान्सूनचा विलंब, ऑक्टोबरमधील उष्णता याचाही परिणाम प्रदूषणावर झाल्याचे मानण्यात येते. मुंबईतील प्रदुषणाने उच्चांक गाठल्यानंतर राज्य सरकार व मुंबई महापालिकेची यंत्रणाही खडबडून जागी झाली आहे. मुंबईतील रस्ते धूळमुक्त करण्यासाठी मुंबई मनपाने विशेष पथके स्थापन करावीत, एक हजार टँकर्स लावावेत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. अँटी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रदुषणाला अटकाव करण्यासाठी पुढच्या काही दिवसांत अनेक पावले उचलली जाणार आहेत.

पुण्यात बांधकामासाठी नियमावली

देशातील प्रमुख शहरांतील हवा प्रदुषणाची पातळी वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी पुणे महापालिकेने नियमावली तयार केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी दैनंदिन अहवाल आयुक्तांना सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बांधकामाच्या ठिकाणी चारही बाजूने किमान 25 फूट उंचीचे पत्रे लावणे, इमारतीच्या भोवती हिरव्या रंगाचे कापड लावणे, पाडकामात धूळ उडू नये, यासाठी ओल्या कापडाचे आच्छादन बंधनकारक करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगपालिकाही अलर्ट झाली असून, हवा प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनीही   नियम तयार केले आहेत.

 

आरोग्याला  धोका

हिवाळा हा ऋतू आरोग्यदायी मानला जात असला, तरी प्रदुषणाची सर्वाधिक धोका याच काळात निर्माण होत असतो. बांधकामातून हवेत पसरणारे सूक्ष्म धूलिकण व वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे श्वसनरोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दिल्ली मुंबईपासून ते पुण्यापर्यंत सर्वच महानगरांमध्ये श्वसनाचे ऊग्ण वाढल्याचे सांगितले जाते. दूषित हवेचा सर्वाधिक धोका हा लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक व गर्भवतींना असतो. अस्थमा तसेच रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांनाही अनेकदा मोठ्या त्रासास सामोरे जावे लागते. त्यामुळे या तीन घटकांसह दुर्धर आजार असणाऱ्या ऊग्णांनी या काळात विशेष काळजी घेण्याचा सल्ला आरोग्यतज्ञांनी दिला आहे.

कशी घ्यावी काळजी

प्रदुषणापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. घराबाहेर पडताना तोंडाला मास्क वा ऊमाल बांधणे, पाण्याची वाफ घेणे, मिठाच्या गुळण्या करणे, आहारात फळे व पौष्टिक घटकांचा समावेश करणे, आदी गोष्टींचा प्रत्येकाने अवलंब करणे आवश्यक आहे.

स्मॉग टॉवर्स हा उपाय नव्हे!

दिल्ली परिसरातील वायू प्रदूषणाच्या समस्येवर धुके मनोरे अर्थात स्मॉग टॉवर्स हा उपाय नाही. केंद्र आणखी महाकाय हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याच्या बाजूने नाही, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी म्हटले आहे. वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी धुके मनोऱ्यांचा पर्याय पुढे केला जात आहे. मात्र, त्याबाबत सहमती दिसत नाही.

 

एकूणच दिल्ली, मुंबई, कोलकाता, ठाणे, पुणे व अन्य प्रमुख शहरांतील प्रदुषणाचे त्या त्या शहरातील जनजीवनावर परिणाम झालेले दिसतात. मानवी जीवनात आरोग्य ही संपत्ती मानली जाते. परंतु, वाढत्या प्रदूषणाने माणसाच्या आरोग्यापुढेच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. हे पाहता शुद्ध हवा व पर्यावरणासाठी भविष्यात ठोस पावले उचलणे क्रमप्राप्त ठरते. मागच्या काही वर्षांत ग्लोबल वॉर्मिंग वा हवामान बदलाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जागतिक हवामान परिषदेतही हरितवायू उत्सर्जनावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून सातत्याने चर्चा झाली आहे. त्यामुळे या पातळीवर गांभीर्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. यंदा मोसमी पावसानेही पाठ फिरविल्याने देशावर दुष्काळाचे सावट आहे. ढगफुटी, दुष्काळ हे सारे जागतिक हवामान बदलाचेच परिणाम मानले जातात. त्यामुळे पर्यावरणाला चळवळीचे स्वऊप देणे, ही काळाची गरज ठरते. जंगलतोडीला लगाम घालणे, झाडे लावणे, वाहनांचा मर्यादित वापर करणे, यांसह वेगवेगळ्या पातळीवर आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील. केंद्र, राज्य, उद्योग व जनता जनार्दनाच्या सामूहिक प्रयत्नांतूनच ही कोंडी फुटू शकेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article