ज्ञानी आणि अज्ञानी ह्यांच्या कर्म करण्यातला फरक
अध्याय दुसरा
बाप्पा म्हणाले, दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी आणि भक्तांच्या संकटाचे निवारण करण्यासाठी मी सगुण अवतार घेत असतो. त्यानुरूप मलाही कर्मे करावी लागतात. ती पाहून इतरांना प्रेरणा मिळावी असा त्यामागे उद्देश आहे. जर अवतार काळात मी लोकसंग्रहाचे कार्य केले नाही तर लोक माझ्याप्रमाणेच वागू लागतील. त्यामुळे संप्रदायाचा नाश होईल, गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल आणि त्याला मी कारणीभूत ठरेन. सिद्ध मंडळींनीही इतरांचे भले होण्याच्या दृष्टीने लोकसंग्रह करून त्यांना त्यांच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून द्यावी आणि स्वत:चा उद्धार करून घेण्यासाठी प्रवृत्त करावे.
ज्ञानी माणसाला हे माहित असतं की तो कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे आणि समोर दिसणाऱ्या वस्तू कायम टिकणाऱ्या नसल्याने त्यामध्ये गुंतून पडण्यात काही अर्थ नाही. ह्याउलट अज्ञानी मनुष्य आपण कर्ते आहोत ह्यावर ठाम असतो. त्यामुळे तो करत असलेल्या कर्मातून तो फळाची अपेक्षा करतो. बाप्पा ज्ञानी आणि अज्ञानी लोक कशा पद्धतीने कर्म करतात, दोघांच्या कर्म करण्यात काय फरक आहे हे समजावून सांगत आहेत.
तो श्लोक असा, कामिनो हि सदा कामैरज्ञानात्कर्मकारिण । लोकानां संग्रहायैतद्विद्वान् कुर्यादसक्तधी ।। 25।। नियोजित कर्म प्रत्येकानं का करायला हवं म्हणजे समाजव्यवस्था नीट चालू राहील हे बाप्पांनी मागील श्लोकात सांगितलं पण कर्म करणाऱ्यांचे ज्ञानी व अज्ञानी असे दोन गट आहेत असं बाप्पा या श्लोकात सांगतात. जे स्वत:ला कर्ता समजतात ते अज्ञानी असतात. त्यांना त्यांनी केलेल्या कर्मातून फळाची अपेक्षा असते. किंबहुना केलेल्या कर्माच्या मानाने त्यांची फळाची अपेक्षा थोडी जास्तच असते. अशा अज्ञानी लोकांना सतत कर्म करत रहावे असे वाटत असते. एक झाली की दुसरी, दुसऱ्यातून तिसरी अशा त्यांच्या इच्छा, अपेक्षा सतत वाढत्या असतात. त्यामुळे फळाच्या आशेने कर्म करण्यातच त्यांचे आयुष्य निघून जाते. केलेल्या कर्मातून मिळणाऱ्या इष्ट, अनिष्ट फळांचा उपभोग घेण्यासाठी त्यांचा पुनर्जन्म होतो.
ज्ञानी मंडळी मात्र स्वत:ला कर्ता समजत नसल्याने आपण करत असलेले कर्म हे ईश्वराचे कर्म असून त्याला हवे असेल तेव्हढे ते तो आपल्याकडून करून घेईल अशा मताचे असतात. तसेच ज्यांना अपेक्षा बाळगून केलेल्या कर्माचे चांगले, वाईट कसेही फळ मिळाले तरी ते पुनर्जन्मास कारणीभूत होते हे माहित असते. त्यामुळे ते कोणतीही अपेक्षा न ठेवता वाट्याला आलेले काम समाजाच्या कल्याणाचे उद्दिष्ट ठेऊन करतात. त्यांचे हे उद्दिष्ट लोकांच्या लक्षात आले की, लोक आपणहून त्यांच्याभोवती जमा होतात. काहीवेळा तर त्यांचे लोकांना एव्हढे महत्त्व वाटते की, प्रसंगी देवाला बाजूला ठेऊन लोक त्यांच्या भजनी लागतात. कित्येक साधूसंतांची चरित्रे अभ्यासली की ही बाब लक्षात येते. असे लोक लोकसंग्रह करून त्यांच्या संपर्कात येणाऱ्या लोकांच्या अंगातली सुप्त शक्ती जागृत करतात आणि त्यांना आत्मोद्धार करून घेण्यासाठी प्रवृत्त करतात.
बऱ्याचवेळा निरपेक्ष कर्म करण्याच्या नादात असलेल्या साधकाला इतर लोक अपेक्षा ठेऊन कर्म करत आहेत हे लक्षात येते आणि तो त्यांनी निरपेक्षतेने कर्म करावे असे सांगू लागतो परंतु त्यांनी असे करू नये असे बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
विभिन्नत्वमतिं जह्यादज्ञानां कर्मचारिणाम् ।
योगयुक्त सर्वकर्माण्यर्पयेन्मयि कर्मकृत् ।। 26 ।।
अर्थ- कर्म करणाऱ्या योग्याने इच्छायुक्त कर्म करणाऱ्या अज्ञानी मनुष्यांची गैरसमजूत दूर करण्याचा प्रयत्न करू नये. स्वत: मात्र सर्व कर्में माझ्या ठिकाणी अर्पण करावीत.
क्रमश: