संवाद अभियानातून मराठा समाजाला योग्य दिशा देणार
कोल्हापूर :
राज्यभरात निर्माण झालेल्या सामाजिक तणावास सोशल मीडिया जबाबदार आहे. सोलश मीडियावर समाजाच्या नावाखाली व्हायरल होणाऱ्या पोस्टला चेहरा नसल्यामुळे समाजा-समाजामध्ये तणाव निर्माण होत आहे. हि सामाजिक तणावाची परिस्थिती बदलण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सकल मराठा समाज संवाद अभियान राबविले जाणार आहे. अभियानातंर्गत विविध क्षेत्रातील प्रमुख लोकांना एकत्र करुन मार्गदर्शन केले जाणार आहे. अभियानामधून समाजाला योग्य दिशा देण्याचा उद्देश असल्याचे मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले.
सकल मराठा समाज संवाद अभियानबाबत मंगळवारी दसरा चौक राजर्षी शाहू स्मारक भवन येथे तयारी बैठक झाली. बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना कोंढरे बोलत होते. राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक प्रमुख उपस्थित होते.
कोंढरे म्हणाले, गेल्या दोन वर्षात राज्यातील सामाजिक चित्र बदलले आहे. सोशल मीडियावरील पोस्टमुळे तणाव वाढत आहे. मराठा समाज बहुसंख्यअसला तरी सामाजिकस्थितीत पिछेहाट होत आहे. समाजाने जगा बरोबर चालले पाहिजे. टेक्नॉलॉजीचा पुरेपुर वापर केला पाहिजे. शेतजमीन विकू नका जो समाजाला मदत करणार नाही, तो समाजाचा नाही. समाजाला प्रगल्भ करण्यासाठी संवाद अभियानातून मार्गदर्शन केले जाणार असल्याचे कोंढरे यांनी सांगितले.
राष्ट्रीय उपाध्यक्ष मुळीक म्हणाले, सारथी व अण्णासाहेब पाटील महामंडळ या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती समाजाला होण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये शिबिरांचे आयोजन केले जात आहे. समाज एकसंध करण्यासाठी सदस्य नोंदणी सुरु असल्याचे मुळीक यांनी सांगितले. स्वागत जिल्हाध्यक्ष शशीकांत पाटील यांनी केले. बैठकीला सरदार पाटील, शिवाजी पाटील, सुहास निंबाळकर, बंडोपंत चव्हाण, राजेंद्र खेराडे, अमरसिंह पाटील, संतोष सावंत, दीपक रावळ, प्रदीप पाटील, अवधुत पाटील आदी उपस्थित होते. मारुती मोरे यांनी आभार मानले.
,