'धूम स्टाईल'ने दोन ठिकाणी सोनसाखळी लंपास
कोल्हापूर :
दुचाकीवरुन धुम स्टाईलने येवून, शहरात दोन ठिकाणी चेन स्नॅचरकडून एका तरुणाच्या गळ्यातील आणि एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसडा मारुन घेवून पोबारा केल्याच्या घटना घडल्या आहेत. एका ठिकाणी सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न झाला. हे चेन स्नॅचर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याच्या शोध सुरु केला आहे. या घडल्या प्रकाराची पोलिसात नोंद झाली आहे.
पियुश सुधीर अगरवाल (वय 29, रा. अगरवाल हाईटस्, पार्वती कुंज समोर, नागाळा पार्क, कोल्हापूर) हे सोमवारी रात्री नऊ वाजता जेवण झाल्यानंतर कुटुंबीयांसाठी आईक्रीम घेण्यासाठी महावीर कॉलेजसमोरील चौकात दुचाकीवरून आले होते. त्यांनी एका फेरीवाल्याकडून आईक्रीम विकत घेतले. त्यानंतर ते मोबाईलवरुन ऑनलाईन पैसे पाठवित होते. याचदरम्यान त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका दुचाकीवरील दोघा तरुणापैकी एक जण दुचाकीवरुन उतरला. त्यांना पाठीमागून धक्का मारत, अगरवाल यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे चेन हिसडा मारून घेवून, दुचाकीवऊन सिनेस्टाईलने पलायन केले. त्यानंतर अगरवाल यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते मिळून आले नाही. याबाबत त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दरम्यान, राजोपाध्येनगरातील एका हॉस्पिटलमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारी पूजा अमोल पोवार (वय 39, रा. इंगवले कॉलनी, नवीन वाशी नाका, कोल्हापूर) ही महिला सोमवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास हॉस्पीटललगतच्या मेडिकल दुकानामध्ये उभ्या होत्या. यावेळी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दुचाकीवरील दोघापैकी एका तरुणाने त्यांच्या गळ्यातील बारा ग्रॅमची सोन्याची चेन हिसडा मारून घेतली. या महिलेने चोर चोर असे म्हणून आरडा-ओरड केला. हे एकून मेडिकल व हॉस्पीटलमधील काही तऊण बाहेर आले. दोघे चोरटे काळ्या रंगाच्या दुचाकीवरून पळून गेले. याबाबत पोवार यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर तिसरी घटना रंकाळा परिसरात घडली. पण या ठिकाणी चोरट्याच्या हाती काही लागले नाही.