कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भक्ताने मन आणि बुद्धी ईश्वरचरणी अर्पण करावी

06:30 AM Apr 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय नववा

Advertisement

भक्तीमध्ये बाप्पांना दिखाऊपणा बिलकुल आवडत नाही. काही मंडळी आपण किती मोठे भक्त आहोत, हे मोठमोठी मंदिरे बांधून सिद्ध करण्याच्या प्रयत्नात असतात. समाज त्यांचं मोठेपण मान्य करून त्यांचा उदोउदोही करत असतो. परंतु बाप्पा सांगतात की, मी अशा ठिकाणी कधीच नसतो कारण मला भक्तीचं स्तोम माजवून मोठेपणा मिळवू इच्छिणाऱ्या लोकांचा मुळातच तिटकारा आहे. कारण त्यांच्या मनात माझी मंदिरे उभी करून जनमानसात स्वत:ची प्रतिमा उंचावायची असते. श्रीगोंदवलेकर महाराज म्हणतात मंदिर हे सोन्याचांदीचं असण्यापेक्षा दगडा मातीचं असावं आणि ते अयाचित वृत्तीने चालावं म्हणजे मंदिराच्या उभारणीसाठी किंवा त्यातील पूजाअर्चा इत्यादि चालू ठेवण्यासाठी कुणाकडे याचना करू नये. मंदिरात खऱ्या भक्ताला मुक्त प्रवेश असावा. अशा भक्ताचा भक्तिभाव ईश्वराची मूर्ती बघितल्यावर, उचंबळून येत असतो. ईश्वर भेटीचा आनंद त्याच्या डोळ्यातून ओसंडून वहात असतो. मंदिर साधंसं असलं तरी त्याला चालतं कारण ईश्वराचं ऐश्वर्य तो जाणून असतो. ईश्वरही अशा प्राणप्रिय भक्तांची वाट बघत असतो. त्यांची निस्वार्थ भक्ती, त्यांचं त्याच्यावरील प्रेम ईश्वराला वेड लावतं. निस्सीम भक्ती करणारे संत सज्जन, ज्येष्ठ गीतकार श्री पी. सावळाराम ह्यांच्या पुढील गीतात वर्णन केल्याप्रमाणे घरात देवाचे पाऊल पडल्यानंतर घराचे मंगल देऊळ कसे होते ह्याची निश्चितच प्रचिती अनन्य भक्त घेत असतील व देवाचा नित्य सहवास अनुभवत असतील. ते गीत असे, भक्तीच्या फुलांचा बोलतो सुवास । तुझा देव येतो तुला भेटण्यास। चंदनाचा देह उटी उगाळीत ।प्राणदीप माझा लावी फुलवात । धूप जाळी देवा अंतरीचा ध्यास । देवा तुझ्यावरी जीव-फूल वाही । नामाची तुझिया आरती मी गाई। ध्यानमग्न होता या हो सावकाश । पडता घरात देवाचे पाऊल । जाहले घराचे मंगल देऊळ। नित्य घडो देवा, तुझा सहवास ।

Advertisement

वर वर्णन केल्याप्रमाणे भक्ती करण्यासाठी काय करायला पाहिजे ते बाप्पा वरेण्याला पुढील काही श्लोकातून सांगत आहेत.

अतो भक्त्या मयि मनो विधेहि बुद्धिमेव च ।

भक्त्या यजस्व मां राजंस्ततो मामेव यास्यसि ।।10 ।।

अर्थ- मन आणि बुद्धि भक्तिपूर्वक माझे ठिकाणी ठेव. हे राजा, भक्तीने माझे यजन कर म्हणजे मजप्रत येशील.

विवरण - ईश्वराची निस्सीम भक्ती करण्यामध्ये आपलं मन आणि बुद्धी हे मोठेच अडथळे ठरतात. आपले कान, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ ही ज्ञानेंद्रिये बाह्य गोष्टींचे आपल्याला सतत आकर्षण दाखवत असतात आणि मनाला त्या आकर्षक गोष्टींची इतकी भुरळ पडते की, त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर मन बेचैन होते. ती बेचैनी दूर करण्यासाठी, माणसाची बुद्धी निरनिराळ्या नैतिक, अनैतिक गोष्टी इंद्रियांकडून घडवून आणते. ह्या सगळ्या गोष्टींच्या पाठीमागे माणसाचा अहंकार कार्यरत असतो आणि योजल्याप्रमाणे घडेल की, नाही याची चिंता चित्त करत असते. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार ह्याला अध्यात्मात अंत:करण चतुष्ट्या असं म्हणतात. हेच जर अंत:करणाचे चारही भाग ईश्वराच्या चरणी अर्पण केले तर भक्तीचा कळस गाठता येतो. म्हणून बाप्पा वरेण्याला सांगतायत की, तुझं मन आणि बुद्धी, भक्तीपूर्वक माझ्या ठिकाणी ठेव. हे सांगण्याचा बाप्पांचा मुख्य उद्देश असा आहे की, माणसाचं मन आणि बुद्धी ह्या दोन गोष्टी त्याला ईश्वरी कृपेपासून वंचित ठेवत असतात. मन, बुद्धी आणि अहंकार यांची युती झाली की, मनुष्य स्वत:ला कर्ता समजू लागतो. आपण म्हणू तीच पूर्व दिशा हे सगळ्यांनी मान्य करावं असं त्याला वाटू लागतं, जोडीला अभिमान असतोच. अभिमान म्हणजे मीच सर्व काही करू शकतो अशी खात्री वाटणं आणि अहंकार म्हणजे माझ्यासमोर इतर सर्व तुच्छ आहेत अशी अहंमान्यतेची वागणूक इतरांना देणं होय.

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article