For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच गोव्यात शिक्षणाचा विकास

11:42 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
भाऊसाहेबांच्या दूरदृष्टीमुळेच गोव्यात शिक्षणाचा विकास
Advertisement

आमदार संकल्प आमोणकर यांचे प्रतिपादन, युवक संघ हायस्कुलचे स्नेहसंमेलन साजरे

Advertisement

वास्को : शिक्षणापासून कोणीच वंचित राहू नये म्हणून माजी मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांनी गोव्यातील प्रत्येक भागात सरकारी शाळा सुरू करून मोठे कार्य केले. शिक्षण म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. शिक्षणाच्या प्रसारासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर यांनी केले. हेडलॅण्ड-सडा येथील युवक संघ शैक्षणिक संस्थेच्या युवक संघ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार आमोणकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी नगरसेविका कृणाली पार्सेकर, संस्थेचे अध्यक्ष रमाकांत कुडपकर, मुख्याध्यापिका उर्मीला पवार, प्राथमिक विद्यालय प्रमुख कांचन कुडपकर, निवृत्त मुख्याध्यापक दयानंद राणे, संस्थेचे खजिनदार सोनल मेस्ता, पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमेश पुजारी व इतर पदाधिकारी उपस्थित होते. आमदार आमोणकर म्हणाले, की, भाऊसाहेब बांदोडकर यांच्या दूरदृष्टीमुळे गोव्यात शिक्षणाचा विकास झाला. आज राज्यात शैक्षणिक संस्था चांगल्याप्रकारे कार्य करीत आहेत. युवक संघ संस्थेचे शिक्षण क्षेत्रातील योगदान महत्वाचे आहे. यापुढेही या संस्थेने आपले कार्य यशस्वीरित्या पार पाडावे असे ते म्हणाले. यावेळी नगरसेविका कृणाली पार्सेकर यांचेही भाषण झाले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याध्यापिका उर्मीला पवार यांनी अहवाल वाचन केले. शिक्षक तानाज शेट यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले. प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांच्याहस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका तृप्ती करमलकर व साईली आजगावकर यांनी केले तर शिक्षिका स्नेहा शेटगांवकर यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने स्नेहसंमेलनाची सांगता झाली.

Advertisement
Advertisement
Tags :

.