वेलिंगकरांच्या अटकेच्या मागणीला जोर
मडगावात दुपारपासून रात्रीपर्यंत निदर्शने चालूच : पणजी, मांद्रे, पेडणेतही पोलिसात तक्रारी सादर
मडगाव, पणजी, पेडणे : हिंदू महारक्षा आघाडीचे गोवा राज्य निमंत्रक प्राचार्य सुभाष भास्कर वेलिंगकर यांनी जुने गोवे येथील सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाची ‘डीएनए’ चाचणी करावी अशी मागणी केल्याने ख्रिस्ती लोकांच्या भावना दुखावल्याची तक्रार गोव्यातील विविध पोलिसस्थानकांवर करण्यात आली आहे. दुसऱ्या बाजूने त्यांच्या अटकेच्या मागणीनेही जोर धरला आहे. काल शुक्रवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत खिस्ती लोकांनी मडगाव पोलिसस्थानकासमोर निदर्शने केली. उशिरा निदर्शनांची जागा बदलून कोलवा जाणाऱ्या रस्त्यावरील सर्कलवर ठाण मांडले. जोपर्यंत वेलिंगकरांना अटक होत नाही, तोपर्यंत जागेवरुन हटणार नाही, असा निर्धार निदर्शकांनी जाहीर केला आहे. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आंदोलनकर्त्यांनी फ्लाय ओव्हरमार्गे जात मडगावहून काणकोणकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठाण मांडले. तेथून रात्री बाराच्या सुमारास त्यांनी कोलवा सर्कलकडे मोर्चा वळविला. एकंदर परिस्थितीत मडगावात वातावरण तणावग्रस्त झाले आहे.
दुपारपासूनच मोठा जमाव
दुपारी 2.30 वाजल्यापासून आंदोलनकर्ते मडगाव पोलिसस्थानकासमोर जमू लागले होते. सुमारे 400 लोकांचा जमाव होता. यावेळी पोलिसांना एक निवेदन देण्यात आले. त्यात या प्रकरणातील संशयित आरोपीला विनाविलंब अटक करा, अशी मागणी करण्यात आली. पोलिसांचे म्हणणे असे होते की, मडगावात सादर करण्यात आलेली तक्रार डिचोली पोलिसस्थानकाकडे पाठविण्यात आली असून डिचोली पोलिसच त्यावर कारवाई करतील.
कडक पोलीस बंदोबस्त
रात्री 11 वाजण्याच्या सुमाराला मडगावच्या मडगाव कॅफेजवळ आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच बैठे आंदोलन सुरु केले. यावेळी कडक पोलिस बंदोबस्त होता. हा रस्ता अडविल्यामुळे मडगाव-नावेलीमार्गे राज्याबाहेर जाणाऱ्या लहान वाहनचालकांना अडचणीचे झाले. रात्री उशिरापर्यंत मडगाव शहर पोलिस आणि वाहतूक पोलिस परिस्थितीवर नजर ठेवून होते.
सरकार योग्य ती कारवाई करील : मंत्री सिक्वेरा
सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या डीएनएसंदर्भातील टिप्पणीबद्दल सुभाष वेलिंगकर यांच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारींवर सरकार योग्य ती कारवाई करेल, असे पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांनी मडगावात सांगितले. दर शुक्रवारी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात ते लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यासाठी येतात. यावेळी पत्रकारांनी सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्यासंदर्भात अलीकडेच सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर निर्माण झालेल्या वादाबद्दल त्यांचे मत विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.
सांप्रदायिक स्वरुपाची टिप्पणी : फेरेरा
म्हापशात काँग्रेसचे हळदोणचे आमदार अॅड. कार्लोस आल्वारेस फेरेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी केली. सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या विऊद्धच्या टिप्पणीला सांप्रदायिक स्वरूपाची संबोधून अशी विधाने संपूर्ण कॅथलिक समुदायाचा तसेच सर्वसाधारणपणे गोमंतकीयांचा अपमान करणारी आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जातीय द्वेष पसरवणाऱ्यांना अटक करण्याचे जे आश्वासन दिले आहे ते पूर्ण करावे, असे आव्हानही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
वेलिंगकरांना जागा दाखवून देणार
गोंयच्या सायबाची ख्याती साऱ्या जगभर आहे. गोव्यात यापूर्वी कधीच गोंयच्या सायबाबद्दल अपशब्द काढण्यात आले नव्हते. परंतु वेलिंगकर यांनी दुसऱ्यांदा असे कृत्य केले आहे. यापूर्वी कृत्य केल्यानंतर आम्ही माणुसकीच्या दृष्टीकोनातून शांत राहिलो होतो. परंतु आता वेलिंगकर यांना त्यांची जागा दाखवून देणार आहोत. त्यांना अटक करण्यासाठी गोव्यात रान उठवू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे पणजीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीचे गोवा अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. अविनाश भोसले, कारोणा पंचायतीच्या सरपंच सेन्ड्रा फर्नांडिस, जनरल सेक्रेटरी रविंद्र तळावलीकर, सदस्य डॉ. फेलिक्स फर्नांडिस आदी उपस्थित होते.
अटक करा, तडीपार करा
माजी प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ख्रिश्चन बांधवांच्या भावना दुखावल्या कारणास्तव पेडणे तालुक्यातील ख्रिश्चन बांधवांनी पेडणे पोलिसस्थानकाचे निरीक्षक सचिन लोकरे यांच्याकडे सुमारे 150 सह्यांचे लेखी निवेदन सादर करून करुन वेलिंगकरांना ताबडतोब अटक करावी तसेच त्यांना तडीपार करावे, अशी मागणी केलेली आहे. हरमलचे माजी सरपंच डॅनियल डिसोजा बॉस्को फर्नांडिस, पीटर कार्दोझ, वेलेरिया फर्नांडिस व अन्य ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मांद्रेतही अटकेची मागणी
हरमल येथील ख्रिश्चन बांधवानी मांद्रे पोलिसस्थानकात निवेदन सादर करुन वेलिंगकर यांच्या अटकेची मागणी केली आहे. हरमलचे माजी सरपंच इनसियो डिसोझा, बॉस्को फर्नांडिस, आलेसिन रॉड्रिग्ज, पिटर कार्दोझ व अन्य लोक यावेळी उपस्थित होते. मांद्रेचे पोलिस निरीक्षक शेरीफ याना हे लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.