मराठीला आता राजभाषेचा दर्जा द्यावा
मराठीप्रेमींची सावंत सरकारकडे मागणी : अभिजात दर्जाबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन
पणजी : केंद्र सरकारतर्फे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन इतिहासातील समृद्ध अशा भाषेचा गौरव करण्यात आला आहे. आता राज्य सरकारने जागे होण्याची गरज असून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावा. राज्यात मराठी भाषेला योग्य न्याय देण्यासाठी घरोघरी जाऊन प्रचार करणार, अशी माहिती मराठीप्रेमींनी काल शुक्रवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
गोमंतक साहित्य सेवक मंडळाच्या कार्यालयात मराठी संस्था प्रमुखांच्या उपस्थितीत संयुक्त पत्रकार परिषद शुक्रवारी घेण्यात आली. यावेळी कोकण मराठी परिषदेचे अध्यक्ष सागर जावडेकर, कोकण मराठी परिषदेचे रमाकांत खलप, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी आमोणकर, आयएमबीचे अध्यक्ष दशरथ परब, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, तसेच किसन फडते, श्रद्धा खलप व चित्रा क्षीरसागर उपस्थित होत्या.
मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा यासाठी आमच्या संस्थांतर्फे अनेक वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचा सन्मान केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे मराठीप्रेमींतर्फे वेगळाच आनंद आणि उत्साह बघायला मिळत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारतर्फे मराठी भाषेला राजभाषा दर्जा देऊन योग्य तो न्याय देणे आवश्यक आहे. राज्यातील मराठी भाषेचा प्रसार व प्रचार करण्यासाठी मराठी संस्था, व्यक्ती यांचा गौरव करण्यात येणार असून प्रत्येक गावागावांत अनेक कार्यक्रम, स्नेहसंमेलने आयोजित करून वातावरण निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्यातर्फे देण्यात आली.
राजभाषेचा दर्जा देणे आवश्यक : खलप
गोमंतकीय मराठी परंपरा फार जुनी आहे. इतिहासाचा मागोवा घेण्यास गेलो तर मराठीचा समृद्ध इतिहास दिसतो. अनेक साहित्यकृतीमध्ये तसेच शासकीय भाषा म्हणजेच व्यवहाराची भाषा म्हणून मराठीचा वापर केला जातो. प्रादेशिक शासकीय व्यवहारासाठी ज्या भाषेचा वापर केला जातो तीच राजभाषा असते. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा तर प्रत्येकाचा विजय आहेतच परंतु आता राज्य सरकारतर्फे मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देणे आवश्यक आहे, असे खलप यावेळी म्हणाले.
मराठीचा प्रसार, प्रचार करणे गरजेचे : जावडेकर
मराठी ही जगातील समृध्द, माणसाला सुसंस्कृत बनविणारी भाषा आहे. अनेक दशकांची मराठीप्रेमींची मागणी केंद्र सरकारतर्फे पूर्ण करण्यात येत आहे. आज जागतिक स्तरावर मराठी भाषेचे महत्व वाढत आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेचे कार्य जितके होत नाही तेवढी मराठी भाषेची चळवळ गोव्यात सुरू आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर गोव्यातील मराठीप्रेमींची जबाबदारी वाढली आहे. राज्यात मराठी शाळा बंद करण्याची कारस्थाने सुरू आहेत. नको त्या शाळांना परवानग्या देण्यात येत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत पाठविणे गरजेचे आहे. आता मराठी भाषेसाठी संघटित होऊन मराठीचा प्रसार आणि प्रचार करण्याची वेळ आली आहे, असे सागर जावडेकर म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी राजभाषेसाठी प्रयत्न करावे : वंसकर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात येणार आहे, असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे. आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मराठी भाषेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मराठी राज्याची राजभाषा झाली तर मराठीप्रेमींसाठी हा द्विगुणित आनंद ठरणार आहे, असे रमेश वंसकर म्हणाले.
मराठी राजभाषेसाठी विरोध करणाऱ्यांसाठी मोठा धक्का : घाडी
गोमंतकात अनेक वर्षांपासून भाषेचा वाद सुरू आहे. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात मराठी बोलणारे, भाषेच्या हक्कासाठी लढणारे जास्त सेवक आहेत. मराठीला हक्क, आवश्यक स्थान मिळणे गरजचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे हा गोव्यातील मराठी राजभाषेसाठी विरोध करणाऱ्यांना मोठा धक्काच आहे. फार कमी लोकांमुळे मराठी भाषा राजभाषा होण्यावाचून वंचित आहे. राज्य सरकारला जाग येणे अपेक्षित असून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देऊन सन्मान करणे काळाची गरज आहे. यासाठी सर्व पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आहोत.
मोदी सरकारकडून महत्त्वाची कामगिरी,प्रतापसिंह राणे यांच्याकडून मुक्त कंठाने प्रशंसा
गोव्यात मराठीचे स्थान अबाधित आहे आणि ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन केंद्रातील मोदी सरकारने फार महत्त्वाची कामगिरी बजावलेली आहे. त्यातून गोव्यातही मराठीला प्रोत्साहन मिळेल अशी आशा माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी व्यक्त केली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचे राणे यांनी जोरदार समर्थन केले आणि केंद्र सरकारचे अभिनंदनही केले. गोव्याच्या जनतेच्या हृदयात मराठीचे स्थान कायम आहे आणि जनतेने मराठी भाषा आणि संस्कृती याचे जतन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात जेवढे मराठीला स्थान आहे, तेवढेच गोव्यात देखील स्थान आहे. अभिजात भाषेचा दर्जा ही एक अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे राणे यांनी दैनिक तरुण भारतला सांगितले.
-प्रतापसिंह राणे
मराठी भाषेच्या विकासात गोमंतकीयांचे मोठे योगदान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याचे स्वागत केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने हा निर्णय गुरुवारी घेतला आहे. या दर्जामुळे मराठी भाषेच्या राष्ट्रीय पातळीवरील विकासाला मोठा हातभार लागणार आहे, असेही सावंत यांनी म्हटले आहे. मराठीच्या विकासात गोमंतकीय जनतेचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी नमूद केले. मराठीप्रेमींची ही मागणी पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.
-मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत