नव्या सात तालुक्यांच्या मागणीला जोर
जिल्हा विभाजनाचा मुद्दा अद्याप प्रलंबित : नागरिकांतून नाराजीचा सूर : तालुक्यांची संख्या 22 होणार
बेळगाव : प्रशासकीय सेवेच्यादृष्टीने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होणे गरजेचे असल्याचे मत मागील काही वर्षांपासून सुरू असतानाच आता नव्या सात तालुक्यांच्या मागणीने जोर धरला आहे. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या बेळगावात तालुक्याची संख्या सध्या 15 आहे. पूर्वी 10 तालुक्यांचा बेळगाव जिल्हा होता. 10 वर्षांपूर्वी यामध्ये आणखी पाच तालुक्यांची भर पडली. आता आणखी सात तालुक्यांची मागणी होत असून या मागण्यांची पूर्तता झाल्यास बेळगाव जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या 22 होणार आहे.
संकेश्वर (ता. हुक्केरी), बेळगाव शहर, ग्रामीण, कौजलगी (ता. मुडलगी), ऐगळी व तेलसंग (ता. अथणी), हारुगेरी (ता. रायबाग) या शहरांना तालुक्यांचा दर्जा द्यावा अशी मागणी आहे. संकेश्वर शहराची लोकसंख्या 40 हजार असून या शहराला तालुक्याचा दर्जा देणे योग्य होईल, असा विचार संकेश्वर नगरपरिषदेच्या बैठकीत झाला असून, यावर ठरावही संमत झाला आहे. हुक्केरी या तालुका स्थळावरून तालुक्याचे शेवटचे गाव 40 ते 50 कि. मी. अंतर दूर आहे. सरकारी कामासाठी येथील नागरिकांना हुक्केरीला यायचे झाल्यास संपूर्ण एक दिवस खर्ची जातो. सीमावर्ती भागातील गावांना अनुकुल व्हावे यासाठी संकेश्वर शहराला तालुक्याचा दर्जा देणे उचित ठरेल, असे मत व्यक्त होत आहे.
बेळगाव तालुक्याचे विभाजन करून शहर व ग्रामीण असे दोन तालुके स्थापन करण्याबाबत यापूर्वी चर्चा झाली होती. सुमारे 12 लाख लोकसंख्या असलेल्या बेळगाव तालुक्याचे विभाजन होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सीमेवरील अथणीपासून 50 कि. मी. अंतरावरील गावांना अनुकूल होण्यासाठी तेलसंग शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी मागणी आहे. त्याचबरोबर मुडलगी तालुक्यातील कौजलगी शहराला तालुक्याचा दर्जा द्यावा, अशी 1973 पासून मागणी आहे. पण या मागणीची अद्याप पूर्तता झालेली नाही. कौजलगी 20 हजार, हारुगेरी 40 हजार, तेलसंग 10 हाजर 407, ऐगळी 15 हजार, बेळगाव ग्रामीण 4 लाख असा लोकसंख्येचा रेशो आहे. त्यामुळे नव्या तालुक्यांची स्थापना करणे योग्य ठरेल, असे अनेकांचे मत आहे.
केवळ घोषणा नको कृतीही हवी
बेळगाव जिल्ह्यामध्ये मागील 10 वर्षांच्या काळात नव्या पाच तालुक्यांची स्थापना झाली. पण, बहुतांशी नव्या तालुक्यात मूलभूत सुविधांची वानवाच आहे. नवे तालुके स्थापन झाले तरी, पूर्वीच्या तालुका स्थळांवरील कार्यालयांना हेलपाटे घालणे हे काही नागरिकांना चुकलेले नाही. त्यामुळे फक्त घोषणा न करता कृतीही व्हावी अशी अनेकांची मागणी आहे.