वेस्ट इंडिजचं अध:पतन !
एकेकाळी वेस्ट इंडिजचा संघ म्हणजे क्रिकेटच्या विश्वातील अनभिषिक्त सम्राट...त्यांच्या तुफानी गतीनं मारा करणाऱ्या गोलंदाजांना पाहून प्रतिस्पर्धी फलंदाजांची पाचावर धारण बसायची अन् एकाहून एक दिग्गज फलंदाजांची पलटण गोलंदाजांना घाम फोडायची...आज त्याच विंडीज संघाची अत्यंत दयनीय स्थिती झालीय. ती नुकतीच वेशीवर टांगलीय नेपाळ नि ऑस्ट्रेलियानं अन् आता भारतानं...या अध:पतनावर टाकलेला दृष्टिक्षेप अन् त्यामागची कारणं कोणती हेही पाहण्याचा केलेला प्रयत्न...
सत्तर व ऐंशीच्या दशकांत क्रिकेटच्या साम्राज्यावर अक्षरश: राज्य करणाऱ्या, एकदिवसीय सामन्यांचे सलग दोन विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजवर टी-20 मालिका गमावण्याची पाळी आलीय ती क्रिकेटच्या विश्वात नुकत्याच चालायला लागलेल्या नेपाळविरुद्ध...धक्का बसलाय ?...पण तो बसण्याची गरजच नाहीये...तथापि, क्लाईव्ह लॉईड, व्हिव रिचर्ड्स, गॉर्डन ग्रिनीज, डेस्मंड हेन्स, रिची रिचर्डसन, ब्रायन लारा, मायकल होल्डिंग, अँडी रॉबर्ट्स, गार्नर, कर्टनी वॉल्श, अॅम्ब्रोज यांची झोप मात्र उडविण्याची ताकद निश्चितच त्या पराभवात दडलीय. कारण त्या महान खेळाडूंनी अशी कल्पना स्वप्नात सुद्धा केलेली नसावी...
त्यानंतर आता भारतानं अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर विंडीजचा अडीच दिवसांत धुव्वा उडविलाय तो एक डाव नि 140 धावांनी. त्या संघानं सलग चौथ्यांदा कसोटीत मार खाल्लाय...दर्दी क्रिकेट शौकिनांचं मन अस्वस्थ करणारी ही नुसती घसरण नाहीये, तर हे भयानक अध:पतन...वर्ष 2020...एक अहवाल प्रसिद्ध झाला आणि त्यात ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’चं (सीडब्ल्यूआय) अक्षरश: वस्त्रहरण करण्यात आलं. त्यानं बोट ठेवलं होतं ते ‘सीडब्ल्यूआय’च्या आर्थिक बाबींच्या व्यवस्थापनावर आणि अन्य बजबजपुरीवर. अहवालानं उपाय सूचविला तो पारदर्शकतेचा, प्रशासकीय सुधारणांचा अन् वित्तीय शिस्तीचा. सध्याची परिस्थिती पाहिल्यास तेथील क्रिकेट जिवंत राहण्यासाठी अत्यंत गरज आहे ती या गोष्टींचीच...
वेस्ट इंडिजच्या क्रिकेटला हल्ली तोंड द्यावं लागलंय ते अक्षरश: लाजिरवाण्या परिस्थितीला. त्याचं आणखी एक ताजं उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलियानं त्यांना गारद केलं ते अवघ्या 27 धावांत. त्यात एका टप्प्यावर त्यांची अवस्था होती ती 6 बाद 11 धावा अशी केविलवाणी. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत कमी धावसंख्येची बरोबरी करण्यापासून ते एका धावेनं बचावले (70 वर्षांपूर्वी न्यूझीलंड इंग्लंडसमोर 26 धावांवर कोलमडलं होतं. तो नीचांक अजूनही कायम आहे)...माजी दिग्गज कर्णधार आणि विंडीज क्रिकेटचे सर्वेसर्वा क्लाईव्ह लॉईड यांनी मग गंभीर इशारा दिला तो गुणवत्तेला शोधण्याचा, स्थानिक स्पर्धांवर भर देण्याचा नि खेळपट्ट्यांचा दर्जा सुधारण्याचा...‘जर परिस्थिती सुधारण्यास यश मिळालं नाही, तर कॅरिबियन क्रिकेटला ख•dयात जाण्यापासून वाचविणं कुणालाही शक्य होणार नाहीये’, लॉईड यांचे शब्द...
वेस्ट इंडिजला फार मोठ्या प्रमाणात पिडलंय ते विश्वातील धनवान टी-20 लीगनी...निकोलस पूरनसारखा अत्यंत गुणवान खेळाडू वयाची तिशी ओलांडण्यापूर्वीच जगभर खेळण्यासाठी संघाला रामराम ठोकून बसलाय. विंडीजचं याहून मोठं ते दुर्दैव ते काय ?...त्यामागचं फार मोठं कारण, कडवट सत्य म्हणजे युवा खेळाडूंना राष्ट्रीय संघाचं प्रतिनिधीत्व करण्यापेक्षा आर्थिक लाभासाठी जगभरातील लीगमध्ये खेळणं जास्त महत्त्वाचं वाटतंय. ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’चं कमकुवत नेतृत्व, तेथील जुनी व्यवस्था अन् बिघडणाऱ्या सुविधा यांनी कॅरिबियन क्रिकेटची वाट लावण्याचं काम केलंय ते अगदी इमाने इतबारे. एकेकाळी या बाबी ओळखल्या जायच्या त्या विंडीज क्रिकेटची वैशिष्ट्यां म्हणून...
वेस्ट इंडिज क्रिकेटची पडझड काही एका रात्रीत झालेली नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ही प्रक्रिया चाललीय...त्याची मुख्य कारणं चार आणि त्यांचं विश्लेषण केल्यास सर्वांत प्रथम दृष्टीस पडेल ते मंडळाचं गैरव्यवस्थापन...वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाला सध्या ओळखण्यात येतंय ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’ म्हणून अन् ते अकार्यक्षमता, दूरदृष्टीनं विचार न करणं नि वादग्रस्त आर्थिक निर्णय यांनी ग्रासलंय. खेळाडूंबरोबर करण्यात आलेले करार म्हणजे जणू थट्टेचा विषय बनलाय. त्यांना पैसे योग्य वेळी देण्यास मंडळ नेहमीच असमर्थ ठरलंय व धोरणात्मक नियोजन देखील अस्तित्वात नाहीये...त्यामुळं खेळाडूंचा ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’वरील विश्वास पूर्णपणे उडालाय...
आर्थिक शिस्त व पारदर्शकता यांचा आधार घेतला नाही, तर ‘सीडब्ल्यूआय’चा पाया उद्धवस्त होणार हे सांगण्यासाठी महान व्हिव रिचर्ड्सची गरज नाही. तणाव, अविश्वास यांनी ‘क्रिकेट वेस्ट इंडिज’ व खेळाडू यांच्यामधलं अंतर दिवसेंदिवस वाढविलंय. त्यात भर पडलीय ती खराब संवादाची आणि प्रत्येक वेळी संघाचं नेतृत्व बदलण्याच्या डावपेचाची. त्यामुळं जन्म घेतलाय तो दुफळीनं...2014 साल आठवतंय ?...भारताच्या दौऱ्यावर आलेल्या विंडीज संघातील अत्यंत महत्त्वाचा खेळाडू ड्वेन ब्राव्होनं धर्मशाला इथं आयोजित केलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यानंतर संघाला ‘गूडबाय’ म्हणण्याचा निर्णय घेतला आणि सारं क्रिकेट विश्व हादरलं. त्यामुळं सर्वांना दर्शन घडलं ते वेस्ट इंडिज क्रिकेटमधील बजबजपुरीचं...
वर्ष 2008...क्रिकेट जगताला धडक दिली ती ‘इंडियन प्रीमियर लीग’नं आणि सारे नियमच बदलले. ‘आयपीएल’मधील खेळाडूंवर संघांनी ओतलेल्या प्रचंड रकमेनं ख्रिस गेल, आंद्रे रसेल, पोलार्ड, सुनील नरेनसारख्या दिग्गज खेळाडूंना सुद्धा वेड लावलं नि वेस्ट इंडिजचं क्रिकेटचे तीन तेरा वाजविले. तेथील प्रत्येक खेळाडूला संघाच्या ‘कॅप’पेक्षा महत्त्वाची वाटू लागली ती ‘आयपीएल’मध्ये खेळणाऱ्या संघांची जर्सी...एकेकाळी कॅरिबियन भूमीत दर्जेदार कनिष्ठ खेळाडू मोठ्या प्रमाणात जन्माला यायचे. परंतु या आघाडीवर सध्या पडलाय तो मात्र दुष्काळ. त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या सुविधा कोसळल्याहेत नि गुणवान प्रशिक्षकांची देखील फार मोठ्या प्रमाणात उणीव भेडसावतेय. त्यामुळं त्रिनिदाद, बार्बाडोस, जमैका, गयाना, अँटिग्वासारख्या माजी ‘पॉवरहाऊसेस’वर 11 प्रतिभाशाली खेळाडूंची फळी उभारण्यासाठी सुद्धा वणवण फिरण्याची पाळी आलीय...
‘टी-20’मध्ये क्षणार्धात मिळणारी प्रचंड लोकप्रियता अन् पैशांचा पाऊस यांच्यामुळं युवा खेळाडूंना कसोटी सामन्यांत रसच राहिलेला नाहीये...हेटमायरसारखा अत्यंत प्रतिभावान खेळाडू महत्त्वाच्या दौऱ्यांवर जाण्यास स्पष्ट नकार देतोय. थोडक्यात सांगायचं झाल्यास कॅरिबियनमधील बहुतेक खेळाडूंची अजिबात तयारी नाही ती पाच दिवस मैदानावर उभं राहण्याची...‘क्रिकेट वेस्ट इंडिज’ला 2024 ते 2027 या कालावधीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं 10 लाख ते 10 कोटी डॉलर्सपर्यंत देण्याचं मान्य केलंय ते तेथील क्रिकेटला संजीवनी देण्यासाठी. ‘आयसीसी’नं 2024-25 मोसमात त्यापैकी 2 कोटी डॉलर्स ओतलेत...2022 पर्यंतचा विचार केल्यास ‘सीडब्ल्यूआय’ला कसंबसं उभं करणं शक्य झालं होतं ते 34 दशलक्ष डॉलर्स अन् त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा वाटा होता तो 24 दशलक्ष डॉलर्सचा...
भविष्यात ‘आयसीसी’कडून मिळणाऱ्या निधीचा अतिशय काटेकोर पद्धतीनं वापर करणं वेस्ट इंडिज क्रिकेटच्या दृष्टीनं फार फार महत्त्वाचं...एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायला हवी आणि ती म्हणजे कॅरिबियन बेटांवरील गुणवत्ता संपलेली नाहीये. आकर्षक फलंदाजी करणारे व घणघाती फटके हाणणारे फलंदाज अजूनही जिवंत असून चांगल्या जलदगती गोलंदाजांचं देखील दर्शन घडतंय. परंतु त्यांना गरज आहे ती योग्य वेळेची, व्यासपीठाची...एकता, कठोर परिश्रम, निर्धार यांच्या जोरावर विंडीजमधील क्रिकेटनं पुन्हा झेप घेतल्यास आश्चर्य वाटण्याचं कारण नाहीये !
सलणारी घसरण...
- वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सामी यांनी कॅरिबियनमधील कसोटी क्रिकेटच्या स्थितीचं विश्लेषण करताना ‘व्यवस्थेला जडलेल्या कर्करोगा’वर खापर फोडलंय. तेथील कसोटी क्रिकेटला पायाभूत सुविधा, आर्थिक पाठबळ नि प्रेरणा यांचा अभाव जाणवतोय यावर त्यांनी बोट ठेवलंय...
- अहमदाबादच्या कसोटीतील विंडीजच्या पतनानंतर जेडेन सील्सव्यतिरिक्त इतर दोघे आंतरराष्ट्रीय गोलंदाजांपेक्षा जाळ्यातील सरावासाठी वापरल्या जाणाऱ्या गोलंदाजांसारखे अधिक दिसत होते, अशी टीका वेस्ट इंडिजच्या तोफखान्याला तोंड दिलेल्या महान सुनील गावस्कर यांनी केली...‘त्यांचा अनादर करण्याचा हेतू नाही, परंतु अर्धा डझन षटकं झाल्यानंतर पहिला बाउन्सर टाकला जाताना पाहून कोणालाही वाटलं असेल की, हे खरोखरच वेस्ट इंडिजचे वेगवान गोलंदाज आहेत का ?’, गावस्कर यांची बोचरी प्रतिक्रिया...
- गावस्कर यांना भूतकाळातील वेस्ट इंडिजच्या फलंदाजांच्या वर्चस्वाची तुलना करण्याचा मोहही आवरलेला नाहीये...‘ज्या संघात एकेकाळी रोहन कन्हाय, सेमूर नर्स, क्लाइव्ह लॉईड, गॉर्डन ग्रीनिज आणि डेसमंड हेन्ससारखे फलंदाज होते त्या संघात आता त्यांच्या जवळपासही फिरकणारा कोणी नाही. मी अद्वितीय गारफिल्ड सोबर्स, व्हिव रिचर्ड्स व ’प्रिन्स ऑफ त्रिनिदाद’ ब्रायन लारा यांना विसरलेलो नाही. पण ते शतकातून एकदाच जन्माला येणारे प्रतिभावान आहेत’, अशी टिप्पणी त्यांनी केलीय...
- सुनील गावस्कर 1971 ते 1987 या काळात खेळत असताना भारत वेस्ट इंडिजविऊद्ध 31 कसोटी सामने खेळला आणि त्यापैकी फक्त पाच सामने त्यांना जिंकता आले, तर वेस्ट इंडिजनं 10 लढती खिशात घातल्या...याउलट 2002 पासून विंडीजला भारतास एकाही कसोटी सामन्यात हरवता आलेलं नाही. या काळात दोन्ही संघ 25 वेळा आमनेसामने आले अन् त्यापैकी 15 भारतानं जिंकलेत...
- राजू प्रभू