मंत्रिमंडळ पुनर्रचनेचा निर्णय हायकमांडच घेणार
पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन
बेळगाव : मंत्रिमंडळ पुनर्रचना व्हावी, ही चर्चा आधीपासूनच आहे. मात्र, यासंबंधीचा निर्णय हायकमांडच घेणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी बेळगाव येथे दिली. यावरून मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार या चर्चेला पुष्टी मिळाली आहे. पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, मंत्रिपदासाठी पात्र नेत्यांची संख्या काँग्रेसमध्ये खूप आहे. केवळ 34 जणांनाच मंत्री होण्याची संधी मिळते. कोणाला मंत्रिपद द्यावे, कोणाला पायउतार करावे, याचा निर्णय हायकमांड घेणार आहे. याविषयी भाष्य करण्याचा आपल्याला अधिकार नाही.
30 महिन्यानंतर मंत्रिमंडळाची पुनर्रचना होणार, ही गोष्ट चर्चेत होती. आता ही चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. नवी दिल्ली येथेही याविषयी चर्चा झाली असणार. सर्व काही हायकमांडच्या निर्णयानुसार घडते, असेही त्यांनी सांगितले. मंत्री कृष्ण भैरेगौडा यांनी हायकमांडने सुचवले तरमंत्रिपद सोडण्याची घोषणा केली जाईल, याकडे पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता हायकमांडने सांगितल्यास आपल्यालाही त्या सूचनेचे पालन करावे लागणार, असे सांगितले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे चिरंजीव व विधान परिषद सदस्य डॉ. यतिंद्र यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या यांच्यानंतर अहिंद संघटनेची धुरा आपल्या खांद्यावर येणार, असे त्यांनी सांगितले आहे. ही गोष्ट खरी आहे. त्याला वेगळे अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नये, असेही सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.