हायकमांडचाच निर्णय अंतिम!
मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात नोव्हेंबर क्रांती होऊन उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री बनतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे. याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या संतप्त झाले असून मंत्रिमंडळ पुनर्रचनेसह सर्व मुद्द्यांवर हायकमांडचा निर्णयच अंतिम. हायकमांड वगळता कोणीही काहीही बोलले तरी त्याची किंमत शून्य असल्याची प्रतिक्रिया दिली.
सोमवारी म्हैसूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, अधिकार वाटप, मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी वाच्यता केलेली नाही. प्रसारमाध्यमांवर याची अधिक चर्चा होत आहे. सर्व मुद्द्यांवर पक्षश्रेष्ठीच अंतिम निर्णय घेतील. वरिष्ठांशिवाय कुणीही काहीही बोलले तर त्याला किंमत नाही असे सांगून त्यांनी शिवकुमार यांच्या समर्थकांविषयी असमाधान व्यक्त केले.
15 नोव्हेंबरला दिल्लीला जाणार
बिहार विधानसभा निवडणूक निकालानंतर 15 नोव्हेंबर रोजी हायकमांडच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेविषयी वरिष्ठ नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा करेन. ते काय सांगतील त्याप्रमाणे कार्यवाही करेन. काँग्रेस पक्षाला हायकमांड आहे. हायकमांड काय सांगेल तेच महत्वाचे आणि अंतिम, असा पुनरुच्चार सिद्धरामय्या यांनी केला.
निमंत्रण मिळाले तर बिहारमध्ये प्रचार
बिहार विधानसभा निवडणूक प्रचारात सहभागी होण्यासाठी मला अद्याप फोन आलेला नाही. निमंत्रण मिळाले तर तेथे जाईल. बिहारमध्ये इंडिया आघाडीला विजय मिळणार असल्याचे आतापर्यंत दिसून येत असलेल्या राजकीय स्थितीवरून स्पष्ट होत आहे. बेंगळूरमध्ये मुळच्या बिहारमधील अनेकजण वास्तव्यास आहेत. त्यांनी बिहारला जाऊन मतदान करावे, असे आवाहन केले जात आहे. त्यांचा कौल काय असेल याची प्रतीक्षा आहे, असेही ते म्हणाले.