प्रशासनाचा निर्णय पक्का नागरिकांना सुखद धक्का
मनीषा सुभेदार/बेळगाव
पहिल्या रेल्वे गेटजवळील बॅरिकेड्स हटविले
बेळगावकर हो अनेक वर्षांपासूनची तुमची ही मागणी आता मान्य करत प्रशासनाने पहिल्या रेल्वे गेटजवळील बॅरिकेड्स हटविले आहेत. या मागणीसाठी सुभाष घोलप यांनी गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लढा दिला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांनी पत्रव्यवहार केला. दस्तुरखुद्द पंतप्रधान कार्यालयातूनही त्यांना याबाबत विचार सुरू असल्याचे पत्र आले. या बॅरिकेड्समुळे वृद्ध, दिव्यांग, गर्भवती यांना लांब वळसा घालून जावे लागत होते. तर गुराख्यांना जनावरे घेऊन जाणेही अडचणीचे बनले होते. पण आता हे बॅरिकेड्स हटविण्यात आले आहेत.
सर्वांनाच मिळणार मोफत धान्य
आता बीपीएल कार्डधारकांनाच नव्हे तर सर्वांनाच मोफत धान्य मिळणार आहे. यामुळे जर दुकानांसमोर रांगा वाढून गर्दी झाली तर पुढे घरपोच धान्य देण्याची व्यवस्था करण्याचा विचार सरकार करत आहे. त्यामुळे आता त्यांनाच तेवढे धान्य का? आम्ही काय केले आहे? असे कोणी म्हणायचे कारण नाही. आगामी काळात अन्नधान्यासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसुद्धा रेशनवर दिल्या जाणार असल्याची घोषणा सरकार करण्याची शक्यता आहे.
अशी कोंडी इतिहासजमा होणार
शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटला. शहरातील वाहतूक कोंडी ही एक डोकेदुखीच झाली आहे. मध्यवर्ती असो किंवा गल्लोगल्ली असो, वाहने कोठे पार्क करायची हा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या दुपटीने वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, आता सर्व प्राधान्यक्रमांना बाजूला ठेवून प्रशासनाने वाहतूक कोंडी दूर करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी बहुमजली इमारतींवर पार्किंग करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
24 तास पाणीपुरवठा सुरू
होणार होणार म्हणत दीर्घकाळ प्रलंबित असलेली 24 तास पाणीपुरवठा योजना आजपासून कार्यान्वित होणार आहे. सध्या काही ठिकाणीच या योजनेंतर्गत पाणी उपलब्ध होते. मात्र, दोन प्रभागांमध्ये सुरू झालेली ही योजना संपूर्ण शहरासाठी राबविली जाईल, अशी आश्वासने पाणीपुरवठा मंडळ, एल अँड टी यांनी सातत्याने दिली. आता या आश्वासनांकडे नागरिकांनी काणाडोळा केला. परंतु आता मात्र लवकरात लवकर ही योजना सुरू होऊन पाण्याच्या टंचाईचा प्रश्न मार्गी लागणार आहे.
आता पुरुषांचीही अशीच गर्दी दिसणार
राज्यातील काँग्रेस सरकारने महिलांच्यासाठी मोफत बसप्रवास सुविधा सुरू केली आहे. महिलांसाठी ही सुविधा पर्वणीच ठरली आहे. परंतु त्यामुळे पुरुष प्रवाशांची कोंडी झाली आहे. त्यांना बसमध्ये बसण्यासाठी तर जाऊ दे उभे राहण्यासाठीसुद्धा जागा मिळत नाही. एकूणच अडचणीत आलेल्या पुरुष प्रवाशांसाठी आता परिवहन महामंडळाने मोफत बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तमाम पुरुषवर्गात आनंदाची लाट पसरली आहे.
आता आंदोलकांना सावली मिळणार
विश्वास बसत नाही? अहो नक्की शेड उभारणार, अडीअडचणीत असलेले सामान्यजन, शेतकरी बांधव भर उन्हात आणि पावसात आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत असतात. तासन्तास आंदोलन केले तरी प्रशासन कधी त्याकडे लक्ष देईल हा प्रश्न अलाहिदा. परंतु उन्हात-पावसात बसून आंदोलकांच्या प्रकृतीमध्ये बिघाड होऊ नये, त्यांना उन्हाचा तडाखा लागू नये यासाठी प्रशासनाने आता जिल्हाधिकारी कार्यालय आवारात शेड उभारण्याचे ठरविले आहे. आपल्या प्रजेची इतकी काळजी घेणारे धन्य ते प्रशासन.
स्त्रीशक्ती एकवटणार
शहरात साधारण 40 हून अधिक महिला मंडळे आहेत. महिलांच्या अनेक संस्था आहेत. या स्त्रीशक्तीचे बळ फार मोठे आहे. बेळगावमध्ये मूलभूत सार्वजनिक स्वरुपाच्या सेवा मिळणेसुद्धा कठीण होते. कधी पाणी नाही, कधी वीज नाही, कधी रेशन नाही, कधी योजनांचे पैसे नाहीत, अशा अनेक नकारांना महिला सामोऱ्या जातात. यापुढे हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा निर्धार स्त्रीशक्तीने केला असून सामाजिक प्रश्नांवर सर्व महिला एकत्र येणार आहेत.
तिसऱ्या रेल्वे गेटजवळ आणखी एका उड्डाण पुलाचे काम सुरू
शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून उड्डाणपूल करण्याचा प्रस्ताव मान्य झाला आहे. आता लवकरच तिसऱ्या रेल्वे गेटजवळ उड्डाणपूल उभारण्यात येणार असून 1 एप्रिलच्या सुमुहूर्तावर पुलाचे काम सुरू होणार आहे. बेळगाव शहराचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे आणि हे शहर पुरेपूर स्मार्ट करण्याचा निश्चय प्रशासनाने केला आहे. त्यामुळे आता बेळगावकर नागरिकांना बराच दिलासा मिळणार आहे.
चोर शांत, पोलीस निवांत
शहरात सातत्याने चोरी, घरफोडी, दरोडे, दागिने खेचणे हे प्रकार होत आहेत. मात्र त्या सर्वांना पकडून दहशत बसविण्यामध्ये पोलीस प्रशासन फारसे यशस्वी झाले नाही. पोलीस पकडतच नाहीत, मग चोरी करून काय उपयोग, हा विचार चोरांनी केला आहे. नुकतीच चोरांनी खास अशी बैठक घेऊन आपली पुढील रुपरेषा ठरविताना पोलीस पकडणारच नाहीत तर चोरी करायची कशाला? असा विचार करून चोरी करणे बंद अशी घोषणा केली आहे.
मनपाकडून घरपट्टी माफ
आपले एक स्वत:चे हक्काचे घर असावे हे तर प्रत्येकाचे स्वप्न. ते पूर्ण केले की घरपट्टी मागे लागतेच. दरवर्षी मार्च महिन्यामध्ये घरपट्टी भरावी लागते आणि नेहमीच त्यामध्ये वाढ केली जाते. परंतु आजपर्यंत विनातक्रार घरपट्टी भरलेल्या बेळगावच्या नागरिकांच्या सहनशीलतेचा आदर म्हणून आता घरपट्टी माफ केली जाणार आहे. आहे की नाही आनंदाची बाब?
हापूस अवघा शंभर रुपये
फेब्रुवारी, मार्च सुरू झाला की लोकांना वेध लागतात हापूस आंब्याचे. आंबा कोणाला आवडत नाही? त्याचा नुसता घमघमाटच आंबा कधी खाऊ असे करतो. मात्र, 1500, 2000 रुपये डझन असा त्याचा दर बघून सामान्य माणूस एक पाऊल मागेच राहतो. परंतु आता आंबा उत्पादकांनी, विक्रेत्यांनी आंब्याच्या दरात कपात केली असून चक्क 100 रुपये डझन हा आंब्याचा दर झाला आहे. भरपूर खा आंबे.
मोकाट जनावरे-कुत्र्यांसाठी निवारा केंद्रे
शहरात रस्तोरस्ती व बसथांब्यांवर सातत्याने मोकाट जनावरांचा वावर सुरू आहे. कितीही हटविले तरी ही जनावरे पुन: पुन्हा बसथांब्यात येऊनच निवारा शोधतात. एकप्रकारे ही त्यांची आश्रयस्थानेच झाली आहेत. त्याच बरोबरीने मोकाट कुत्र्यांचा वावर वाढत चालला आहे. त्यांचा बंदोबस्त केला जाईल असे आश्वासन मनपा देत आली आहे. परंतु प्रत्यक्षात तो पूर्णत: झाला नाही. आता मात्र कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना यापुढे घडणार नाहीत. कारण आता मोकाट जनावरांसाठी व कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.
(एप्रिल फूल)
एप्रिल फूल बनाया... तो उनको गुस्सा आया, माफ करो भाई, हमने थोडी ना दस्तूर बनाया